ऋणानुबंध (24)

या राज्याची राजधानी, म्हणे, कौंडिण्यपूर - म्हणजे आजचे कुंडल. देवराष्ट्राच्या राजाचे नाव होते कुबेर. कुबेरेश्वराचे देऊळही इथे आहे. हा सारा परिसर फार फार पूर्वी सुखाच्या शिखरावर असला पाहिजे. त्याच्या काही साक्षी इथे मिळतात. कारण एक तर कुबेराचेच हे राज्य. दह्यारी, तुपारी, ताकारी, लोणारी या स्निग्ध, सात्त्विक गावांचा त्याला वेढा. गावाला लहानशी नदी आहे - लोक तिला ओढा म्हणतात, पण तिचे नाव आहे सोनहिरा. कुतूहल वाटावे, असाच हा आसमंत. देवपण घेऊन जन्माला आलेले हे गाव - त्याच्यात 'राष्ट्र' ही हाक आहे. सागरोबाच्या चोहोबाजू 'आनंदबना'ने भरलेल्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ तेथे उभे असलेले. उत्तम जमिनीत बी पेरले म्हणजे चांगले फोफावते, तशी इथली माणसे आणि मने ! त्यांच्यांत द्वेषाची धग नाही. जमिनीत हिंडू-फिरू लागले की या मातीचे आणि माणसांचे मोल यांचा सुगावा लागतो. समुद्राचे स्नान केले की तिन्ही लोकांतील तीर्थक्षेत्रांचे स्नान घडते असे जुनी माणसे म्हणतात आणि अमृताच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते, असेही म्हणतात. साक्षात समुद्रेश्वरच इथल्या कुंडात उभा आहे आणि त्याच्याच प्रेमामृताने 'सोनहिरा' वाहतो आहे. तिथे डुंबण्यातच माझे बालपण गेले. ते अमृत माझ्या पोटात आहे.

'सोनहिरा'ची ही अमृतभूमी म्हणजे माझे आजोळ ! माझा अंकुर अवतरला, तो इथे. या आजोळातच माझ्या आईचे नाव मला प्रथम समजले - आणि तेही वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी !

त्याचे असे झाले :

लहानपणी आम्ही भावंडे कराडच्या शाळेत शिकत असू; आणि मधून मधून आजोळी जात असू. मे महिन्याच्या सुटीत आजोळी जाणे हाच मुख्य कार्यक्रम. त्या मे महिन्यात माझा थोरला भाऊ  सहलीला गेल्याने मी एकटाच गेलो होतो. ताकारी गावावरून देवराष्ट्राला एक वाट जाते. मी एकटा असल्याने त्या वाटेने गेलो. वाटेत सागरोबाचे दर्शन हे व्हायचेच. मी सागरेश्वराशी पोहोचलो आणि टाक्यात हातपाय धुतले. प्रवासाचा शीण संपवण्याचा गावक-यांचा तो एक परिपाठ असे. थंड पाण्याचा शिपकारा अंगावर घेतला, की बस्स ! वेळ संध्याकाळची असावी. सागरोबाच्या दर्शनासाठी गावातली मंडळीही आली होती. देवराष्ट्रातील किंचुकाका कानेटकर हेही त्यांत होते. मला गावातली माणसे माहिती नव्हती. परंतु एखादा माणूस त्याच्या एखाद्या वैशिष्ट्यामुळे माहितीचा होतो आणि लक्षात राहतो, तसे किंचुकाका ! म्हाता-याची शेती-वाडी उत्तम. गावात जम चांगला ! आपल्याला सर्व माहिती असली पाहिजे, ही म्हाता-याची हौस ! या हौसेतून त्यांच्या सर्व चौकशा चालत. लोकही ही हौस आनंदाने पुरवीत.

सागरोबाच्या टाक्यातून ताजातवाना होऊन मंदिराजवळ येताच किंचुकाकांच्या दृष्टीस मी आलो.

'कुणाचा मुलगा, रे, हा?' किंचुकाकांची विचारणा झाली.
मी जरा थबकलो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org