ऋणानुबंध (156)

ध्येय हे नेहमीच आदर्शभूत असते, पण ते कृतीत उतरवताना तारतम्य ठेवावेच लागते. घड्याळातील लंबक एका दिशेकडून दुस-या दिशेकडे जाताना मध्यबिंदूवरून जातो, पण तो मध्यबिंदूवरच थांबला, तर घड्याळ थांबेल असे केळकरांनी उत्कृष्ट वर्णन केले आहे. तेव्हा मध्यममार्ग ही, सांगितली जाते, तेवढी हास्यास्पद कल्पना खास नाही. अतिरेकाचा तात्पुरता त्याग करून त्याचे युक्तिवादाने समर्थन करणे मध्यममार्गाचे लक्षण आहे. पण हा त्याग तारतम्याने केलेला असतो. केळकरांना 'तडजोड' प्रिय होती, याचे कारण त्यांची विचारशैलीच तशी होती. भावना जेव्हा उद्दीपित झालेल्या असतात, तेव्हा अशा विचारशैलीच्या लोकांची उपेक्षा होते, तशीच केळकरांची झाली. पण मध्यममार्ग पत्करणाऱ्यांना हा धोका पत्करावाच लागतो; आणि केळकरांनी तो पत्करला, हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्यच मानले पाहिजे. पण स्वत: केळकरांनी म्हटल्याप्रमाणे अशा विचारवंतांची किंमत व्यवहारातील चलनी नाण्याप्रमाणे कमी-जास्त कधीच होत नाही, तर त्यांची (Intrinsic) किंमत वस्तुगुणनिष्ठ असते. लोकप्रियता ही चलनी नाण्यांची व्यवहारातील किंमत ठरविते, तर अशा पुरुषांची किंमत त्यांच्या अंगच्या गुणांनी ठरविली जाते.

केळकरांच्या जीवनाचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे प्रासादिक साहित्य आणि त्यांनी पत्रकार म्हणून केलेली भव्य कामगिरी. बुद्धी हे केळकरांच्या व्यक्तित्वाचे लोभनीय वैशिष्ट्यच होते. पण केवळ त्या बुद्धिबळावरच केळकरांनी एवढे प्रचंड साहित्य निर्माण केले नाही, तर अखंड वाचन, मनन व लेखन केल्यामुळेच दहा हजार पृष्ठे भरतील एवढे प्रचंड साहित्य त्यांनी लिहिले. वाङ्मयीन समीक्षा आतापर्यंत अनेकांनी केली आहे. त्यांची सरळ भाषा, तिचा डौल, नम्र, विनोद, खेळकरपणा, युक्तिवाद-प्रधानता या सर्व गुणांचा तो एक गुच्छ होय. पण केळकरांनी वृत्तपत्राचे व मासिकाचे संपादक म्हणून जी कामगिरी केली, ती आजही आदर्श आहे. टिळक असतानाही 'केसरी'चे संरक्षण व संवर्धन त्यांनी केले, पण त्यानंतरही अत्यंत निष्ठेने व कल्पकतेने 'केसरी'चा विकास घडवून आणला. केळकरांची कल्पकता, नवमताबद्दलची त्यांची जिज्ञासा व आदर, गुणी माणसांना जवळ करण्याची व उत्तेजन देण्याची रीत यांमुळे ते उत्कृष्ट संपादक झाले. व्यासंगासाठी मेहनत तर लागतेच, पण बौद्धिक कुतूहलही कायम राहावे लागते. केळकरांना हे कुतूहल शेवटपर्यंत होते. त्यामुळे, स्वत: नवा विषय समजून घ्यावयाचा व हजारो वाचकांना सोप्या भाषेत तो समजावून सांगावयाचा, असे त्यांच्या व्यासंगाचे व लेखनाचे ध्येय होते. म्हणून हास्य-विनोदमीमांसेपासून ते राज्यशास्त्र किंवा समाजवाद - कम्युनिझम आदी विषयांवर त्यांनी लेखन केले. अजूनही केळकरांच्या त्या विविधतेचे कौतुक वाटते. संपादक म्हणून न वाचताही अनेक विषयांवर लिहिता येते. पण केळकर सर्वांगीण वाचन करून लिहीत, त्या विषयाचे सर्व बारकावे तपासून टीका करीत. मला वाटते, हे आदर्श संपादकाचे लक्षण आहे. केळकरांचे हे सर्वोत्तम संपादकीय गुण आजही मराठी पत्रकारांनी अनुसरण्यासारखे आहेत. आता लोकशाहीचा कारभार खेड्यांपर्यंत पोहोचला आहे. भारताला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय समस्येपासून तो खेड्यातल्या प्रश्नांपर्यंत, आर्थिक प्रश्नांपासून ते वैज्ञानिक संशोधनापर्यंत अनेक विषय आजच्या संपादकाला हाताळावे लागतात. तेव्हा केळकरांची अन्वेषणबुद्धी, व्यासंग व लोकशिक्षणाची त्यांची हौस या सर्वांची आजच्या प्रादेशिक पत्रकारांना अधिक गरज आहे.

असे हे केळकरांचे गुणसंकीर्तन आहे. केळकर स्वत: गुणपूजक होते. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'चांगला माणूस' म्हणून केळकरांचा त्यांच्या समकालीनांवरील ठसा कायम आहे. उदारचरित, उदारमनस्क व उदारमतवादी हे केळकरांचे खरे स्वरूप आहे. ते टिकणारे आहे. ही त्यांची प्रतिमा टिकविली पाहिजे.
 
केळकर जन्मशताब्दी  समारंभ,
पुणे, १९७२

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org