ऋणानुबंध (144)

१९३४-३५ साली पंडित जवाहरलाल नेहरूंचे आत्मचरित्र नुकतेच इंग्रजीत प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी या पुस्तकाला फार मागणी होती. या ताज्या पुस्तकाची एक प्रत कोल्हापूरच्या माझ्या एका मित्राकडून मिळवून ती कशी वाचली, याची आठवण माझ्या मनात ताजी आहे. आम्हाला ते पुस्तक चार दिवसांसाठीच मिळाले होते आणि वाचणारे तर पाच-सहाजण. मग आम्ही एकत्र बसलो. एकाने ते मोठ्याने वाचायचे आणि इतरांनी ऐकायचे, असा कार्यक्रम सुरू झाला. उन्हाळ्याचे दिवस. कराडचे आमचे घर खूप तापायचे. पण आमचा उत्साह इतका अमाप होता, की आम्ही ते पुस्तक तीन दिवसांतच संपविले. ते दिवसच मंतरलेले होते ! स्वातंत्र्य-चळवळीने आमची मने भारून टाकलेली होती. काही नव्या प्रेरणा घेऊन देशाच्या आकांक्षांची क्षितिजे उंचावणा-या विचारांची झेप असलेल्या एका तरुण नेत्याचे जीवन समजून घेण्याची ओढ होती.

चाळिशीनंतर माणसे चरित्रवाचनाकडे वळतात, असे एका सुप्रसिद्ध टीकाकाराने म्हटल्याचे माझ्या वाचनात आहे. आमची पिढी पंधराव्या-सोळाव्या वर्षापासूनच या वाचनाकडे वळली होती, असे म्हटले, तरी चालेल.

आता या वयात मात्र चरित्रे व आत्मचरित्रे वाचण्यामागील माझी भूमिका बदलली आहे, असे मला वाटते. १९३४-३५ पासूनच्या महाराष्ट्राच्या व भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनातील ब-याच घटना मी कमी-अधिक जवळून पाहिल्या आहेत. त्यांतल्या काहींमध्ये भागही घेतला आहे. त्या घटनांबद्दल इतर समकालीन लोकांना काय म्हणावयाचे आहे, हे जाणून घेण्याची आता मला उत्सुकता वाटते. एखाद्या घटनेच्या विविध बाजू, तिच्याबद्दलचे विविध दृष्टिकोन समजावून घ्यावेसे वाटतात. त्या दृष्टीने काकासाहेब गाडगीळ, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, इत्यादींची मराठी आत्मचरित्रे, त्याचप्रमाणे वेव्हेलच्या आठवणी, मौलाना आझादांचे 'इंडिया विन्स फ्रीडम', राजेन्द्रबाबूंचे आत्मजीवन, इत्यादी पुस्तके मी वाचली आहेत. बर्ट्रांड रसेलचे आत्मचरित्र मला वेगळ्याच कारणामुळे स्पर्श करून गेले. एखादा माणूस प्रामाणिक आत्मचरित्रलेखनाची कोणती मर्यादा गाठू शकतो, हे रसेलच्या पुस्तकात दिसते. रसेलच्या उत्तरायुष्यातील चीन-भारत संघर्षविषयक धोरणाशी मी सहमत होऊ शकत नसलो, तरी रसेल ही चालू शतकातील एक लोकोत्तर व्यक्ती होऊन गेली, यात शंका नाही. आपल्या प्रत्येक अनुभवाचे बुद्धिवादी दृष्टिकोनातून विश्लेषण व परीक्षण करीत त्याने आपले आयुष्य घडवले. त्याच्या आत्मचरित्राचे शेवटचे परिच्छेद म्हणजे तर गद्यात लिहिलेली एक सुंदर कविता आहे. गांधीजींचे आत्मचरित्रही सत्यकथन व सत्यअहिंसेचा शोध या सूत्रांनी वेढलेले असे एक अविस्मरणीय आत्मचरित्र आहे. आपले आत्मचरित्र थोडे अधिक साफसूफ करण्याची संधी काकासाहेब गाडगीळांना मिळायला हवी होती, असे राहून राहून वाटते.'पथिक' वाचनीय आहे, पण त्यातले काही भाग खडबडीत राहून गेले आहेत. अत्र्यांचे 'क-हेचे पाणी साहित्यिक गुणांनी श्रीमंत आहे. पण मला त्यांचे 'मी कसा झालो' हे पुस्तक अधिक आवडले होते. ते अधिक व्यक्तिगत होते. 'क-हेच्या पाण्या'मध्ये आपण एक ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्ती झालो आहोत, ही जाणीव सतत जागी असल्याचे जाणवते. पण हा काही दोष नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org