ऋणानुबंध (162)

ग. त्र्यं. माडखोलकर

भाऊसाहेब पहिल्या श्रेणीचे साहित्यिक, टीकाकार, पत्रकार आणि साहित्य व समाज-जीवनाच्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेले नुकसान भरून येण्यासारखे नाही. विशेषत:, भाऊसाहेब खांडेकरांच्या निधनानंतर भाऊसाहेब माडखोलकरांच्याही निधनाने महाराष्ट्र सारस्वताचा रत्नकोश जास्तच दरिद्री झाल्यासारखा भासतो आणि माडखोलकरांच्या निधनाचे दु:ख जास्तच जाणवते.

भाऊसाहेब माडखोलकरांचा आणि माझा तसा प्रत्यक्ष संबंध संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने आला. पुढे तो अनौपचारिक मैत्रीत बदलला. मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा विदर्भ आणि मुंबईचे माझे जे संबंध आले, त्यांत माडखोलकरांचा वाटा अर्थातच होता. माडखोलकरांच्या साहित्याचा मी तसा पहिल्यापासूनच वाचक आहे. कादंबरीकार माडखोलकर मी वाचले होते. परंतु त्याहीपूर्वी त्यांचे टीकात्मक लेख मी अगदी पहिल्यापासून वाचीत आलो होतो.

आज त्यांच्या निधनानंतर ते सर्व साहित्य झर्रकन नजरेसमोरून जाते आणि मनाला जाणवते, ते हे, की राजकीय कादंबरीचे एक नवीन दालनच त्यांनी आपल्या स्वत:च्या खास शैलीने बांधले आहे. माडखोलकरांनंतर दुस-या राजकीय कादंब-याही प्रसिद्ध झाल्यात, नाही, असे नाही. परंतु त्यांच्या राजकीय कादंबरीला मागे टाकील, अशी राजकीय कादंबरी अद्याप प्रत्यक्ष पाहायला मिळायची आहे. त्यांच्या राजकीय कादंब-या इतक्या मौलिक ठरल्या, याचे कारण त्यांना स्वत:ला राजकारणात फार रस होता. राजकारणातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. कलाविषयक लेखनाला लागणारी अनुभूतीची जोड त्यांना सहजप्राप्त होती. शिवाय तपशिलाचा अभ्यास करून मगच विषयाला हात घालण्याचा शिरस्ता त्यांनी पाळला होता. त्यामुळेच ते जे लिहीत, ते मौलिक असे.

दलित समाजाबद्दल, दलित समाजाच्या उत्थानाबद्दल त्यांना मनापासून उत्कटता होती, इच्छा होती. नवबौद्ध समाजाचा एक तरुण मुलगा त्यांनी आपल्या घरीच ठेवून घेतला व वाढवला, ते याच पोटतिडिकीमुळे. पुढे तो मुलगाही लेखक झाला. भाऊसाहेबांची ही तळमळच त्यांना मोठे करीत गेली. महाराष्ट्राच्या एकात्मतेचीही त्यांना मनापासून तळमळ होती. याचे कारणही त्यांचे बालपण व तरुणपण पश्चिम महाराष्ट्रात आणि कर्ती हयात नागपुरात गेली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org