ऋणानुबंध (148)

१९७६चा माझा अनुभव सांगावयाचा झाल्यास मी 'समर १९७६'च्या 'फॉरिन पॉलिसी' या त्रैमासिकात प्रसिद्ध झालेल्या ब्रेझेझिन्स्कीच्या 'अमेरिका इन ए होस्टाइल वर्ल्ड' या लेखाचे उदाहरण देईन. अमेरिकन परराष्ट्र-धोरणावर ग्रंथरूपानेही विपुल लिहिले जाते. हे निवडणुकीचे वर्ष म्हणून विरोधी दृष्टिकोन मांडणारे ग्रंथ व लेखही बरेच लिहिले गेलेत; परंतु माझ्या वाचनात आलेल्या 'डिप्लोमसी फॉर ए क्राउडेड् वर्ल्ड' हे जॉर्ज बॉल यांचे पुस्तक व ब्रेझेझिन्स्कीचा हा छोटा लेख लक्षात राहण्यासारखे आहेत. ब्रेझेझिन्स्कीने थोड्या शब्दांत काही मूलगामी विचार मांडले आहेत. दोनशे वर्षांपूर्वी स्वतंत्र अमेरिकेने जेव्हा आपल्या सार्वभौम जीवनाची वाटचाल सुरू केली, तेव्हा स्वातंत्र्य आणि समानता या परवलीच्या दोन ध्येय-संकल्पना होत्या. आज जेव्हा तिसरे शतक सुरू होत आहे, तेव्हा जगात जवळजवळ सर्वत्र राजकीय स्वातंत्र्य प्रस्थापित झाले आहे आणि काळाची गरज आहे 'समानतेची'. अमेरिका व नवोदित जग यांमध्ये विसंवाद व संघर्ष आहे. याचे कारण मानवतेची मागणी समानतेची असताना अमेरिकेची विदेश-नीती मात्र फक्त व्यक्तिस्वातंत्र्याची घोषवाक्ये देत आहे. अमेरिका व नवे जग यांत सहकार्याचे वातावरण निर्माण व्हावयाचे असल्यास समानतेच्या प्रस्थापनेसाठी नव्या जगाने चालविलेल्या प्रयत्नांशी प्रथमत: अमेरिकेने सुसंवाद निर्माण केले पाहिजे. लेखाचे मूल-सूत्र, हा विचार आहे. या लेखाचे महत्त्व यासाठीही आहे, की हे विचार मांडणारे श्री. ब्रेझेझिन्स्की हे नवे नियुक्त अध्यक्ष कार्टर यांचे महत्त्वाचे सल्लागार म्हणून नुकतेच नेमले गेले आहेत.

चरित्रवाचनाची आवड मराठीने मला लावली. अगदी लहानपणापासून ! ती कायम राहिली, असे नव्हे, तर वाढतच गेली आहे. जिज्ञासेची क्षेत्रे जशी वाढत गेली, तशी त्या क्षेत्रांशी संबंधित स्त्री-पुरुषांच्या जीवनांविषयी औत्सुक्य वाढले आणि चरित्रग्रंथांची - त्यांत आत्मचरित्रे व आठवणीही (मेमॉयर्स) आल्या, आवड कायम राहिली. या वर्षी मी वाचलेल्या चरित्रग्रंथांत मुद्दाम उल्लेख करण्यासारखा ग्रंथ म्हणजे श्री. निराद चौधरी यांनी सुप्रसिद्ध जर्मन पंडित मॅक्समुलर यांचे 'स्कॉलर एक्स्ट्रॉऑर्डिनरी' या नावाने प्रसिद्ध केलेले चरित्र. श्री. निराद चौधरी हे इंग्रजीत ग्रंथलेखन करणा-या प्रसिद्ध हिंदी लेखकांपैकी प्रमुख आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना लेखक म्हणून नावलौकिक मिळाला, त्यांच्या आत्मचरित्राने. त्यांच्या इंग्रजी लेखनात सौष्ठव आहे. पण त्यांच्या दृष्टिकोनात भारतासंबंधी काही विकृती आहे, अशी माझी धारणा असल्यामुळे मी त्यांचे हे पुस्तक काहीशा साशंकतेनेच वाचावयास घेतले. पण पुस्तक वाचून झाल्यानंतर एक उत्कृष्ट चरित्रग्रंथ वाचल्याचे समाधान झाले. जन्मभर संस्कृत भाषेची सेवा करणारे युरोपियन पंडित असा मॅक्समुलर यांचा लौकिक असल्यामुळे भारतात अनेकांना त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. संस्कृत अध्ययन व पुढे संशोधन करण्यासाठी आपला देश सोडून इंग्लंडमध्ये त्यांनी कायमचे वास्तव्य केले. त्यांची प्रखर ज्ञाननिष्ठा, ऋग्वेदाच्या संशोधित आवृत्तीचे इंग्लंडमध्ये प्रकाशन करण्यासाठी त्यांनी केलेली यातायात, भाषाशास्त्रीय संशोधनात त्यांनी टाकलेली मौलिक भर व त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सुखदु:खे यांचे चित्रण या ग्रंथात श्री. निराद चौधरींनी अत्यंत सहृदयतेने व सुबकपणे केले आहे. विद्वान मॅक्समुलरच्या बरोबरीने माणूस मॅक्समुलर अधिक जवळून या ग्रंथात पाहिल्यामुळे आदराच्या जोडीला त्यांच्या बाबतीत नवे आपुलकीचे नाते निर्माण झाल्यासारखे वाटू लागले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org