ऋणानुबंध (165)

अशीच एक बैठक आजही मला आठवते, तिच्यात अण्णांनी त्यांची 'जोगिया' ही कविता म्हणून दाखविली होती, आणि नुसती कविता म्हणून अण्णा थांबले नव्हते. त्या कवितेची दर्दभरी कथाही त्यांनी सांगितली होती. त्यांच्या या 'जोगिया'ने माझ्या मनाला एवढी मोहिनी घातली होती, की पुढे त्यांच्या - माझ्या अनेक बैठकी झाल्या. पण क्वचितच अशी बैठक असेल, की मी त्यांना हात धरून शेजारी बसवून म्हटले नाही, 'अण्णा, 'जोगिया' म्हणा ना!'

कालांतराने संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली; नव्या महाराष्ट्र राज्यात मराठी साहित्यासाठी काय करता येईल, मराठी संस्कृतीसाठी काय योजना आखता येतील, यासंबंधीचा माझा विचारविनिमय चालू झाला होता. माझ्या स्वत:च्या काही कल्पना होत्या. त्या मी या क्षेत्रातल्या जाणत्या मंडळींशी बोलून, चर्चा करून तपासून पाहत होतो. अण्णा माडगूळकरांचा मला या विचार-विनिमयात फार उपयोग झाला. महाराष्ट्र सरकारने राजकवी हा किताब द्यावा, ही कल्पना या विचार-विनिमयातून साकार झाली. साहित्य संस्कृती मंडळ या बैठकीतून जन्माला आले. अण्णांच्या सगळ्याच कल्पना साकार झाल्या, असे जरी म्हणता आले नाही, तरी साहित्य, संस्कृती या क्षेत्रांत राज्याच्या पातळीवर काही वाटचाल सुरू झाली, ही त्यांची कमाई !

आमच्या खाजगी बैठकींतून सार्वजनिक प्रश्नांच्या चर्चा होण्याचे प्रसंग मग बरेच येऊ लागले; त्यात महाबळेश्वर शिबिराचा मला मुद्दाम उल्लेख करावा लागेल. महाबळेश्वरचे शिबिर महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील एका नव्या कालखंडाचा प्रारंभ करणारे शिबिर म्हणावे लागेल. या शिबिरात आम्ही दोन-चार दिवस एकत्र राहिलो होतो; आणि शिबिरात आमची खरोखरच गट्टी जमली, असे म्हणायला बिलकूल हरकत नाही.

पुढे मी दिल्लीला आलो, त्यामुळे आमच्या बैठकी दुरावल्या, तरी स्नेहात अंतर पडले नाही. कार्यकारणाने ते दिल्लीला आले, म्हणजे आम्ही भेटत असू. गप्पा मारत असू. १९६१ नंतर लडाखच्या सरहद्दीवर जाण्यासाठी ते स्वत:, पु. भा. भावे  व  पु. ल. देशपांडे असे तिघे येथे आले. त्यांच्या सहवासातील ती रात्र ! तिघांच्या प्रतिभाशाली संवादांनी सुगंधित झाली होती. माझ्या ती कायम स्मरणात आहे.

ग. दि. माडगूळकर ही व्यक्ती म्हणून जशी मला प्रिय होती, तसे त्यांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्वही मला अतिशय विलोभनीय वाटते. निखळ आनंद देणारा मित्र म्हणून मी त्यांना फार फार मानतो, पण त्यांचे साहित्यही तसेच वाचकाला आनंदाची अवर्णनीय अनुभूती देणारे आहे. त्यांच्या गीतरामायणाबद्दल मी काय लिहू? त्या अमर काव्याने मराठी साहित्यच नाही, तर मराठी संस्कृती समृद्ध केली आहे. सा-या भारतीय संस्कृतीचे सार त्यांनी आपल्या सहज गीतरचनेतून समाजाला दिले आहे, असे मी तरी मानतो.

वैयक्तिक अनुभवही सांगायला हरकत नाही. आमच्या कौटुंबिक जीवनात, मित्र-परिवारात किंवा सामाजिक जीवनातही अनेक अतर्क्य घटना घडतात, माणसाला नियतीचा खेळ पाहत बसण्यापलीकडे काहीही करता येत नाही, अशा वेळी माडगूळकरांच्या गीतरामायणातील 'पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा' या ओळीचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. कित्येक वेळा अशा विश्रब्ध अवस्थेत, त्यांनी भेट दिलेले गीतरामायणाचे पुस्तक मी काढतो आणि रामाने केलेली भरताची समजावणी मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org