ऋणानुबंध (89)

टॉलस्टॉयनी स्वत:च येथील वृक्षांना 'जीवन' दिले आहे आणि आपल्या धन्याचे जीवन त्या महावृक्षांनीही आत्मसात केलेले आहे - इतके, की यांतील अधिक गंभीर कोण, असा प्रश्न पडावा ! टॉलस्टॉयना वृक्षारोपणाचा छंद होता ! घनदाट वृक्षराजीच्या सान्निध्यात आनंदाचे साम्राज्य उभे असते, असे कोणी तरी त्यांच्या कानात कुजबुजले असले पाहिजे. कारण बालपणीच त्यांनी बीजारोपणास सुरुवात केली आणि दोघे मग सारखेच वाढत गेले. निसर्गात राहावे आणि निसर्गमय व्हावे, असेच वाटत असले पाहिजे. समाधिरूपाने आज ते तसेच राहत आहेत. त्यांच्या समाधीचे मी दर्शन घेतले. त्या समाधीच्या ठिकाणी मला काही भव्य आढळले नाही; पण दिव्य अनुभूती मात्र जरूर मिळाली. समाधी अगदी उघड्यावर आणि उघडीच आहे. चार भिंतींनी ती कोंडलेली नाही. तेथे छायाचित्र नाही, कसली खूण नाही - अगदी अनामिक ! एखादा सामान्य जीव येथे झोपला आहे, असे वाटावे ! तिथे कसले बंधन नाही. कोणाचा पहारा नाही. दर्शनासाठी कोणाला प्रतिरोध नाही. महापुरुषाच्या समाधीची कृत्रिम भव्यता तिथे नाही - पण असे असले, तरी जे आहे आणि जसे आहे, ते उदात्त, पवित्र आणि ईश्वरीय आहे.

समाधीला स्पर्श करून येथून जाणारा वारा, जगाच्या कोनाकोप-यापर्यंत येथील कीर्ति-सुगंध पसरवीत असतो. त्या सुगंधाने मोहित होऊनच मी येथे आलो. या तीर्थस्थानी आल्यावर टॉलस्टॉय यांनी आपल्या अमर सुगंधी साहित्यात ओतलेली मानवता माझ्या दृष्टीसमोर साकार झाली. मला ऍना कॅरेनिना दिसू लागली, 'रिसरेक्शन'मधील कटुशाला मी येथे बघितले; आणि या व इतर असंख्य 'मानवी' पात्रांच्या द्वारे त्यांनी जी मानवता आपल्या अक्षर साहित्यातून निर्माण केली, तिचे दर्शन मला येथे घडले. टॉलस्टॉय हे 'वांझोटे' शब्द लिहिणारे लेखक नव्हते, तर मानवताप्रेमाने ओल्याचिंब झालेल्या लेखणीतून अंत:करणातील शब्दांना सहानुभूतीचे रूप देऊन, त्यांच्या द्वारे मानवतेला अमर संदेश देणारे ते दैवी प्रतिभेचे साहित्यिक होते. त्या प्रतिभेचा साक्षात्कार मला येथे घडला. टॉलस्टॉयची ही समाधी वरकरणी नामहीन आहे, मौनरूप आहे; पण अंतर्यामी बोलकी आहे. साक्षात्कारी आहे.

मला हे स्थान अतिशय आवडले. टॉलस्टॉयच्या सहवासात मला तिथे महात्माजी भेटले. रवींद्र भेटले. हे एक शांति-निकेतन आहे. ते देवस्थान नाही, पण ज्ञानदेवांचे निवासस्थान आहे. केवळ स्पर्श झाला, की ज्ञान-समाधी लागावी, अशी ही भूमी ! जीवन्मुक्ताची समाधी असावी, तर अशी ! दवबिंदूंनी निथळावी, सुगंधी वायूने रुंजी घालावी आणि वृक्षांनी चामरे ढाळावी !! सर्वांपासून दूर ... अगदी मुक्त !! रशियात मी पुष्कळ पाहिले. शेकडो वर्षांचा इतिहास असलेले लेनिनग्राड पाहिले. आजच्या रशियन जीवनाची जिद्द पाहिली, विज्ञानाची प्रतीके पाहिली, शस्त्रे पाहिली, अस्त्रे पाहिली, ते निर्माण करणारा समाज पाहिला - पण मी जो विचार करतो आहे, तो फक्त त्या भस्मांकित व्होल्गाग्रीडच्या त्या मायलेकरांचा !! ....

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org