तथापि, एकट्या महाराष्ट्र-विदर्भापुरता हा प्रश्न नव्हता. गुजरातमध्येही काही हालचाल करावयास हवी होती. त्या वेळी मोरारजीभाई मुंबईत आले असता मी त्यांची भेट घेतली. मी त्यांना म्हणालो,
'मोरारजीभाई, द्वैभाषिक मोडून दोन राज्ये करण्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. आता जर काहीच न करता आपण स्वस्थ बसलो, तर परिस्थिती बिकट होईल.'
मग काय करावे, असे त्यांनी विचारले.
मी म्हणालो,
'तुम्हाला द्वैभाषिक तोडण्याची कल्पना तत्त्वत: मान्य नाही, आपला विश्वासभंग झाला, असे तुम्हाला वाटते. पण आपण वस्तुनिष्ठ विचार केला पाहिजे. म्हणून दोन राज्ये सद्भावनेने कशी करावीत, हे ठरविण्याची आता गरज आहे. आपण दोघे एकत्र बसून तोडगा काढू.'
मोरारजींनी याला मान्यता दिली. पण दिल्लीच्या नेत्यांचा सल्ला घेतला काय? असे त्यांनी विचारले. मी 'नाही' म्हणून सांगितले, तसेच पंडितजींशी सल्लामसलत करण्याची गरज नाही, असेही म्हणालो. याचे कारण माझे मला माहीत होते.
नेहरूंनी या संबंधात स्वत: हालचाल न करण्याचे ठरविले होते. पण मोरारजीभाईंनी मला दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा आग्रह केला आणि आपणही गुजराती नेत्यांशी बोलू, असे ते म्हणाले.
मी मग दिल्लीला गेलो आणि विदर्भ व गुजरात यांच्याबाबत कोणत्या मार्गाने मी पावले टाकीत आहे, हे पंडित पंत यांना निवेदन केले. त्यांना हे पसंत पडले व मला, आगे बढो, असे त्यांनी सांगितले. नेहरूंना आपण खुलासा करू, असेही ते म्हणाले.
मी नंतर मुंबईला परतलो.
आठवडाभराने मोरारजीभाईंनी मला दिल्लीला बोलावले. त्याप्रमाणे मी गेलो. तेव्हा मोरारजीभाई म्हणाले,
'गुजरातच्या राजधानीच्या व डांगच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे.'
मी हे मान्य केले व सहका-यांशी चर्चा करतो, असे सांगून मुंबईला परतलो.