ऋणानुबंध (29)

मी काही सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांनी मग मला तास - दोन तास ठेवून घेतले. मधून मधून ते काही बोलत असत, काही विचारीत असत. माझ्या हालचाली बारकाईने टिपत असत. अखेर ते म्हणाले,
'मी येईन, पण माझ्या काही अटी आहेत.'
'आम्ही सर्व अटी पाळू.' मी म्हणालो.
'कुठे उतरवणार मला?' शिंदे.
'माझ्या घरीच उतरवणार आहे.' मी म्हटले.
'घरच्या माणसांची संमती घेतली आहेस?' शिंदे.
'हो..' मी दाबून होकार दिला.
'माझ्याबरोबर जेवायला हरिजनाला आणावे लागेल. घरचे लोक मान्यता देतील?' शिंदे.
'हो,' मी पुन्हा होकार दिला.
'घरी कोण कोण आहेत?' शिंदे.
'आई, थोरले बंधू आहेत; पण ते नाही म्हणणार नाहीत.' मी सांगितले.
'घरी त्यांना विचारले आहे का?' शिंदे.
'नाही !' मी म्हणालो.
'मग, हो कसा म्हणतोस?' शिंदे.
'माझे सर्व जातींचे मित्र माझ्या घरी येतात. आईची त्याबद्दल कधी तक्रार नसते.' मी सांगितले.
'पण तुझ्या घरी हरिजनांची पंगत कधी झाली आहे का?' शिंदे.
'आपल्याबरोबर ही पंगत होईल, याची मला खात्री आहे.' मी जरा ठामपणाने बोललो.
श्री. विठ्ठल रामजी यांचा कराडला येण्याचा होकार घेऊनच मी परतलो.

हे आता सारे कसे जमावे, अशी मनात धास्ती डोकावत होती. मित्र बरोबर असणे वेगळे आणि घरात तशी पंगत होणे वेगळे. आईकडून होकार मिळण्यावरच पुढचे सारे अवलंबून होते. कराडला आल्यानंतर मी कोणती जबाबदारी घेऊन आलो आहे, हे आईला जरा भीत भीत सांगितले. क्षणार्धांत तिने होकार दिला. विठ्ठल रामजी यांना आणि हरिजन मित्राला आनंदाने आपल्याकडे येऊ द्या, असे ती जेव्हा म्हणाली, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि श्री. शिंदे यांनी स्वत:ला तिला याबद्दल विचारले, तेव्हा ती माऊली म्हणाली, 'मला सारी मुलं सारखीच. त्यात कसली जातपात?'

कराडच्या बुधवार पेठेत - त्या वेळच्या महारवाड्यात हे नाईट स्कूल श्री. शिंदे यांच्या हस्ते सुरू झाले. दोन-तीन वर्षे आम्ही सर्व मित्र त्या ठिकाणी स्वत: शिकवायला जात असू.

श्री. शिंदे यांचा आमच्याकडील तो मुक्काम मोठा बहारीचा झाला. ते स्वत: खूश होऊन परतले.
पण हे श्रेय माझे होते का?

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org