ऋणानुबंध (150)

यासंबंधीचा एक नमुनेदार किस्सा सांगण्यासारखा आहे. १९४०च्या नोव्हेंबरमध्ये ज्याला 'ब्रिटनची लढाई' म्हणतात, ती हिटलरची वैमानिक हल्ल्याची चढाई शिगेला पोहोचत चालली होती. या वेळी 'अल्ट्रा'च्या मार्फत माहिती मिळाली, की एका ठरावीक दिवशी, ठरावीक वेळी 'काव्हेंट्री' या इतिहासप्रसिद्ध व औद्योगिक शहरावर ते तेथील प्रसिद्ध कॅथीड्रलवर पाचशेहून अधिक जर्मन विमाने हल्ला करणार आहेत. चर्चिलपुढे ही माहिती निर्णयासाठी ठेवली, की या माहितीचा उपयोग करून त्या शहराच्या रक्षणासाठी वैमानिक जय्यत तयारी करावयाची, की नाही? चर्चिलने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला, की हल्ला व त्यातून होणारी हानी स्वीकारायची; परंतु रक्षणाची तयारी करून 'अल्ट्रा'च्या अस्तित्वाची शंका जर्मनांना येऊ द्यायची नाही; आणि तसेच घडले. एक जुने महत्त्वाचे शहर उद्ध्वस्त झाले; पण अल्ट्राचे शत्रूच्या शंकेपासून रक्षण केले.

उत्तर आफ्रिकेत रोमेलचा पाडाव करण्यासाठी फसवणुकीचे टाकलेले डावपेच असेच मनोवेधक आहेत. युद्धाच्या रक्षणाच्या रणनीतीमध्ये फसवणुकीच्या डावपेचांना (डिसेप्शन) मानाचे स्थान असते. असे 'कात्रजचे घाट' घातल्याशिवाय निव्वळ शौर्याच्या बळावर लढाया जिंकता येत नाहीत. उत्तर आफ्रिकेच्या लढाईत जनरल रोमेल शौर्यात हरला नाही, तर डावपेचांत फसला.

दोस्त राष्ट्रांमध्ये दुसरी आघाडी केव्हा व कुठे उघडावयाची, याबाबतीत १९४२ ते ४४ पर्यंत सतत संघर्ष आणि वादविवाद चालू होते. या वादविवादाची हकीकत रोमहर्षक आहे. लष्करी मूलभूत निर्णय कसे घ्यावे लागतात, याचे प्रात्यक्षिकच या पुस्तकात पाहावयास मिळते. शेवटी ६ जून, १९४४ रोजी सहा हजार जहाजांचा तांडा लक्षावधी सैन्य, शस्त्रास्त्रे यांच्यासह फ्रान्सच्या किना-यास पोहोचतो व जगाच्या इतिहासात अजोड असे एक समुद्रमार्गे केलेले आक्रमण सुरू होते.

हेरगिरीचे व डावपेचांचे जे अनेक पवित्रे वर्षानुवर्षे टाकले जात होते, त्यांचे हे फलित या ग्रंथात तपशिलाने दिले आहे.
या ग्रंथाच्या संगतीत गेलेला वेळ माझ्या दृष्टीने संस्मरणीय आहे.

आता नुकतेच मी वाचून संपविलेले दुसरे नवे पुस्तक अमेरिकन 'बेस्ट सेलर्स' पैकी एक आहे. 'रूट्स' हे पुस्तकाचे नाव. लेखक अलेक्स हॅलि आहे. पुस्तक उत्तम कादंबरीसारखे रसाळ आहे, पण कादंबरी नाही. ग्रंथकार हॅलि यांनी आपल्या कुटुंबाचा दोनशे वर्षांचा इतिहास दिला आहे. त्यांच्या कुटुंबाचा आफ्रिकन मूळपुरुष कुंटा कुंटे हा अमेरिकेत आला कसा व कुठून, या प्रश्नाने त्याची जिज्ञासा जागी झाली आणि वर्षानुवर्षोंच्या संशोधनानंतर हा काळ्या अमेरिकेचा प्रतिनिधी लेखक एक दिवस पश्चिम आफ्रिकेच्या किना-यावरील गॅम्बिया देशातील जुफूर या गावी आपल्या रक्तानात्याच्या सात पिढ्यांनंतरच्या भाऊबंदांना भेटला, त्यांच्याशी बोलला. लेखक अलेक्स हॅलिने आपल्या लहानपणी आपल्या आजीच्या तोंडून पिढ्यान् पिढ्या चालत आलेली आफ्रिकन मूळपुरुषाची कहाणी ऐकली होती. आपण समुद्राच्या पार असलेल्या मुलखातून आलो. वयाच्या सोळाव्या वर्षी एक दिवस जंगलात आपल्या ढोलासाठी (ड्रम) बांबूच्या झाडाचा बुंधा तोडून आणण्यासाठी गेलो असता आपली शिकार झाली. गुलाम म्हणून साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत या देशात आलो. 'आपला मुलूख समुद्रपार असून कँबिबोलोंगाच्या शेजारी आपली वस्ती होती,' त्या कहाणीचा एवढाच सारांश हॅलिने सातव्या पिढीपर्यंत पोहोचवला होता. परंतु अलेक्स हॅलिने हा धागा पकडून आपल्या कुटुंबवृक्षाच्या मुळ्या शोधून काढण्यासाठी प्रयत्नांचे पर्वत रचले. पाच लाख मैलांचा प्रवास केला. लागोपाठ दहा वर्षे याच गोष्टीचा ध्यास घेऊन संशोधन केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org