ऋणानुबंध (4)

या पुस्तकाची जवळजवळ निम्मी पृष्ठे माझ्या आठवणी, अनुभव, प्रवास आणि वेगवेगळ्या प्रसंगीचे माझे चिंतन यांनी भरली आहेत, तरी याला मी माझे आत्मचरित्र म्हणू शकणार नाही. या वर्षातील माझे दोन लेख 'आशा-निराशेचे क्षण' व 'मंगल कलश' (ज्याचे शीर्षक या पुस्तकात बदलले आहे) वाचून काही वाचकांनी मला चौकशीची पत्रे लिहिली, की ही आत्मचरित्राची प्रकरणे आहेत काय? आत्मचरित्र लिहीन, तेव्हा हे विषय त्यात स्वतंत्रपणे हाताळावे लागतील, हे खरे असले, तरी हे लेख म्हणजे आत्मचरित्राची प्रकरणे नव्हेत, हे स्पष्ट केले पाहिजे. आत्मचरित्र काही वेगळ्या पद्धतीने लिहावे लागेल. त्यामध्ये यांतल्या काही गोष्टींना स्पर्श तर होईलच; परंतु त्या लेखनाची बैठक मूलत: वेगळी ठेवावी लागणार, अशी माझी समजूत आहे. 'नियतीचा हात' लिहिले गेले, त्या वेळी मी कसा घडलो - त्यात योगायोगाचा हात किती, यासंबंधीच्या माझ्या आठवणी मी बोलत गेलो व त्यांचे शब्दांकन झाले. आत्मचरित्रातही मी घडलो कसा, हे सांगावे लागणार आहे; परंतु त्या प्रश्नाची उकल करताना सामाजिक पृष्ठभूमीचा फलक अधिक विशाल घेऊन त्याची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

'काही छंद : काही श्रद्धा' हा लेख माझ्या जीवनाच्या तत्त्वज्ञानावर काहीसा दृष्टिक्षेप टाकणारा आहे.

'कुलसुमदादी' हा मी लहान मुलांच्या मासिकासाठी लेख लिहिला; परंतु तो लिहून पुरा झाल्यानंतर माझ्या लक्षात आले, की या कक्षेपुरताच तो मर्यादित नाही. सर्वांच्याच जीवनात अशा अनेक व्यक्ती येऊन जातात, की ज्या फक्त येतात नि जातात; एवढेच नव्हे, तर काही सांगून व काही देऊन जातात. माझ्या जीवनात अशा अनेक अविस्मरणीय व्यक्ती आल्या आणि गेल्या. त्यांची स्मृतिचित्रे रेखाटावी असे मनात होते आणि आहे. 'कुलसुमदादी' हा त्यांतील प्रथम प्रयत्न आहे.

या निमित्ताने मला एक दुसरा विचारही सूचित करायचा होता - आजच्या आपल्या सामाजिक जीवनात, शहरात काय किंवा ग्रामीण भागात काय, जाती आणि धर्म यांची तटबंदी सर्व बाजूला उभी असल्याचे दृश्य दिसते. पण वस्तुत: पन्नास वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील एका खेड्यात सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाच्या दैनंदिन आयुष्यात ही तटबंदी कुठेही दिसत नव्हती. भासत नव्हती. माणुसकीची नाती रक्ताच्या नात्याइतकीच मजबूत आणि खरीखुरी जिवंत नाती होती, हा मी जगलेला अनुभव मला सांगायचा होता.

'शांति-चितेचे भस्म' हा लेख माझ्या सोव्हिएट रशियाच्या १९६४ सालच्या भेटीनंतर प्रसिद्ध झाला. त्यानंतरही मी रशियाच्या दौऱ्यासाठी चार-सहा वेळा गेलो आहे. परंतु पहिल्या भेटीच्या वेळची मन:स्थिती काही विशेष होती. समाजवादी नवरचनेचा प्रयत्न करणारा पहिला देश म्हणून रशियाविषयी विशेष जिज्ञासा व काहीसे विशेष आकर्षणही होते. त्या देशाचे दोन प्रख्यात सुपुत्र लेनिन आणि टॉलस्टॉय यांच्यासंबंधी मुळातच असीम आदर, त्यांचे व त्यांच्यासंबंधीचे लेखन वाचून निर्माण झाला होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org