ऋणानुबंध (153)

असे असले, तरीही आपण जीवनाची सध्या इतकी गुंतागुंत पाहत आहोत व भयानक पोकळी अनुभवीत आहोत, की त्यामुळे कधी कधी ही जुनी नाटके 'फँटसी'सारखी आल्हाददायक वाटतात. मला वाटते, त्या नाटकांचे वाङ्मयीन मूल्य मोठे आहेच, पण हे सामाजिक मूल्यही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण विरंगुळा म्हणून या नाटकांचे महत्त्व फार मोठे आहे. खाडिलकरांचे 'स्वयंवर' किंवा किर्लोस्करांचे 'सौभद्र' यांची गोडी अवीट राहते, याचे हेही एक कारण असावे.

खाडिलकरांच्या नाटकांतील संगीत हा दुसरा बहारदार विशेष आहे. आपल्या नाटकांतील संगीतामुळे काही अंशी अभिनय दुय्यम मानला गेला, हे खरे आहे. पण नाट्यसंगीतासारखा एक अपूर्व संगीतप्रकार त्यामुळे जन्माला आला आणि आजही त्याची गोडी टिकून आहे, हे विसरता कामा नये. गद्य नाटकांचा रूक्षपणा घालवून नाटक हे मन गुंतवून ठेवणारे कलामाध्यम झाले, हे निर्विवाद आहे. ऑर्गनचे सूर ऐकले, की आजही मराठी प्रेक्षागृहात जे वातावरण निर्माण होते, त्यासाठीच संगीत नाटक हे कायम टिकले पाहिजे, असे प्रेक्षक म्हणून मला वाटते. नाटकात थोडी कृत्रिमता अपरिहार्य आहे. तशीच संगीत नाटकातही आहे. ती पण किर्लोस्कर-खाडिलकर-देवल यांच्या नाटकांत जे संगीत आले, ते त्या कथानकातील काही भावनिक धागे जुळविणारे होते, हेही निर्विवाद आहे. तसेच कै. अण्णासाहेब किर्लोस्करांनी समर्पक रीतीने म्हटल्याप्रमाणे, 'गायनरस आळविणे हे संगीत नाटकाचे उद्दिष्ट आहे.' खाडिलकरांच्या नाटकांत 'स्वयंवर' व 'मानापमान' ही दोन नाटके मराठी नाट्यसंगीताची लयलूट करतात; आणि आजही ती मराठी रसिकांना रिझवितात. पण केशवराव भोसले, बालगंधर्व, आदींनी जी संगीतपरंपरा निर्माण केली, ती टिकविण्यासाठी तितक्याच ताकदीची व तपश्चर्येची नटमंडळी लागतात. नाही तर नाट्यगीते ही भावगीते होतील आणि त्यांतील 'गायनरस' नाहीसा होईल, म्हणून मराठी रंगभूमीचा हा वारसा टिकवावयाचा असेल, तर ही तपश्चर्या चालू ठेवावी लागेल.

खाडिलकरांच्या नाट्यसेवेचे समीक्षण करताना त्यांच्या एका वैशिष्ट्याचा उल्लेख केलाच पाहिजे. तो हा, की ते स्वत: नाटक मंडळीच्या कारभारात लक्ष घालून त्यांना आधार देत, मार्गदर्शन करीत. किंबहुना महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख नाटककारांना 'कंपनीचे बि-हाड' हे स्वत:चे घरच वाटत असे. त्या काळच्या त्या नाट्यशिक्षण संस्थाच होत्या. आणि त्यांत हे नाट्यशिक्षक शिकवण्याचे काम करीत होते. ही संस्थाच आता बंद पडल्यासारखी वाटते. साहित्यिकांचा व नटांचा सहवास घडला, तर नटांची नाटकाविषयीची समज वाढते. त्यामुळे अभिनयाचा दर्जा वाढतो. मराठी साहित्यिकांनी व नव्या नाटककारांनी ही परंपरा पुन्हा चालू करण्यासारखी आहे. आज मराठी रंगभूमीचा पिसारा शोभिवंत दिसतो आहे. त्याचा कस वाढवावयाचा असेल, तर असे नाट्यजीवनाशी समरस झालेले नाटककार हवे आहेत. नाट्यनिर्मात्यांनी किर्लोस्कर, खाडिलकरांचे याबाबत अनुकरण करण्यासारखे आहे.

खाडिलकरांची नाट्यप्रतिभा देशसेवेला वाहिलेली होती. त्या काळाच्या वातावरणाने ती ओजस्वी झाली. खाडिलकरांच्या त्या सामाजिक जाणिवेचे व त्यांच्या कलात्मक गुणांचे मनोज्ञ व सर्वांगसुंदर दर्शन त्यांच्या नाटकांत दिसते. म्हणूनही त्यांचे मराठी रसिकाला सतत स्मरण होत राहील.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org