ऋणानुबंध (51)

निवडणुका संपल्या. आत्माराम पाटील विजयी झाले. त्यांना आम्ही एवढी मते मिळवून दिली, की त्यांची मते हा तेव्हाच्या मुंबई राज्यातील उच्चांक ठरला होता. आमच्या खटपटीला यशच आले होते, असे नाही, तर सगळी खटपट सार्थकी लागली होती. ही माझी पहिली निवडणूक-मोहीम होती.

या निवडणुकीनंतर तब्बल नऊ वर्षे लोटली. मध्यंतरीच्या काळात स्वातंत्र्य-युद्धातील अखेरची लढाई लढली गेली होती. बेचाळीसच्या क्रांतियुद्धातील आम्ही सैनिक त्या युद्धाच्या ज्वालांतून तावून सुलाखून बाहेर पडलो होतो. तुरुंगातून सुटका झालेली होती. दिल्लीत वाटाघाटींची गु-हाळे चालू होती. एकीकडे पुन्हा एकदा अखेरचा संग्राम करावा लागणार अशी हवा होती. दुसरीकडे सत्तांतराची तयारी सुरू होती. आंदोलन थंडावले होते. वातावरण अनिश्चित होते. तेवढ्यातच १९४६ च्या निवडणुकीच्या नौबती झडू लागल्या होत्या.

खरे म्हणजे, त्या वेळी माझा मूड एकदमच वेगळा झाला होता. बेचाळीसच्या आगीत आमच्या घराची दाणादाण झाली होती. मी स्वत: तर त्यात उडी घेतली होतीच, पण माझ्या पाठोपाठ माझे बंधूही पकडले होते. या आघातांनी आमचे घर बसले होते. माझे बंधू गणपतराव तुरुंगातून सुटून आले, पण आले ते क्षयाची बाधा घेऊन. अशा परिस्थितीत कुटुंबाची जोखीम आपण घेतली पाहिजे, आपल्यामुळे कुटुंबाचा गाडा अडला तर त्याला थोडा चालता करणे ही आपली जबाबदारी आहे, अशा एका विचाराने मला घेरले होते. घरावर पाटी लावून मी थोडी-फार वकिलीची  प्रॅक्टिसही करू लागलो होतो. काँग्रेसचे काम चालू होते. पण खरे सांगायचे तर मन थोडे वकिलीचे बस्तान बसविण्याच्या मागे होते. त्यामुळे निवडणुकीच्या नौबती झडू लागल्या तरी मी त्यांकडे विशेष लक्ष दिले नव्हते. कोर्टकचेरीची कामे पाहावयाची, बंधूंच्या आजारपणाकडे लक्ष द्यावयाचे, असा माझा दिनक्रम चालू होता. गणपतरावांना आम्ही मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. शनिवार-रविवार त्यांच्या समाचाराला, सेवाशुश्रूषेला मी मिरजेला जात असे.

अशाच एका रविवारी मिरज हॉस्पिटलमध्ये गणपतरावांच्या शेजारी मी बसलो असताना माझ्याकडे कोणी मित्र आल्याचे मला सांगण्यात आले. कालच ज्यांच्याशी गप्पा मारून मी निघालो, ते कराडचे आमचे दोस्तच आले होते, आणि मी निवडणुकीला उभे राहावे म्हणून विनंती करायला आल्याचे ते सांगत होते. मी त्यांना अक्षरश: झटकून टाकले. मला निवडणुकीशी काही कर्तव्य नाही. मला उभे राहावयाचे नाही, तुम्ही गळ घालू नका, असे मी त्यांना वारंवार सांगत होतो आणि 'तुम्ही उभे राहिलेच पाहिजे, तुमची जोड असल्याशिवाय काँग्रेसचे पॅनेल येणार नाही', असे माझे मित्र मला पुन्हा पुन्हा ऐकवत होते. माझी मन:स्थिती, बंधूंचे आजारपण सगळ्या गोष्टी मोकळ्या मनाने सांगून मी उमेदवारीला ठाम नकार दिला. पण माझ्या मित्रांचा हट्ट काही थांबेना. व्हरांड्यात आम्ही जवळजवळ तासभर वादविवाद घालत उभे होतो. मला वाटते, माझ्या बंधूंचे या सगळ्या वादविवादाकडे खाटेवर पडल्या पडल्या लक्ष असावे. मी जेव्हा निर्वाणीच्या स्वरात नकार दिला आणि माझे मित्र जेव्हा आता निराश होऊन जाणार, असे दिसू लागले, तेव्हा गणपतरावांनी मला हाक मारली,
'यशवंतराव, जरा आत ये !'

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org