श्री. तात्यासाहेब केळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या समारंभात मी भाषण करण्यासाठी गेलो, ते लिखित भाषण घेऊन. परंतु प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली तेव्हा भाषण वाचून दाखविणे माझ्या जिवावर आले. मी लिखित भाषणातील महत्त्वाचे मुद्दे उत्स्फूर्त भाषण करून स्पष्ट केले; परंतु या पुस्तकात दिलेला केळकरांवरचा लेख म्हणजे ते लिखित भाषण आहे. उत्स्फूर्त भाषणाची टाचणे वा इतर नोंद मजजवळ नाही.
कोल्हापूर येथे झालेल्या श्री. भाऊसाहेब खांडेकरांच्या अपूर्व सत्कारप्रसंगी मात्र मी लिखित भाषण बरोबर नेले नव्हते. सत्कार-समारंभात उत्स्फूर्त भाषण करण्याच्या तयारीनेच मी गेलो होतो. फडके-खांडेकर युगामध्ये माझी पिढी वाढली होती. त्यामुळे खांडेकरांच्या लेखनाचा भावनांवर व विचारांवर झालेला संस्कार माझ्या मनामध्ये अगदी ताजा ताजा असल्यासारखा ओसंडत होता. खासबाग मैदानावरच्या त्या विराट सभेत केलेले हे भाषण टेपरेकॉर्डरवर मुद्रित करण्याची व्यवस्था नसती, तर माझे मलाच परत सापडले नसते. परंतु योगायोगाने तशी व्यवस्था होती. या पुस्तकामध्ये 'प्रकाशाचा लेखक' या शीर्षकाखाली समाविष्ट केलेला लेख या भाषणाची संपादित नोंद आहे.
कै. अण्णा माडगूळकरांचा आणि माझा जिव्हाळ्याचा स्नेह होता. त्यांच्या मृत्यूने मी अतिशय कष्टी झालो. ते थोर कवी तर होतेच, परंतु माणुसकीत भिजून निघालेले एक अभिजात व्यक्तित्व होते. त्यांच्यासंबंधी त्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या लेखाचे शीर्षक प्रथम प्रसिद्धीला देताना, जे त्यांच्याच शब्दांत दिले होते, तेच आग्रहाने या पुस्तकातही कायम ठेवले आहे.
पहिल्या क्रमांकाचा लेख 'नियतीचा हात' हा सोळा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला व दुसऱ्या क्रमांकाचा लेख 'आशा-निराशेचे क्षण' अगदी अलीकडे - म्हणजे गेल्या दिवाळीच्या दिवसांत प्रसिद्ध झाला. इतर सर्व लेख या दोन लेखांच्या मध्यांतराच्या काळात प्रसिद्ध झाले आहेत.
वर उल्लेखिलेले दोन्ही लेख अगदी एकमेकांच्या शेजारी पाटाला पाट लावून बसले, तरी जसा त्यांच्यात काळाचा फरक आहे, तसा त्यांतील अनुभवनिर्णय व मन:स्थितीचे व्यक्तीकरण यांतही बराच फरक झालेला आहे, हे मी जेव्हा दोन्ही लेख एकत्र वाचले, तेव्हा माझ्या लक्षात आले; आणि हे स्वाभाविक आहे. जसा काळ बदलतो तशी परिस्थिती बदलते आणि अनुभवही. मन:स्थितीच्या मांडणीत फरक पडला नाही, तरच आश्चर्य म्हणावे लागेल !
१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असलेल्या दिवसांत मी स्वाभाविकच दिल्लीत होतो. एके दिवशी दुपारनंतर मी पंजाबच्या एका विमानतळावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. रात्री परत आलो आणि मुंबईहून निरोप आला, की आईची अंतिम अवस्था नजीक आली आहे. माझ्या मनात दिल्लीत आल्यापासून जी एक धास्ती नित्य वावरत होती, ती खरी ठरू पाहत होती; आईच्या शेवटच्या क्षणी मी तिच्याजवळ असेन का? मध्यरात्रीनंतर टेलिफोनची घंटा वाजली नि निरोप आला, की आई आम्हाला सोडून गेली ! युद्धाचे दिवस संपले; पण माझी यातना संपली नव्हती. आईचे सगळे जीवन मूर्तिमंत डोळ्यांपुढे उभे राही; आणि या मन:स्थितीतच 'सोनहिरा' लिहिला गेला.