ऋणानुबंध (99)

पं. नेहरूंचा प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग मी मुंबई सरकारचा पुरवठामंत्री असताना आला. रफी अहमद किडवाई केंद्रीय पुरवठामंत्री होते व निर्नियंत्रणासंबंधीचे धोरण ते आखत होते. त्यासंबंधीच्याच काही चर्चेसाठी मी दिल्लीला गेलो होतो. मुंबईत तेव्हा रेशनिंग चालू होते व आम्ही ते काटेकोरपणे चालवीत होतो. निर्नियंत्रणानंतर मुंबई शहराच्या धान्यपुरवठ्यासंबंधी काही प्रश्न निर्माण होणार होते. किडवाईसाहेबांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतरही त्यातून जेव्हा काही निष्पन्न झाले नाही, तेव्हा त्यांच्याच सल्ल्यानुसार मी पंडितजींना भेटलो. जवळजवळ तास-दीड तास, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुंबई शहराला रेशनिंगच्या काळात मिळत असलेले धान्य पुढेही मिळत राहिले पाहिजे, हा माझा मुद्दा मी पंडितजींना पटवून देऊ शकलो, याचा जसा मला आनंद झाला, त्यापेक्षा त्यांच्याशी आपला परिचय झाला, याचा आनंद, नाही म्हटले, तरी माझ्या मनात भरून राहिला होता. त्या आनंदाने भरलेल्या मनानेच तेव्हा मी दिल्लीहून परतलो होतो.

१९५२ साली माझा पंडितजींशी प्रत्यक्ष परिचय झाला; पण १९५६ पर्यंत या परिचयाचे स्वरूप केवळ औपचारिक होते. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न उपस्थित झाला आणि हा परिचय अधिक वाढत गेला आणि त्याची परिणती शेवटी १९६२ साली त्यांनी मला आपला एक विश्वासू सहकारी व तरुण मित्र मानण्यात झाली.

या सर्व कालखंडातील पं. नेहरूंच्या अनेक आठवणींची गर्दी आज माझ्या मनात उसळली आहे. धाकट्या भावावर प्रेम करावे, तसे त्यांनी माझ्यावर प्रेम केले. माझ्यावर अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी विश्वास टाकला. ते प्रेमाचे व विश्वासाचे अनंत क्षण माझ्या स्मृतिपटलावर तेजस्वी
ता-यांसारखे लखलखत आहेत. १९५६ साली द्वैभाषिक राज्याची जबाबदारी मी स्वीकारली, तेव्हाचा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे.

मंत्रिमंडळ बनविण्यासंबंधीची चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. चर्चा संपवून पंडितजींचा निरोप घेण्याची वेळ आली, तेव्हा मी त्यांना म्हटले,
'फार कठीण कामाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. आपले आशीर्वाद मला हवेत.'
जवाहरलालजी एकदम गंभीर झाले. बरोबर चालता चालता म्हणाले,
'माझे आशीर्वाद इतके स्वस्त नाहीत. काम कठीण तर आहेच; पण तुम्ही ते कसे करता, पाहू या.'

मी तर परिस्थितीचे आव्हान स्वीकारूनच माझे काम पार पाडत होतो. त्याचे वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचतच होते. या काळात त्यांच्या ब-याच भेटीगाठी होत; पण १९५७ मधील एका भेटीत जवाहरलालजींनी त्या प्रसंगाचा एकदम उल्लेख केला आणि आठवणीने मला आशीर्वाद दिले. आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. माझ्या अल्पशा कार्याला मिळालेली ती फार मोठी पावती होती. माझ्या मनाच्या संदुकीत मी ती अगदी जपून ठेवली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org