ऋणानुबंध (70)

सबंध कृष्णाकाठ हा एक माझ्या प्रेमाचा, आवडीचा विषय आहे. महाबळेश्वरात, उगमापासून निघून, कृष्णेच्या काठाकाठाने थेट राजमहेंद्रीपर्यंत - तिच्या मुखापर्यंत जावे, असे माझे फार दिवसांचे स्वप्न आहे. बदलत्या पात्राची भव्यता पाहावी, निसर्गशोभा मनात साठवावी, गावोगावच्या लोकांना भेटावे, त्यांच्या चालीरीती पाहाव्यात, पिके डवरलेली शेती पाहावी, असे सारखे मनात येत असे. अजूनही येत राहते. श्रावणसरी कोसळू लागल्या, की कृष्णामाईची याद मनात हटकून येते.

श्रावण सुरू झाला, की आणखी एक आठवण मनात येते. ही आठवण होते 'आगाशिव' डोंगराची. कराडपासून दीड-दोन मैलांवरील हा आगाशिव. डोंगरावर महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे आणि लेण्या आहेत. दर श्रावण सोमवारी पुष्कळ शिवभक्त आगाशिव चढून महादेवाच्या दर्शनासाठी जात असतात. मुलांना आनंद असतो, तो लेण्या पाहण्याचा आणि दिवसभर डोंगरावर भटकत राहून निसर्गाच्या सोबतीने खेळण्याचा. आम्ही विद्यार्थी शनिवार-रविवार गाठून हमखास जात होतो. एकदा ज्ञानकोशकार केतकर यांना आगाशिव पाहण्यासाठी नेल्याची एक गोड आठवण माझ्या मनात कायमची राहिली आहे. कराडच्या हायस्कूलमधील गणेश मंडळाचा त्या वेळी मी चिटणीस होतो. ज्ञानकोशकार केतकर उत्सवातील व्याख्याते म्हणून त्या वेळी कराडला आले होते. बोलता बोलता 'आगाशिव'चा उल्लेख निघाला, तेव्हा तो डोंगर, ते स्थान एकदा पाहावे, असे केतकरांच्या मनाने घेतले. माझ्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. केतकरांचे वय झालेले, त्यांना डोंगर चढण्याचे श्रम मानवतील का, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. त्यांना मी तसे सांगितलेही. परंतु केतकरांची उमेद दांडगी. 'हो, हो; मी डोंगर चढू शकेन.' त्यांनी होकार भरला आणि वेळ ठरवून आम्ही मग आगाशिवच्या मार्गाला लागलो. आम्ही डोंगर चढू लागलो आणि थोड्याच वेळात माझी धास्ती खरी ठरली. पायथ्याचा थोडासा भाग केतकर आमच्या बरोबर चढले आणि मग पार थकले. संपूर्ण डोंगर चढून जाण्याचे लक्षण दिसेना. त्यांना ते झेपणारेही नव्हते. थकल्याने ते थांबले आणि एका दगडावर बसले. मी विचार करू लागलो. आम्हाला तर डोंगरावर जायचे होते. लेण्यांत पोहोचायचे होते.

'तुम्ही आता असे करा, इथेच झाडाखाली विश्रांती घ्या', मी केतकरांना सुचविले, केतकरांनाही ते मान्य दिसले. त्यांना मग विश्रांतीकरिता थांबवून आम्ही मुले पुढे गेलो. आगाशिवला मी दरसाल जात असे. परंतु त्यामध्ये ज्ञानकोशकारांच्या बरोबर आगाशिवला गेल्याची आठवण मात्र मनात कायमची राहिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org