ऋणानुबंध (43)

स्वातंत्र्य आंदोलन

नियती प्रत्येक माणसाला आठवणींचा एक भरघोस गुच्छ देऊन त्याचा सत्कार करीत असते. अर्थात ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे त्या गुच्छातील फुले विविध प्रकारची असतात. माझ्या वाट्याला आलेल्या आठवणींच्या गुच्छातील फुले सर्व प्रकारची आहेत. त्यांत मनाला कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारी फुले जशी आहेत, तशीच चांगल्या माणसाच्या सहवासाचा सुगंध देणारीही असंख्य आहेत. काही कडवट व उग्र वासाची फुले आहेत, तर काही फुलांवर पडलेले अश्रूंचे दवबिंदू अजूनही सुकलेले नाहीत. काही फुले अस्वस्थता निर्माण करतात, तर काही निर्भेळ आनंद देतात. एकंदरीत नियतीने दिलेला माझ्या आठवणींचा गुच्छ समृद्ध आहे, आकर्षक आहे, कधी न सुकणारा आहे. हे माझ्या आयुष्यातील एक फार मोलाचे धन आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या-उत्सवाच्या निमित्ताने माझा आठवणींचा हा गुच्छ थरारतो, यात नवल नाही. गेली कित्येक वर्षे आपण स्वातंत्र्याच्या हवेत श्वासोच्छवास करीत आहोत, या विचाराने मनावर आनंदाचा मोहोर येतो, हे खरे असले, तरी त्यासाठी ज्या मित्रांनी, सहका-यांनी, सुहृदांनी व कार्यकर्त्यांनी जे असंख्य कष्ट घेतले, हाल सोसले, प्रसंगी प्राणाचे दान दिले, त्यांच्या आठवणीने गळ्यात हुंदका दाटल्याशिवाय राहत नाही. कित्येक वेळा असे वाटते, की आज जे दिवस आपल्याला दिसत आहेत, त्यामागे त्यांचीच पुण्याई आशीर्वादाच्या रूपाने उभी आहे.

ही आठवण झाली, की मन वर्षांचे पंख लावून भूतकाळात जाते. १९४२ चा अखेरचा स्वातंत्र्य-लढा डोळ्यांपुढे उभा राहतो. मी त्या वेळी सातारा जिल्ह्यातला एक लहानसा काँग्रेस कार्यकर्ता होतो. अ. भा. काँग्रेस कमिटीची बैठक आठ ऑगस्टला निश्चित झाली होती. या बैठकीचे वातावरण काही तरी वेगळेच आहे, हे आम्हांला जाणवत होते. आता, होईल तो लढा अंतिम असणार, अशी जाणीव कुठे तरी मनात होती. आम्ही जिल्ह्यातील सात-आठ कार्यकर्ते पाच ऑगस्टला मुंबईस गेलो. अ. भा. काँग्रेस कमिटीच्या बैठकीतील भाषणे मन लावून ऐकली. पण महात्मा गांधींच्या भाषणाने आम्ही भारावून गेलो. विशेषत:, त्यांनी जेव्हा 'तुम्ही आजपासून स्वतंत्र झाला आहात, असे समजून वागा', असे सांगितले, तेव्हा आमची मने एका विलक्षण अशा नव्या संवेदनेने थरारून गेली.

रात्री आम्ही बद्रिकाश्रमात खूप वेळ चर्चा करीत होतो. शेवटी आम्ही ठरविले, की काहीही झाले, तरी तुरुंगात जायचे नाही. भूमिगत राहून चळवळ पुढे न्यायची. हा अंतिम लढा यशस्वी करायचा.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org