त्यांच्या हाकेसरशी मी आत गेलो. मला वाटले, गणपतरावांना पाणी वगैरे हवे असेल;
पण त्यांना हवे होते वेगळेच.
'काय म्हणताहेत मंडळी?' त्यांनी मला विचारले.
माझ्या मागोमाग आमचे मित्रमंडळही वॉर्डात त्यांच्या खाटेभोवती आले होते आणि यशवंतरावांनी निवडणुकीला उभे राहणेच आवश्यक आहे, असे त्यांनी बंधूंना पटवून दिले होते.
शेवटी गणपतरावांनी मला थोडे जामलेच म्हणा ना. ते म्हणाले,
'अरे, आमची कसली चिंता करतोस? कुटुंबाचे दिवस, आज नाही, उद्या सुधारतील. मला विश्वास वाटतो आहे. तू मागे वळून बघू नको. निवडणुकीला उभा राहा. पुढले पुढे पाहता येईल. आतापर्यंत आम्ही नाही का दिवस काढले, तसेच पुढेही काढू. तू नाही म्हणू नकोस.'
रुग्णशय्येवरील माझ्या बंधूंचा उत्साह बघून मी आश्चर्यचकित झालो होतो. क्षणभर माझी मलाच लाज वाटली. मी काहीच बोललो नाही. माझे मित्र गणपतरावांच्या शब्दाने खूश झाले होते. माझ्या संमतीची त्यांना आता आवश्यकता नव्हती; आणि १९३७ च्या निवडणुकीत सातारा जिल्हा काँग्रेसचा एक युवक-कार्यकर्ता म्हणून काम केलेला मी १९४६च्या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून उभा राहिलो होतो.
अनेक वेळा मनात येते, कराडच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत झालेली माझी राजकीय प्रगती, मी माझा हेका चालू ठेवला असता, तर झाली असती का? माझ्या बंधूंनी जर तेव्हा मला हाक मारून उत्साह दिला नसता, तर? माझ्या आयुष्यातील अत्यंत मोक्याच्या क्षणापैकी तो एक क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.
१९४६ची निवडणूक-मोहीम म्हणजे एक विजय-मोर्चा होता. रणांगणात कोणी शत्रूच नव्हता, म्हटले तरी चालेल. आमचा 'व्हिक्टरी मार्च' या गावाहून त्या गावाला जायचा. बेचाळीसच्या आंदोलनाची पार्श्वभूमी, सत्तांतराची शक्यता यांमुळे सर्वत्र उत्साह होताच. त्यामुळे लोक मुळी पाहावयालाच जमायचे. मी, बाबूराव गोखले, व्यंकटराव पवार व के. डी. पाटील असे आमचे पॅनेल होते. आम्ही चौघांनी मिळून एक टूरिंग ठरविलेली होती. मला आठवतेय ती काळी 'डॉज' होती. या गाडीतून आम्ही जिल्ह्याचा दौरा केला. ही आमची गाडी मध्येच केव्हा तरी बंद पडायची. मग आम्हा उमेदवारांना खाली उतरून तिला ढकलावी लागे. ती निवडणूक अवघड नव्हती. तरी गावोगाव आलेले अगत्याचे, औत्सुक्याचे अनेक प्रसंग मी अनुभवले, ते माझ्या स्मृतिपटलावर रेखीव असे कोरलेले आहेत. स्वातंत्र्याची चाहूल लागलेली ती निवडणूक होती. माझी स्वत:ची ती पहिलीच निवडणूक होती. आयुष्यात सगळ्यात पहिल्या गोष्टीचे महत्त्व असते. राजकारणातल्या माझ्यासारख्या व्यक्तीला पहिल्या निवडणुकीचे महत्त्वही असणारच; त्या निवडणुकीपासून संसार मागे लागावा, तशा निवडणुका मागे लागल्या आहेत. एका धुंदीत, बेहोशीत या सा-या निवडणुका मी लढलो आहे. पण लढाई संपवून छावणीत परतताना १९३७ आणि १९४६च्या त्या पहिल्यावहिल्या निवडणुकांच्या आठवणी मात्र नेहमी रेंगाळतात.