ऋणानुबंध (25)

नाव विचारले की 'यशवंत बळवंत चव्हाण, राहणार कराड...' वगैरे पोस्टाचा पत्ता सांगण्याची शहरी पद्धत मला माहिती होती. पण या पद्धतीचा इथे उपयोग नव्हता. एक तर माझे वडील या गावचे रहिवासी नव्हते. त्यामुळे त्यांना नावाने ओळखणारे कमी, आणि आईचे नाव 'आई' यापेक्षा मला दुसरे माहिती होते, ते 'आक्का'. आजोळी माझ्या आईला सर्वजण 'आक्का' म्हणत असत. घरातील ती सर्वांत मोठी, म्हणून आला - गेला माणूसही 'आक्का'च म्हणत असे. आमच्या घरीही आईला नावाने हाका मारील, असे कुणी मोठे नव्हते. त्यामुळे इकडेही ती सर्वांची 'आई'च होती. आले-गेले, फार तर, आमच्या भावंडांपैकी कुणाचे तरी नाव घेऊन पुढे 'आई' जोडत असत. त्यामुळे किंचुकाकांच्या प्रश्नाने मी जरा थबकलो. तेथीलच दुसरे कुणी तरी म्हणाले,

'घाडग्यांच्या विठाई-आक्कांचा हा धाकटा.'
मला त्या दिवशी समजले, की माझी आई आणि घाडग्यांची आक्का - तिचे नाव विठाई!
आजोळी घरी गेल्यावर आजीला मी किंचुकाकांची कथा सांगू लागलो, तेव्हा ती म्हणाली,
'आक्काचं नाव देवाचं आहे, 'विठाई' आपला देव आहे.'

आजी काय म्हणते, ते मला कळत नव्हते. पण ती काही तरी चांगले म्हणाली, असे वाटले मला. आजीला मी आणखी काही तरी विचारणार होतो, पण तेवढ्यात आजीने मला जवळ ओढले आणि ती म्हणाली,
'ते जाऊ दे, तुझं नाव 'यशवंत' का ठेवलं, माहीत आहे का?'
मला काहीच माहिती नव्हती, म्हणून मी विचारले,
'का?'
'त्याचं असं झालं...' माझी आजी सांगू लागली : 'तुझ्या जन्माच्या वेळी आईला फार त्रास झाला. ती बेशुद्ध झाली. आपलं गाव खेडं, दवापाण्याची तशी सोय नाही. माझ्या जिवाला घोर लागला. नेहमीचं दवापाणी केलं, पण त्यानं काही जमेना, अखेर सागरोबावर हवाला दिला आणि देवाला काकुळतीनं विनवलं,
'आक्काला' जगवण्यात माझ्या हाताला यश दे. तुझी आठवण म्हणून मुलाचं नाव 'यशवंत' ठेवीन.'

'सागरोबानं हाक ऐकली, म्हणून तुझं नाव यशवंत ठेवलं.'

आजीने गालांवरून बोटे उतरली आणि कडकड मोडली. तिच्या डोळ्यांत पाणी जमले होते. त्या रात्री आजीने माझी दृष्ट काढली आणि सागरोबाचा अंगारा लावला. कराडला मी परतलो, तेव्हा माझ्या ज्ञानात बरीच भर पडली होती. 'विठाई-यशवंत' ह्या दोन नावांचा इतिहास घेऊन  मी कराडला आलो होतो. नावामागे काही इतिहास असावा लागतो, हे त्या वेळी मला कळत नव्हते. पण आईच्या प्राणाची साक्ष म्हणून माझे नाव आहे, हे मला कळल्यापासून आई हाच माझा प्राण बनला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org