ऋणानुबंध (12)

मी वस्तीवर पोहोचलो तेव्हा कडुसे पडले होते. वाढत्या अंधकारात झोपड्यांतील मिणमिणते दिवे वातावरणाला उजाळा देण्यास असमर्थ होते. काळ्या रानातील त्या काळ्या अंधारात नेहमी तासन् तास तारकांशी खेळ खेळणारा मी त्या रात्री तारकापुंजात जतींद्रनाथ मला कुठे दिसतात का, हे शून्य दृष्टीने पाहत होतो. पोटात भूक असूनही अन्नावरची वासना उडाली होती. तहान-भूक हरपलेल्या स्थितीत मी एकच एक करीत होतो ... एकसारखा रडत होतो. आई समजावीत होती; आणि मी रडत होतो.

अशा स्थितीत रात्र सरली, पण माझे रडणे सरले नाही. मातेचे मऊ मन माझ्यामुळे मुरगळून गेले होते. कलकत्त्याचे कोणी तरी निधन पावले, म्हणून मी दु:ख मानावे, हे आईला समजत नव्हते. माझ्या केविलवाण्या मन:स्थितीचा तिच्यावर वेगळाच परिणाम झाला. 'मुलाला काय झाले आहे पाहा हो, याला कोणाला तरी दाखवा हो.' असे ती शेजा-यांना म्हणत होती. मी सारे समजत होतो, पण माझे मन आईला कसे खुले करून दाखवावे, हे मला उलगडत नव्हते.

जतींद्रांच्या देहातील राष्ट्रीय स्वातंत्र्याचे प्रखर तेजोवलय माझे अंत:करण छेदून गेले आहे, हे मी त्या माऊलीला कसे समजावून सांगणार होतो !

एवढे मात्र खरे, की त्या घटनेने माझ्या चित्तवृत्तींत बदल झाला. देशात घडणा-या घटनांचे अर्थ मला अधिक जवळचे वाटू लागले. मी त्यांचे अर्थ समजावून घेण्याच्या मन:स्थितीपर्यंत पोहोचलो. कराडचे आमचे त्या वेळचे नेते श्री. बाबूराव गोखले, सदाशिवराव आळतेकर, त्यांचे चिरंजीव गणपतराव आळतेकर, माझ्या शाळेतील राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षक या सर्वांचे व्यक्तिमत्त्व माझ्या मनावर काही एक वेगळा संस्कार घडवीत होते. ते बोलत असत, ते मी मनाने टिपत होतो. त्या दृष्टीने १९२७ ते १९४० हा बारा-पंधरा वर्षांचा काळ शिक्षणाबरोबरच माझी राजकीय मनोभूमी तयार होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या काळात चळवळ, तुरुंगवास, वैचारिक खळबळ अशा किती तरी घटना घडल्या. मनाला हेलकावे देणारे, मनात विचारांचे द्वंद्व निर्माण करणारे असे अनेक प्रसंग या काळात उद्भवले. अचूक निर्णय घेणे हे शक्तीबाहेरचे ठरत होते. पण अशा प्रत्येक वेळी मला मित्रांची बहुमोल मदत मिळाली आहे.

१९३०च्या चळवळीत मी जेव्हा सहभागी होतो, त्या वेळी चर्चेच्या आमच्या मैफली रंगत असत. मी माझ्या बरोबरच्या मित्रांशी वाद घालीत असे. मित्रांच्या बाबतीत मी मोठाच नशीबवान ठरलो आहे. आजसुद्धा आहे. मला असे मित्र लाभले, की माझ्यासाठी ते वैयक्तिक महत्त्वाकांक्षा विसरले, त्यांनी आपली मते बाजूला ठेवली, माझ्यासाठी त्यांनी परमावधीचा त्याग केला. किंबहुना, माझे व्यक्तिमत्त्व हे माझ्या सर्व मित्रांच्या आशीर्वादाचे आणि प्रयत्नांचे दृश्यरूप आहे, असेच मी मानतो. मी शिकत होतो, तेव्हापासून मित्र माझे पाठीराखे आहेत. पैशाच्या दृष्टीने माझ्याजवळ तसे पैसे कधीच नव्हते, परंतु मला ते कमी पडले, असे कधी घडले नाही; आणि इतके असूनही माझा सल्ला ऐकण्यात मित्रांनी आजवर कधी कसूर केलेली नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org