ऋणानुबंध (49)

पहिली निवडणूक

निवडणुकीचा दौरा संपला. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांतून मी जाऊन आलो होतो. आता माझे मतदानही झाले होते. एका झंझावाती कालखंडातील दुस-या पर्वाकडे आता लक्ष लागले होते. दिल्लीच्या वाटेवर साता-याहून पुण्याकडे गाडी धावत होती. मनात अनेक विचारांची गर्दी होती. मधूनच झालेल्या सभा आठवत होत्या. मधूनच एखादा मतदार संघ मनश्चक्षूंसमोर सरकून जात होता; आमच्या उमेदवाराचे पारडे जड आहे, हा कार्यकर्त्यांचा दिलासा सुखकारक वाटत होता, पण तेवढ्यात विरोधी पक्षांच्या इशा-याचीही आठवण होत होती; आणि याच आठवणीत अधूनमधून एखादी जुनी निवडणूक-मोहीम डोळ्यांपुढून सरकत जात जोती. मोटारीतून रस्त्याच्या कडेची झाडे वेगाने मागे पळत होती आणि माझे मनही तसेच वेगाने वर्षेच्या वर्षे मागे टाकून भूतकाळात खेचले गेले होते आणि सातारा जिल्हा काँग्रेसच्या एका तरुण विद्यार्थी कार्यकर्त्याच्या रूपात कालाच्या त्या दर्पणपटात माझे मलाच दर्शन होऊ लागले होते.

या निवडणूक-प्रकरणाशी माझा संबंध प्रथम केव्हा आला बरे? १९३७ सालावर माझे लक्ष एकदम स्थिरावले. होय, निवडणुकांशी आज जितका माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे, जेवढी जबाबदारी आहे, तेवढाच संबंध आणि जबाबदारी, आमच्या जिल्ह्यापुरता विचार केला, तर माझ्याकडे तेव्हाही होती. सातारा जिल्हा काँग्रेसचा मी एक कार्यकर्ता होतो आणि जिल्ह्याच्या राजकारणात मनापासून लक्ष घालू लागलो होतो. स्वातंत्र्य-आंदोलनात भाग घेतला होता, तो देशभक्तीच्या प्रेरणेने; पण तुरुंगात वाचनाने, चिंतनाने स्वातंत्र्याच्या आशयासंबंधीची विचारचक्रे सुरू झाली होती.

आर्थिक व सामाजिक क्रांतीची स्वातंत्र्य-आंदोलनाला जोड मिळाली पाहिजे, या काँग्रेसमधील प्रवाहात मनाने मी गुंतला गेलो होतो; आणि तेवढ्यातच १९३७ च्या निवडणुका लढविण्याचे काँग्रेसने जाहीर केले होते.

सातारा जिल्हा काँग्रेसच्या छोट्या संसारात काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयाने खळबळ उडून गेली होती. कोणाला तिकीट मिळणार? या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कोण करणार? आमच्या आपापसांतील चर्चा सुरू झाल्या होत्या; आणि तरुण पिढीचे प्रतिनिधी म्हणून आत्माराम पाटील यांनी निवडणूक लढवावी, असे आमच्या मनाने घेतले आणि आम्ही त्यांच्या नावाचा धोशा जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांकडे लावला. मला तेव्हाचे आमचे वादविवाद, साता-याला होणा-या आमच्या फे-या आता अगदी स्पष्ट आठवताहेत. आत्माराम पाटलांच्या नावाला जिल्ह्याच्या काही नेत्यांनी केवढा विरोध केला होता. आमच्या जिल्ह्यातील बहुजन समाज ब्राह्मणेतर चळवळीच्या पकडीतून सुटून काँग्रेसमध्ये आला होता खरा, पण अजून तो घरात रुळायचा होता. कौन्सिलची ती जागा म्हणजे मोठी प्रतिष्ठेची जागा मानली जात होती आणि त्यासाठी आत्माराम पाटील यांचे नाव आमच्या नेत्यांना भावत नव्हते. ज्या जागेवर रावबहादूर काळे बसले, त्या जागेवर आत्माराम पाटील बसणार, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती; आणि आत्माराम पाटील यांचे नाव त्यांनी जवळजवळ निकाली काढले हाते. जिल्ह्याच्या निर्णयावर प्रदेश काँग्रेसनेही शिक्कामोर्तब केल्यासारखे होते; पुण्याची आमची फेरी जवळजवळ वाया गेली होती. शंकरराव देवांकडे केलेल्या वकिलीची डाळ शिजली नव्हती. पण आत्माराम पाटलांच्या उमेदवारीसाठी आम्ही तरुण पोरांनी कंबर कसली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org