ऋणानुबंध (15)

ज्याचा खुलासा करता येत नाही, ज्या घटनांचे संदर्भ सामान्यत: जुळविता येत नाहीत, असे योगायोगाचे क्षण माझ्या संग्रही किती तरी दाखल झाले आहेत. त्यांमध्ये मला असे आढळून येते, की माझ्या पुरुषार्थाचे श्रेय पूर्णांशाने स्वीकारण्यास प्रत्येक वेळी मी नाखुशीने सिद्ध झालो आहे. अगदी कॉलेज-शिक्षणापासून मी हे अनुभवतो आहे. कॉलेजमध्ये जाऊन काय करायचे आहे, असा माझा मूळचा विचार. कॉलेजमध्ये गेल्यानंतर शिक्षणाचे पुढचे सर्व जमेल, न जमेल, अशी शंका वाटत असे. इच्छा होती, पण मार्ग नव्हता, अशी त्या वेळची स्थिती; परंतु एक दिवस अचानक माझे एक मित्र घरी आले. इतर चौकशीबरोबरच त्यांनी माझ्या कॉलेज-शिक्षणासंबंधीही चौकशी केली. 'कॉलेजला जाणार नाहीस का?' या प्रश्नास मी 'जाणार आहे' असे उत्तरही दिले; परंतु या उत्तराने मला नंतर अडचणीत टाकले. कॉलेजला जाण्यात माझ्यासमोर जी अडचण होती, ती मला सांगता येईना. जुजबी बोलणे होऊन माझे मित्र निघून गेले. परंतु पुन्हा जे परतले, ते मला कोल्हापूरला कॉलेजला नेण्याच्या तयारीनेच आले. मी त्यांच्याबरोबर कोल्हापूरला मुकाटपणे गेलो. त्यांनी तेथे राहणे, जेवणे, फी, पुस्तके व इतर खर्च या सर्वांची तरतूद केली आणि मगच ते परतले. कॉलेजचे शिक्षण सुरू होण्याचा तो क्षण मी विसरूच शकत नाही. गावात शिरून मोठमोठ्या हवेल्या पाहिल्या, तरी जेथून गावात शिरलो, ती गावाची वेस विसरायची नाही, ही कृतज्ञता मला त्या क्षणाने शिकविली आहे.

पार्लमेंटरी सेक्रेटरी-पद माझ्याकडे आले, तेही योगायोगाने !

पार्टी-मीटिंगसाठी मी मुंबईला आलो होतो आणि माधवाश्रमात राहिलो होतो. त्यापूर्वी दोन-तीन वेळा मी मुंबईला आलो असेन. परंतु या खेपेला मुंबईत थोडे दिवस राहून नातेवाइकांना, मित्रांना भेटावयाचे, 'जिवाची मुंबई' करावयाची, असे मनाने घेतले आणि मी राहिलो. मुंबईला मोटारीतून हिंडणारेही माझे काही जवळचे मित्र होते. एक दिवस सकाळीच दहाच्या सुमारास माझे दोन मित्र माधवाश्रमात आले आणि मोटारीतून फिरावयास जावयाचे, म्हणून मला त्यांनी बाहेर काढले. त्या वेळच्या काळात मुंबईत आणि अशा प्रकारे मोटारीतून मनमुराद फेरफटका करणे हे माझ्यासारख्या ट्रॅम-बसच्या प्रवाशाला काही वेगळेच आकर्षण होते. ब-याच लांबची धाव झाली, परंतु मुंबईतच फिरत असल्याने आपण कुठे चाललो आहोत, असे मला विचारावेसे वाटले नाही. मोटार उपनगराच्या दिशेने धावू लागली, तेव्हा मी सहज विचारले,
'हा कोणता भाग?'
त्यांनी सांगितले,
'खार !'

- आणि आम्ही त्यानंतर काही बोलत आहोत, तोच मोटार एका टुमदार बंगल्याच्या आवारात शिरली. आपण कुठे आहोत, हे मी विचारण्यापूर्वीच तेथील चपराश्याने मोटारीचे दार उघडले.

मी जो खरा गोंधळून गेलो, तो त्या पुढच्या घटनेने !

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org