ऋणानुबंध (142)

प्राचीन काळी तपस्व्यांच्या आश्रमात शिरताना राज्यकर्ते आपली राजचिन्हे काढून साध्या वेषात जात असत. तसेच शारदेच्या उपवनात येताना भारत सरकारच्या मंत्रिपदाची बिरुदावली मी बाहेर ठेवून आलो आहे. माझ्या मातृभाषेवर उत्कट प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून मी इथे आलो आहे. आमचा पाहुणचार भाजी-भाकरीचा असला, तरी तो भावमंत्रित आहे, जिव्हाळ्याचा आहे, सकस आहे, हे ध्यानात असू द्या. तो तुम्ही गोड करून घ्यावा. गोविंदाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे हा आपला देश राकट आहे, तसा कोमल आहे.

देवी ज्ञानेश्वरी करी जिथे भक्तीचा खेळ,
तेथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ

भक्ती आणि बुद्धी हे महाराष्ट्राच्या सामर्थ्याचे दोन पंख आहेत. आजच्या गतिमान व प्रगतिमान जगात अनेक समस्या आहेत. आमच्या देशात सुप्त सामर्थ्ये फार मोठी आहेत, पण अडचणीही तेवढ्याच आहेत. या अडचणी दूर करण्यात आणि माणसामाणसांतील सहकार्य व स्नेह वाढविण्यात आपण लेखकांनी हातभार लावला पाहिजे. वाङ्मय सहेतुक असावे की नाही, त्यात बोध असावा की नाही, या वादात मी पडत नाही. पण एवढे मात्र मी म्हणेन, की वाङ्मयाने माणसाचा हृदयविस्तार झाला पाहिजे, या विस्तारातच पुष्कळ ग्रंथी सुटतात.

साहित्य संमेलन, कराड : १९७५
स्वागतपर भाषण

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org