ऋणानुबंध (28)

आज हे लिहिताना सहज मनात येऊन जाते, की मास्तरांच्या सुराला आईने होकार भरला असता आणि आयुष्याच्या सुरुवातीलाच तो 'माफी' चा प्रसंग वठवावा लागला असता, तर... एक लहानशीच घटना, पण त्या घटनेने मला माझ्या भावी आयुष्याकडे केवढ्या मोठ्या शक्तीने फेकून दिले होते !

आणखी एका प्रसंगातही आईला कसोटीला लावण्याचा उद्योग माझ्या हातून घडला. कराडात त्या वेळी माझा मित्र-परिवार फार मोठा होता. सर्व जाति-धर्मांचे मित्र आम्ही एकत्र येऊन काम करीत होतो. त्यांत ब्राह्मण होते, मराठा होते, मुसलमान होते, हरिजन होते आणि इतर जाती -जमातींचेही होते.

आम्ही मॅट्रिकमध्ये शिकत होतो. तो काळ हरिजन चळवळीने आकृष्ट करून घेतलेला होता. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, हरिजनांना शिक्षण मिळाले पाहिजे, अशा चर्चा झडत होत्या. सामाजिक सुधारणा घडवण्याच्या त्या काळात माझा त्या काळचा एक हरिजन मित्र उथळे आणि आमचे काही वर्गमित्र यांच्या डोक्यात हरिजन-वस्तीत 'नाईट स्कूल' काढण्याची कल्पना आली. मी त्या वेळी मॅट्रिकच्या वर्गात जरी शिकत होतो, तरी वयाने विशीच्या आसपास पोचलो होतो. कारण मॅट्रिकपर्यंत पोचेपर्यंत माझी शालेय जीवनातली तीन वर्षे निरनिराळ्या चळवळींच्या निमित्ताने तुरुंगात गेली होती. तरीसुद्धा इतरांच्या मानाने आम्ही 'पोरं'च होतो. पण त्याही वयात हरिजनांसाठी म्हणून काही तरी करायचे, अशी आमची जिद्द होती. अखेर 'नाईट स्कूल'चा प्रारंभ निश्चित केला आणि त्या उद्योगाला लागलो.

सामाजिक सुधारणांच्या त्या काळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व आघाडीवर होते. तेव्हा हरिजनांसाठी सुरू होणारी शाळा त्यांच्याच आशीर्वादाने सुरू व्हावी, यासाठी त्यांना बोलवायचे ठरले. तरी पण प्रत्यक्षात श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यापर्यंत पोचायचे कसे आणि कुणाच्या आधाराने, हा प्रश्न होता. अखेर मी स्वत: पुण्याला जाऊन श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांना आणण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे ठरले; आणि ठरल्याप्रमाणे मी निघालोही.

श्री. शिंदे यांची आणि माझी पूर्वीची जानपछान नव्हती. साधी ओळखही नव्हती. तरी पण त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटायचे, असे मी ठरविले. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर मी पहाटे उतरलो होतो. तिथेच नळावर तोंड धुतले. पायजमा, कोट, टोपी हा त्या वेळचा साधा वेष. तो बदलण्याचेही कारण नव्हते. पण उजाडेपर्यंत थांबणेच आवश्यक होते. सकाळीच मग स्टेशनवरून निघून आठ, सव्वाआठपर्यंत मी त्यांच्या घरी पोचलो. श्री. शिंदे घरीच होते. नमस्कार करून मी माझ्या येण्याचे कारण सांगितले. त्यासरशी ते माझ्याकडे पाहतच राहिले. सुरुवातीला ते फार बोलले नाहीत, पण एकूण मनुष्य मला मोठा 'टफ्' वाटला.

'तू एक साधा पोर, तुझ्या सांगण्यावरून मी कसा येऊ ?' विठ्ठल रामजी म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org