ऋणानुबंध (84)

पुष्पचक्र वाहिले - दर्शन झाले आणि रशियातील दौ-याचा श्रीगणेशा झाला.

भारताच्या संरक्षण-सिद्धतेविषयी सरकारी वरिष्ठ पातळीवरून अधिकृत चर्चा, पाहणी आणि करारमदार हा या दौ-याचा प्रधान हेतू - ते सर्व यथासांग पार पडले. रशियाचे पंतप्रधान (त्या वेळचे) श्री. ख्रुश्श्योव्ह यांच्या भेटीत आणि चर्चेत ठरावयाचे ते ठरले. तिथे ते बिनबोभाट झाले. तिथला सारा अंतर्गत कारभार आणि हालचाली या बिनबोभाटच चालतात. मी भारतात परत येऊन पाच आठवडे उलटतात, तोच ख्रुश्श्योव्ह यांच्या बिनबोभाट निवृत्तीची, जगाला धक्का देणारी घटना घडली. पण भारतात लोकशाही आहे. जे ठरले, ठरणार, त्याचा बोभाटा झालाच पाहिजे. त्याप्रमाणे तो येथे झालेलाच आहे. त्याची वाच्यता पुन्हा कशाला?

कडेकोट बंदोबस्तातील चर्चेच्या जोडीला मोकळेपणाने फिरण्याचाही एक भाग या दौ-यात होता. सरकारी पाहुणे म्हणूनच; परंतु रशियाच्या खुल्या मैदानातील इतिहास-भूगोल पाहण्याचा त्यात अंतर्भाव होता. त्यासाठी विमान, मोटार, आगगाडी यांच्या प्रवासाबरोबर प्रसंगी नौकानयनही केले. मॉस्को, लेनिनग्राड यांच्या जोडीला यस्ना-पलाना, व्होल्गागार्ड, अस्त्रखान, सिंफरपोल, फ्रुन्झेन्स्को सॅनिटोरियम्, याल्टा, आदी ठिकाणी भेटी-गाठी झाल्या. या दौ-यात अमाप निरीक्षण केले. शेतापासून अंतराळापर्यंतची विज्ञानाची सर्व दालने मॉस्को येथील प्रदर्शनात आढळली.

विज्ञानाने आज अंतराळ ठेंगणे केले आहे. जगाचा संकोच केला आहे. वैज्ञानिक हा तिन्ही जगांचा स्वामी ठरला आहे. त्याने एखाद्या विवक्षित ठिकाणी अंगुली दाबावी आणि क्षणार्धात जगही होत्याचे नव्हते व्हावे, अशी शक्ती त्याने पैदा केली आहे. हे सर्व आश्चर्यकारक तर खरेच !

पण रशियाच्या मातीत हिंडताना मी जो दिङ्मुढ झालो, ते वेगळ्याच कारणाने. काय असेल, ते असो; पण माती आणि माता यांच्याशी एकरूप होणे हा माझा जन्मजात स्वभाव आहे. तीर्थतुल्य मातेच्या दर्शनाने माझे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात. अंतर्मन निथळू लागते. पौर्णिमेच्या चंद्रातून अमृतबिंदू ठिबकावेत, तशी तिची प्रेमळ दृष्टी माझ्यावर वर्षाव करते आणि न कळत पायगत झालेल्या पापण्या, हृदयाच्या चौफाळ्यावरील पावले धुंडाळू लागतात. ही ध्यानधारणा माझ्या अंगवळणी पडली आहे.

लहानपणी मी संगमावर बसत असे. कोठून तरी येणारे आणि कोठे तरी जाणारे ते 'जीवन' मी रोज पाहत असे. कोणासाठी तरी ते धावत होते. त्यात खंड नव्हता. त्या 'जीवनाला' एक लय होती. पण ते लयाला गेलेले मी कधीच पाहिले नाही. ते जीवन नित्य नवे होते. त्याचा जिव्हाळा कधी आटला नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org