ऋणानुबंध (96)

त्यांची इंग्रजी भाषा इंग्रजानाही मोहित करणारी होती. किमान शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याचे त्यांचे कसब विलक्षण होते. विचारमौक्तिकांच्या सरी डोळ्यांसमोर येत आहेत, असे वाटे. त्यांची शब्दकळा दार्शनिकाची होती. वाणी 'सुभाषित' वाणी होती. संस्कृतमधील अर्थपूर्ण व समयोचित वचने हे तर त्यांचे खास वैशिष्ट्य होते. पण त्यांची ही उद्धृते बाहेरून जोड लावल्यासारखी वाटत नसत. विचारांच्या विणीत बसविलेली असत. डॉ. राधाकृष्णन् यांचे शब्दलावण्य, विचारगांभीर्य व अर्थघनता आणि या सर्वांना आपल्या बरोबर खेचून नेणारा त्यांचा ओघ ही त्यांच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्ये प्राध्यापकीय नव्हती. खरे तर ते ईश्वरी देणे होते. - आणि या ओघवत्या वाणीवरून जन्मभर लक्षात राहील, अशी एक आठवण सांगण्यासारखी आहे.

काही वर्षांपूर्वी मी जागतिक बँकेच्या बैठकीसाठी वॉशिंग्टनमध्ये होतो. बैठकीच्या एका संध्याकाळी अधिकृत स्वागत-समारंभ होता आणि या समारंभात अक्षरश: शेकडो माणसे होती. भरलेले ग्लास घेऊन इतस्तत: हिंडणारे वेटर्स, हास्यविनोदाची खळखळ, गटागटाने चाललेल्या संभाषणांच्या आवाजाने, खरे म्हणजे, काही ऐकावयासही येणे अवघड. अध्यक्षांना भेटून हस्तांदोलनाने हजेरी देऊन मी अधूनमधून भेटणा-या ओळखीच्या चेहऱ्यांना मानेने दाद देत देत बाहेर पडणा-या दरवाजाकडे निघालो होतो.

- आणि इतक्यात, वाटेत पासष्ट-सत्तर दरम्यानच्या एका गृहस्थाने मला अडविले आणि त्याने आपले नावही सांगितले. परंतु मला त्या गोंगाटात स्पष्ट ऐकू आले नाही. त्याने मोठ्या आवाजात सांगितले,

'मला तुम्हाला एक प्रश्न विचारावयाचा आहे.'
मी त्या गृहस्थाचा हात हातात घेतला व प्रवेशद्वाराजवळ त्याला नेले. तेथे गोंगाट कमी होता. संभाषण शक्य होते. मी त्यांना म्हटले,
'जरूर विचारा तुमचा प्रश्न.'

मी सुटाबुटात होतो; परंतु डोक्यावर गांधी टोपी होती. त्या टोपीकडे किंचितसे पाहत त्यांनी विचारले,
'तुमचे ते तत्त्वज्ञानी प्राध्यापक प्रेसिडेंट डॉ. राधाकृष्णन् सध्या कुठे असतात?'

मी सांगितले,
'आता ते निवृत्त झाले आहेत व वृद्धापकाळामुळे आजारी अवस्थेत मद्रासमध्ये असतात.' मी विचारले, 'आपले काही काम? काही निरोप आहे त्यांच्यासाठी?'
'नाही, नाही, निरोप वगैरे काही नाही. माझी त्यांची ओळखही नाही. तीस वर्षांपूर्वी लंडनमध्ये माझ्या तरुणपणी मी त्यांचे एक व्याख्यान ऐकले आहे. अशी ओघवती वाणी मी पुन्हा ऐकलेली नाही. मी तुमचा हिंदुस्थान पाहिलेला नाही. पण त्या भाषणामुळे I can well imagine what the flow of the Ganges must be like. Oh, what a pity, he is old and ill.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org