मी मुंबईला पोहोचलो, तेव्हा मला बरेच लोक भेटावयास आले. विधानसभेचे अधिवेशन चालू होते. माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री डॉ. जीवराज मेहता यांना वाटले, की विधिमंडळाचा हा विश्वासभंग झाला. मी त्यांना सारा इतिहास निवेदन केला. पण ऑगस्ट-सप्टेंबरपासून वेगळीच अडचण उभी राहिली. काँग्रसचे अध्यक्ष होते ढेबर. त्यांचा द्वैभाषिक तोडण्यास विरोध होता. गुजरातच्या लोकांना ही बदललेली भूमिका आम्ही कशी पटविणार? असे त्यांनी नेहरूंना विचारले. पंडितजींच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य होते. अशा वेळी ते शिंपल्यात जाऊन बसत. तसे ते बसले.
इकडे लोकांना द्वैभाषिकाच्या फेरविचाराची योजना समजली होती; पण हालचाल होत नव्हती. हा फेरविचार करण्याचे पाऊल कसे टाकावयाचे, हे मी नेहरूंना विचारले, तेव्हा ढेबर व मोरारजीभाईंचे मत त्यांनी मला ऐकविले आणि मीच या संबंधात शंकासमाधान केले पाहिजे, असे ते म्हणाले. आता जर द्वैभाषिकाचा फेरविचार केला गेला नाही, तर काय होईल, या विचाराने मला धडकी भरली, मी अस्वस्थ झालो.
याच सुमारास विदर्भात असंतोष माजला. मी शहाणपणाने महाराष्ट्र मिळविला, पण आता आपल्याकडे दुर्लक्ष होऊन राजकीय अन्याय होईल, असे तेथील काही लोकांना वाटू लागले. त्यांना राग आला. लोकनायक अणे वगैरे याप्रमाणे बोलत होते. अशा प्रकारे दोन प्रश्न निर्माण झाले आणि त्यांवर मीच तोडगा काढावा, असे पंडितजी सांगत होते. मग मी विदर्भातील माझ्या
सहका-यांना बोलावून पंडितजींचे म्हणणे सांगितले. त्यावर वसंतराव नाईक, शेषराव वानखेडे, नासिकराव तिरपुडे, काझी या विदर्भाच्या मंत्र्यांनी चांगली भक्कम भूमिका घेतली, ते म्हणाले,
'आपण दिल्लीत जाऊ, खासदार वगैरेंना भेटू आणि महाराष्ट्र राज्यात आपल्याला राहावयास हवे, असे त्यांना सांगू.'
मी हे मान्य केले; पण जे इतर सहकारी आपल्याविरुद्ध आहेत, त्यांच्याविरुद्ध काही करू, बोलू नका, असे सांगितले.
हे सर्वांनी कबूल केले व मग हे माझे सहकारी अनेकांच्या गाठीभेटी घेऊ लागले.
मी कन्नमवारांनाही बोलाविले व विदर्भाच्या चळवळीबद्दल बोललो. ते म्हणाले,
'मी जाहीररीत्या विदर्भाबद्दल बोललो आहे, तेव्हा मला माघार घेता येणार नाही, पण मी तुमच्याविरुद्ध जाणार नाही.'
मग हे कसे करावयाचे, असे मी विचारले. तेव्हा दोन्ही भागांतील दोन-दोन, तीन-तीन काँग्रेसजनांची एक समिती नेमावी व या प्रश्नाचा विचार करून, तिने काही ठरवावे, अशी सूचना कन्नमवार यांची होती, ती मी मान्य केली.