ऋणानुबंध (68)

केल्याने देशाटन

संगम जिथे कुठे झालेला असेल, ते ठिकाण माझ्या आवडीचे असते. मला ते रम्य वाटते. स्फूर्ती देणारे, जीवनाचा एक वेगळाच अर्थ सांगणारे, असे भासू लागते. नद्यांचा संगम झालेले स्थान हिंदुस्थानात पवित्र मानले जाते; पण ते धार्मिक अर्थाने. मला ते भौतिक दृष्टीने पवित्र वाटते. ते मनाला काही वेगळेच सांगत असते. दोन नद्या एकात एक मिसळतात, तेव्हा दोन शक्तींचे मीलन झाल्याचे ते दर्शन असते. दोघी एक होऊन, एकरूप, एकजीव होऊन पुढे जातात आणि हजारोंचे जीवन संपन्न करीत असतात.

माणसामाणसांचे असे मीलन होईल, विचारांचा संगम होईल आणि माणसे एकजीव बनून कर्तृत्व करतील, तर सारेच सुखाने नांदतील, त्यांचे जीवन संपन्न बनेल; राग, द्वेष, स्पर्धा, शत्रुत्व त्या संगमात मिसळून-विरघळून जातील आणि विशुद्ध जीवनाचा स्रोतच पुढे जात राहील, असे निसर्गाने निर्माण केलेल्या संगमाच्या ठिकाणी उभे राहिले, की माझे मन सांगू लागते.

कृष्णा-कोयनेच्या प्रीती-संगमाच्या सान्निध्यातच मी लहानाचा मोठा झालो. खेळलो. बागडलो. त्या संगमात डुंबलो. त्याचाही हा परिणाम असेल कदाचित. श्रावणातला हर्षाचा पाऊस पडून गेलेला असावयाचा; पृथ्वीचा उत्साह ओसंडू लागावयाचा. कृष्णा-कोयनेची ऐन पावसाळ्यात गढूळ झालेली पात्रे काहीशी निवळलेली असावयाची आणि ते निवळशंख जीवन एकजीव बनून, पात्राचे दोन्ही काठ धरून भरल्या उभारीने संथपणाने पुढे चाललेले पाहून नदीच्या पात्राप्रमाणे मनही आनंदाने काठोकाठ भरून जात असे. वरून संथ दिसणा-या या प्रवाहाची अंदर की बात काही वेगळी असल्याचे नावाडी सांगत असत. त्यांचे म्हणणे, वरून प्रवाह संथ दिसतो, परंतु पाण्याला आतून ओढ चांगलीच असते. शक्य आहे; लक्षावधींचे जीवन संपन्न करण्यासाठी निघालेला प्रवाह, त्याच्या आंतरमनात वेगाने पुढे जाण्याची ओढ असणारच !

श्रावणातला शेवटचा सोमवार आमचा मोठा आनंदाचा दिवस असावयाचा. माझ्या लहानपणी, कराडला कृष्णेच्या तुफान भरलेल्या पात्रात नावांच्या शर्यती होत असत. दिवस ठरलेला - शेवटचा श्रावणी सोमवार. शर्यत अशी असावयाची, की प्रवाहात नाव सोडल्यानंतर सरळ रेषेत नावेने पलीकडचा तीर गाठावयाचा. सरळ रेषेत पल्याड तीरावर पोहोचावयाचे, ही त्यांतील प्रमुख अट. जी नाव सर्वांत प्रथम पोहोचेल, तिने ती शर्यत जिंकली, असा निकाल जाहीर व्हावयाचा. सरळ रेषेत पाणी कापीत जावयाचे काम मोठे कष्टाचे असे. कारण पाण्याला आतून ओढ असावयाची आणि अंत:प्रवाहातील धार कापीत कापीत, पल्ला गाठावा लागे. सरळ रेषेत जाण्यासाठी नावाड्यांना अतिकष्ट असत. दोन्ही तीरांवर उभे असलेले शेकडो लोक मात्र नावांच्या शर्यती पाहून आनंदित होत असत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org