ऋणानुबंध (139)

दुसरा एक मुद्दा दलित साहित्यासंबंधी सांगण्यासारखा आहे. उपेक्षित सामाजिक स्तरांच्या भावनांची जी कोंडी इतकी वर्षे झाली होती, ती आज फुटली आहे. त्याचा सामाजिक सुधारणेसाठी व सामाजिक प्रक्रियेसाठी उपयोग होईल. जी समाजसंस्था जुनी झाली आहे, तिच्याविषयी संबंधित सामाजिक गटांना काय वाटत होते, तिचा जाच त्या गटांना कसा होत होता, त्यांचा सामाजिक अनुभव काय होता, याचे जे दर्शन या साहित्यातून घडते, ते सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. सामाजिक वास्तवता कितीही कठोर व कटू असली, तरी ती समाजसुधारकाला पाहावी लागते. एखाद्याच्या रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टरला जशी माहिती हवी असते, तसेच हे आहे. म्हणून हे साहित्य हा आरसा आहे. त्याचा सामाजिक उपयोग होण्यासारखा आहे. केवळ साहित्यबाह्य निकष लावून जरी या साहित्याचा विचार केला, तरी ते मोलाचे आहे.

मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने साहित्यिकांनी विचार करण्यासाठी मी आणखी दोन मुद्दे मांडतो. ते म्हणजे मराठी वाङ्मयाची गुणवत्ता आणि विस्तार. दोन्ही दृष्टींनी त्याचा अन्य भारतीय भाषा आणि प्रगत जागतिक भाषा यांच्याशी सांधा जुळविणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य इंग्रजी वाङ्मयानेच सामान्यत: आपल्यावर संस्कार केले आहेत. त्यांचे अनुकरण गेल्या शे-दीडशे वर्षांत आपण करीत आहोत. मला वाटते, जगातील अनेक राष्ट्रे मुक्त झाली आहेत, त्यांच्या विचारधनाचा, ललितवाङ्मयाचा परिचय, त्यांचे संघर्ष आपल्या भाषेत आणणे आवश्यक आहे. विशेषत:, आशिया व आफ्रिका यांतील साहित्याचा, त्यातील विचारांचा परिचय मोठ्या प्रमाणात करून घेणे आवश्यक आहे. आपल्या मनाचे जे पश्चिमीकरण झाले आहे, ते ऐतिहासिकदृष्ट्या अपरिहार्य असले, तरी आता योजनापूर्वक इतर विश्वसाहित्याचा व्यापक व सखोल अभ्यास झाला पाहिजे.

जसे विश्वसाहित्याविषयी आपण उदासीन राहता कामा नये, तसेच आपण भारतीय भाषाभगिनींकडे दुर्लक्ष करता कामा नये. गेल्या काही वर्षांत सर्वच भारतीय भाषा कमी-जास्त प्रमाणात विकसित झाल्या आहेत. त्यांच्यातील नव्या प्रवाहांची ओळख आपण करून घेतली पाहिजे. भारतीय साहित्य नावाची संकल्पना त्यातून साकार होत आहे. भारतीय साहित्य म्हणजे वेगवेगळ्या भाषांतून लिहिल्या जाणा-या सामाजिक अनुभवाचा आरसा असेल. मी केवळ राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने राष्ट्रीय साहित्य आवश्यक आहे, असे म्हणत नाही. पण ज्ञानेश्वर, तुकाराम आणि कबीर भारतीय कवी आहेत, असे मी मानतो. याचे कारण भारताच्या अंतरंगाचे दर्शन त्यांचे साहित्य घडविते. आधुनिक काळात शरच्चंद्र किंवा ह. ना. आपटे हे जसे या राष्ट्रीय उष:कालाचे कादंबरीकार होते, तसेच आता राष्ट्रीय प्रबोधनाचे साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत. भारतीय संगीत, भारतीय रंगभूमी या संकल्पना आता जशा रूढ होत आहेत, अशी भारतीय साहित्य ही संकल्पना आता रूढ झाली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org