ऋणानुबंध (149)

'युद्धकाळी सत्य हे इतके मौल्यवान असते, की त्याच्या शरीररक्षकाचे काम असत्याला करावे लागते.' हे कोणा तत्त्वज्ञान्याचे नीतिशास्त्रावरील विचार नसून ब्रिटनचे युद्धकालीन नेते चर्चिल या मुत्सद्याचा युद्धकालीन निर्णय होता. हेरगिरीला किती विविध त-हेचे काम करावे लागते, याचा नवा तपशील देणारा एक ग्रंथराज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. 'बॉडीगार्ड ऑफ लाईज्' हे या ग्रंथाचे नाव आहे. त्याचे लेखक आहेत श्री. एँथनी ब्राऊन. दुस-या महायुद्धावरील अगदी वेगळ्या प्रकारचे हे पुस्तक नऊशे पानांचे असून गेल्या काही वर्षांत जर्मन, इंग्लिश, अमेरिकन नवे सरकारी कागदपत्र उपलब्ध झालेले आहेत, त्यांच्या संशोधनावर आधारित आहे. युद्धाच्या इतिहासाचे हे एक नवे दालन आहे. हेरगिरीचे किती विविध प्रकार असू शकतात व युद्धाच्या लहानमोठ्या योजनांना त्यांची किती आवश्यकता असते, याची काहीशी कल्पना या पुस्तकावरून येऊ शकेल. युद्धाच्या प्रगतीवर व युद्धाच्या वेगवेगळ्या आघाड्यांवर घडलेल्या अनेक घटनांवर नवा प्रकाश यामुळे पडेल. उत्तम कादंबरी वाचताना जी तन्मयता येते, तिचा अनुभव हा ग्रंथ वाचताना वारंवार मला आला. एक-दोन बैठकींत मात्र हे पुस्तक संपणारे नव्हे. आवडणारी वस्तू राखून ठेवून वापरावी, तसे हे पुस्तक मी सावकाशपणे, पण चवीने, चार-पाच आठवडे वाचत होतो.

युद्ध जिंकण्यासाठी नव्या नव्या आधुनिक शस्त्रांची जशी आवश्यकता आहे, तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आवश्यकता आहे, शत्रूच्या गोटात काय शिजत आहे, हे समजण्याची ! युद्ध जिंकण्याची ही एकच कसोटी मानली, तर इग्लंडने, बाहेर जेव्हा ते लढाया हारत होते, त्याच वेळी त्यांनी ते युद्ध जिंकले होते, असे मला दिसते. कारण युद्धाच्या प्रारंभ-पर्वाच्या अखेरीस त्यांनी जर्मन गुप्त संदेशाची लिपी हस्तगत केली होती. ज्या यंत्राद्वारे ते या संदेशाची उकल करीत होते, ते 'अल्ट्रा' या नावाने संबोधले जात होते. जर्मन हायकमांड व खालचे सेनानी यांच्यामध्ये येणारे-जाणारे सर्व संदेश 'अल्ट्रा' फोडत असे व त्याचा तर्जुमा त्याच दिवशी ब्रिटिश उच्च सेनानी व प्रत्यक्ष चर्चिलच्या टेबलावर जाऊन पोहोचत असे. पुढे अमेरिकेस ऍटमबॉम्ब हस्तगत झाला, पण त्यापूर्वी तितक्याच महत्त्वाचा इंग्लंडचा विजय म्हणजे 'अल्ट्रा'ची रचना. पण त्यांना सगळ्यांत चिंता होती, ती याची, की जर्मनांना आपली गुप्त लिपी फुटली, याची शंकाही येऊ न देण्याची. कारण या गुप्त लिपीचा सर्वोत्तम उपयोग युरोपवर अखेरची जी चढाई करावयाची, त्या वेळी होणार होता. त्यामुळे 'अल्ट्रा'चे अस्तित्व कुणाला कळू न देणे हे त्यांचे एक महत्त्वाचे काम बनले. पुष्कळ वेळा 'अल्ट्रा'च्या माध्यमातून मिळालेली माहिती अत्यंत महत्त्वाची असूनसुद्धा जर्मनांना गुप्तलिपी फुटल्याची शंका येऊ नये, म्हणून त्या महत्त्वाच्या माहितीचा उपयोग करावयाचे टाळावे लागले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org