ऋणानुबंध (54)

समविचारांच्या युवकांत रंगून गेलो होतो. असेच आम्ही काहीजण कराडमधल्या एका छोट्या छापखान्यात जमलो होतो; २६ जानेवारीचाच विचार चालू होता. 'स्वातंत्र्याची हाक' देणारे एक बुलेटिन तयार करून, शाळेतून व चौकाचौकांतून वाटावे अशी कल्पना पुढे आली आणि लगेच संमतही झाली. मी तेव्हा थोडासा लेखक होतो. शाळेतील निबंध वगैरे ब-यापैकी लिहीत असे. तेव्हा काही लिहिण्याचा प्रसंग आला म्हणजे माझे सहकारी ते काम माझ्यावर टाकीत. त्या दिवशी लिहिलेली 'स्वातंत्र्याची हाक' लिहिण्याचे कामही माझ्यावर आले होते. त्या रात्री लिहिलेली 'स्वातंत्र्याची हाक' स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या दिवशी व त्यानंतर आज कित्येक वर्षांनंतरही माझ्या कानांत खणखणते आहे.

त्या 'स्वातंत्र्याच्या हाके'तील शब्द जसेच्या तसे आज मला आठवणार नाहीत, हे खरे. पण त्यांचा आशय निश्चितच आठवतो आहे. म. गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या लढाईतील आम्ही सैनिक आहो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पडेल तो त्याग करावयास आम्ही सिद्ध आहो. प्रसंगी आमचे प्राणही आम्ही अर्पण करणार आहो. असा तो प्रतिज्ञालेखच होता. तेव्हाच्या तारुण्यसुलभ उत्कट भावनेला शोभणारा. ती 'स्वातंत्र्याची हाक' आम्ही कराडच्या चौकाचौकांतून कशी वाटली, शाळेतील विद्यार्थ्यांना कशी दिली, याच्या आठवणी निघाल्या.

या आठवणींची उजळणी चालू असतानाची एक गोष्ट मला चांगलीच स्मरते. म. गांधींच्याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेने आमची मने अगदी ओतप्रोत भरून आली होती. आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करीत होतो, पण आमचा स्वातंत्र्याचा सेनानी मात्र दूर नोआखलीमध्ये दंगलीत बरबाद झालेल्यांचे अश्रू पुसत होता. त्यांची आठवण झाली आणि माझे मन गंभीर झाले. मी गांधीवादी केव्हाच नव्हतो; पण गांधीजींबद्दल एक अपरंपार श्रद्धा मनात वागवत होतो. इतरांप्रमाणेच मीही त्यांना केवळ लांबूनच पाहिलेले होते. प्रत्यक्ष परिचय नव्हताच, पण त्यांच्याबद्दल अत्यंत जवळीक वाटत होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढली होती. बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी जनतेने निर्भय होऊन झुंज दिली होती, ती म. गांधींच्याच प्रेरणेने ! भारत स्वतंत्र होत असताना त्यांचे स्मरण पदोपदी येत होते. माझे लक्ष सहज माझ्या घरातील भिंतीवर गेले आणि मनातल्या मनात मला शरमल्यासारखे झाले. माझ्या मुंबईच्या घरी म. गांधींचा फोटोसुद्धा नव्हता ! मन बेचैन झाले. चाललेल्या गप्पांतून लक्ष उडाले आणि सारखे वाटू लागले, हे काही खरे नाही. आज स्वातंत्र्यदिन आहे. आज आपल्या घरी म. गांधींची तसबीर आपण लावू या.

मनात आले आणि मी हळूच घरातून बाहेर पडलो. कोणाशीही न बोलता, कोणालाही न सांगता, मरीन लाईन्स स्टेशनजवळचा रेल्वेवरचा ओव्हरब्रिज ओलांडला आणि चालत चालतच ठाकुरद्वार नाक्यावर पोचलो. रस्ता गर्दीने दुथडी वाहत होता. पण माझे गर्दीकडे लक्षच नव्हते. मी फ्रेममेकरचे दुकान शोधत होतो. एक दुकान सापडले. तिथे मिळाला तो म. गांधींचा एक फोटो मी घेतला आणि घराकडे निघालो. हातात म. गांधींची ती तसबीर होती आणि मनात त्यांच्याबद्दलची अपरंपार कृतज्ञता होती. त्यांचाच विचार करीत मी चाललो होतो. घरी आलो आणि माझ्या अभ्यासिकेत तो फोटो मी लावला तेव्हा माझे मन थोडे शांत झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org