ऋणानुबंध (21)

त्या भाषणांमध्ये माझा त्या काळचा आशावाद ओतप्रोत भरलेला दिसून येतो. पण त्या दिशेने आज प्रगती किती केली, हे जेव्हा पाहावयाचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या मनाला निराशा वाटते. विशेषत:, परवा मराठवाड्यात झालेली उग्र निदर्शने व दंगली पाहिल्या म्हणजे आमच्या आशावादाचा, तात्पुरता का होईना, पण पराभव झाला आहे, असे मला वाटते. या जातीयतेच्या अंधारामध्ये कोणालाही वर येता येणे शक्य नाही. का, कोण जाणे, निव्वळ या कामासाठी आयुष्य वाहून घेण्याची जरुरी आहे, असा तीव्र विचार माझ्या मनात येऊ न गेला. हे कार्य संपवायचे म्हटले, तर सर्वांनी पराकाष्ठा केली पाहिजे; नाही तर आमच्या या समाजात निराशेच्या अंधाराशिवाय दुसरे काहीच उरत नाही.

माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात गेल्या अनेक वर्षांच्या काळात एका गोष्टीसंबंधात वारंवार निराशेचा अनुभव घ्यावा लागला आहे. मला वाटते, माझा हा राजकारणातील अनुभव इतरांनासुद्धा आला असेल. राजकारणामध्ये यशस्वी होणे हे एक कष्टसाध्य काम आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचे जाळे विणावे लागते, माणसे सांभाळावी, वाढवावी लागतात व त्यासाठी असंख्यांच्या मनांची जपणूक वर्षोनुवर्षे करावी लागते. पण त्यांतले काही थोडे, पण मोठे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेला किंचितसा ओरखडा जाताच वैरभावाची फणा उभारतात. अशा स्वभावाचे काही नमुने पाहिल्यानंतर मी निराश होतो. मला राग येत नाही, पण निराशेचा मात्र तीव्र अनुभव होतो. मला वाटते, कदाचित हा जीवनाच्या खेळातील एक आवश्यक भाग असेल.

राजकारणात निदान सरळ रेषेत काहीच चालत नाही. कदाचित इतर क्षेत्रांतही चालत नसावे. सरळ रेषेची ही संकल्पना फक्त भूमितीतच पाहायची. वास्तव जीवनात दिसतात, त्या अनेक समांतर रेषा किंवा एकमेकांना छेदून त्रिकोण, चौकोन करणाऱ्या रेषा. हेही खरे आहे, की आकर्षक वळसे घेत मनोरम चित्ररेखा उभ्या करणाऱ्या रेषाही असतात. त्यांना विसरून चालणार नाही. जीवनाची ही वास्तविकता गृहीत धरूनच चालावे लागेल व ती हसतमुखाने स्वीकारल्यानेच मनुष्य निराशेच्या कक्षेबाहेर पडू शकेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org