ऋणानुबंध (164)

'पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची'

मी पुण्याला होतो; आणि ठरविले होते, की दिवस अगदी खाजगी भेटीगाठींत घालवायचा. कोणताही जाहीर कार्यक्रम घ्यायचा नाही. अप्पासाहेब फडक्यांना भेटलो. त्यांच्या आजारपणाबद्दल ऐकले, वाचले होते; असाच आणखी कोणाकोणाकडे गेलो. जायच्या ठिकाणांत अण्णांचे नाव होते. दुपारी एक वाजता माझ्या पुतण्याकडे आलो, तिथे अण्णांचा मुलगा श्री भेटला, त्याला म्हटले,
'श्री, अरे, अण्णांना भेटायचे आहे. पण आता उशीर झाला आहे. जरा फोन लावून दे, फोनवर तरी बोलतो.'

- आणि फोनवर बोललो. प्रकृतीची चौकशी केली; कारण फोनवरसुद्धा आवाज जरा जड वाटला, खोल वाटला. नेहमीसारखा मोकळा, दिलखुलास वाटला नाही. मनात ठरविले, की हे फोनवरचे बोलणे काही खरे नाही. पुढच्या वेळी अण्णांना भेटायचेच. श्रीजवळ तसे म्हटले. पुढे पुण्याहून परत आलो. नित्याचे व्यवहार चालू झाले. वाटाघाटी, चर्चा यांचे चक्र सुरू झाले. अण्णांच्या निधनाच्या बातमीचा फोन आला आणि तेही चक्र तुटले. टेलिफोनचा रिसीव्हर जड हाताने ठेवला. मनात म्हटले, 'अण्णा, फार लवकर गेलात.'

माझा आणि माडगूळकरांचा प्रत्यक्ष परिचय होण्यापूर्वीच त्यांच्या काव्याने मला त्यांच्या खूप जवळ नेले होते. १९४२ च्या चळवळीचे दिवस अण्णांनी वर्णन केल्याप्रमाणे खरोखरच 'मंतरलेले दिवस' होते. आम्हा भूमिगत कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी अड्डे असत. एक अड्डा होता कुंडल या गावी. या कुंडल गावातल्या एका बैठकीत मी माडगूळकर हे नाव प्रथम ऐकले. आमच्या या कुंडलच्या अड्डयावर शंकरराव निकम हे शाहीर यायचे. त्यांच्या मैफलीत काही सुंदर गाणी, पोवाडे यायला लागले, तेव्हा त्यांना विचारले,
'शंकरराव, फार छान गाणी आहेत, हो. कोणी केली?'

त्यांनी सांगितले, कोल्हापुरात माडगूळकर नावाचा एक तरुण आहे. पाहता पाहता काव्य करतो. आपला दोस्त आहे.

पुढे बरीच वर्षे माडगूळकरांच्या या बेचाळीसच्या गाण्यांशीच संबंध राहिला. मात्र मनातून सारखे वाटायचे, या कवीला भेटावे, त्याच्याशी बोलावे. मनाची तार जुळल्यासारखी वाटे, पण प्रत्यक्ष भेटीचा योग यायला पन्नास साल उजाडावे लागले. मुंबईत एका मित्राच्या घरी आम्ही दोघेही त्या दिवशी जेवायला एकत्र होतो. तेव्हा प्रत्यक्ष भेट झाली आणि मला माझा एक जिवलग दोस्त त्या दिवशी मिळाला. त्यांच्या बोलण्यातल्या मोकळेपणाने मला त्यांच्या खूप जवळ नेले. कदाचित आम्ही दोघेही माणदेशी माणसे, म्हणून आमचे हे सूत जमले, की काय, मला सांगता येत नाही. पण या बैठकीत सूत जमले आणि असे पक्के जमले, की विचारू नका. पुढे मग आमच्या बैठका वारंवार होऊ लागल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org