ऋणानुबंध (132)

जनतेच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्राच्या उत्थानासाठी आणि भारतीय जनतेच्या महान महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी संतांची वाणी, शिवाजीची ललकार, तसेच आगरकर, चिपळूणकर आणि टिळक अशा विचारवंत देशभक्तांचे विचार मराठी भाषेला न मिळते, तर आज मराठी साहित्य इतक्या उन्नत स्थितीत आढळले असते का? आपण फ्रेंच भाषेचेच उदाहरण घेऊया. फ्रेंच भाषा पूर्वीपासूनच उत्कृष्ट होती, हे एक सत्य आहे. असे असले, तरी जर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली नसती, तर फ्रेंच भाषेत लालित्य आले नसते आणि तेथील साहित्याचा, आज दिसतो, तसा विकास झाला नसता.

बुद्ध आणि महावीर ह्यांच्या वाणीने एक प्रकारे लोकभाषांना पंखच दिले, असे म्हणावयास हरकत नाही. संस्कृत भाषेचा विशाल तट ओलांडून प्राकृत आणि पाली ह्या भाषा जैन आणि बौद्ध भिक्षूंच्या मदतीने सर्व देशभर पसरल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संतांच्या वाणीचा प्रवाह केवळ महाराष्ट्राच्या सीमेतच मर्यादित राहिला नाही, याचा पुरावा पण आपणांस आढळतो. शिखांच्या गुरू ग्रंथसाहेबात नामदेवाचे पासष्ट अभंग आढळतात. अशाच प्रकारे नवे विचारप्रवाह भाषेच्या मदतीने देश, काळ आणि नैसर्गिक सीमेची बंधने पार करत असतात.

कोणत्याही भाषेच्या माध्यमाने जे विचार प्रगट होत असतात, त्या विचारप्रवाहावरच तिची प्रगती अवलंबून असते, कशीही परिस्थिती असो, जर त्या विचारप्रवाहात प्राण असेल आणि गती असेल, तर असले विचारप्रवाह जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून लोकजीवनातून साहित्य निर्माण होते, असे मानण्यात येते. लोकजीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे साहित्यावर पडत असते व त्यावर पुन्हा साहित्याचा लोकजीवनावर परिणाम होतो. आवाजाच्या प्रतिध्वनीप्रमाणे ही क्रिया चालत असते. लोकजीवनाचा स्वर साहित्यात उमटतो आणि साहित्यात त्या स्वराचा असा प्रतिध्वनी निर्माण होतो, की जो पुन्हा लोकजीवनात जाऊन मिसळतो. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम वगैरे संतांच्या जीवनाचा व साहित्याचा प्रतिध्वनी आजही आमच्या लोकजीवनात उमटलेला आढळतो. ह्या संतांनी लिहिलेली गीते, अभंग आणि भजने यांत लोकजीवनाचे प्रतिबिंब आढळते आणि ह्या साहित्याच्या योगे सर्वसामान्य लोकांना मन:शांती मिळते. मानवी जीवन वैयक्तिक असो वा सामाजिक असो; त्याच्या कोणत्याही पैलूची, भाषेच्या मदतीने केलेली अभिव्यक्ती साहित्याचे स्वरूप घेते. खरे म्हणजे, असल्या साहित्यात मानव आणि मानवोपयोगी प्रवृत्ती ह्यांची अभिव्यक्ती झाली पाहिजे. ज्या साहित्यामुळे अमंगलाचा नाश होतो आणि मंगलाची स्थापना होते, असे साहित्य उदात्त गुणांची प्रेरणा देऊ शकते, अशा प्रकारे साहित्य जनतेच्या उदात्त भावांना प्रेरणा देऊन प्रगतीच्या दिशेने समाजाला गतिमान करते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org