ऋणानुबंध (126)

तत्त्वचिंतक रचनाकार

कै. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या जीवनाला कृतार्थ जीवन म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकात, आपले विशिष्ट ध्येय निवडून, त्याला जीवन वाहून घेऊन निग्रहाने सेवा करणाऱ्या ध्येयवादी पुरुषांची जी परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली, त्याच परंपरेचे डॉ. गाडगीळ हे प्रतीक होते. डॉ. गाडगीळांवर न्या. रानडे, लो. टिळक व गोपाळराव गोखले या तिघांचे संस्कार झाल्यामुळे त्यांना समग्र व्यक्तित्व प्राप्त झाले होते. न्या. रानड्यांची शास्त्रीय दृष्टी, गोखल्यांची सखोल व चौफेर व्यासंगी वृत्ती व टिळकांची लोकाभिमुखता, कठोर व निग्रही बाणा यांच्या संस्कारांतून गाडगीळांचे व्यक्तित्व घडविले गेले होते. त्यामुळे गाडगीळ, महाराष्ट्रात व भारतात राजकीय स्थित्यंतराबरोबर जी तितकीच महत्त्वाची सामाजिक व आर्थिक क्रांती होत होती, तिचे द्रष्टे पुरुष ठरले.

पण केवळ बौद्धिक सखोलता किंवा द्रष्टेपणा एवढेच गाडगीळांचे वैशिष्ट्य नव्हते. गाडगीळांनी केवळ तत्त्वचिकित्सा किंवा बौद्धिक काथ्याकूट केला नाही. गाडगीळांची प्रतिभा व प्रज्ञा सर्जनशील होती. एखाद्या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा ते करीत आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एखादी योजना व आराखडा सुचवत, सैद्धान्तिक आग्रह व त्याला जोडून कार्यक्रम, असे त्यांचे नियोजन असे. त्यातूनच त्यांची सामाजिक समीक्षा, व्यवहारी दृष्टी याचा प्रत्यय येत असे. या सर्व चिंतनाची मूळ प्रेरणा समाजहित ही होती. दरिद्रि बहुजन-समाजाच्या हितासाठी, सुखासाठी गाडगीळांनी काही आग्रह धरले. एका अर्थाने गाडगीळ 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' या थोर तत्त्वाचे प्रतीक होते. त्यांच्या उपाययोजनेशी मतभेद झाले, तरी त्यांची जी आधारभूत सामाजिक दृष्टी होती, तिच्याबद्दल कधीच कोणाला शंका वाटली नाही. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या ज्या वर्गात आपण जन्मतो व वावरतो, त्याच्या पलीकडे जाऊन बहुजन समाजाच्या सुखदु:खांशी समरस होणे किंबहुना त्याच्याच दृष्टिकोनातून सर्व प्रश्नांकडे पाहणे, त्यासाठी कार्यशील होणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.म्हणूनच गाडगीळांनी महाराष्ट्रातील व भारतातील बुद्धिमंतांत स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करून ठेवले आहे. डॉ. गाडगीळांच्या जीवनाची व व्यक्तित्वाची ही जी बैठक होती, तीतूनच त्यांचे जीवनकार्य साकार झाले. हे करत असताना गाडगीळांच्या संघटनकौशल्याची प्रचीती महाराष्ट्राला आली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org