ऋणानुबंध (125)

काकासाहेबांशी माझी शेवटची भेट अलाहाबादच्या विमानतळावर झाल्याचे स्मरते. पाकिस्तानशी १९६५ साली झालेल्या युद्धानंतरचे दिवस होते. मी अलाहाबादला आलो होतो व काकासाहेब अलाहाबाद सोडत होते. मला पाहताच विमान सुटण्याची घाई असतानाही बाजूला जाऊन काही मिनिटे उभे राहिले. त्या वेळी घडत असलेल्या घडामोडी काहीशा मी त्यांना सांगितल्या. काकासाहेब आनंदात होते. हिंदुस्थानच्या जवानांनी केलेल्या पराक्रमाचा त्यांना अभिमान वाटत होता.

'असेच होईल, असे मला वाटत होते. पण झाले नसते, तर... ' त्यांच्या हातातील काठी दाखवीत ते म्हणाले, 'हे तुमच्यासाठी ठेवले होते.' हे म्हणताना त्यांचे घारे डोळे हसत होते व खांद्याची एक वैशिष्ट्यपूर्ण हालचाल होत होती.

मी मनापासून हसलो आणि म्हटले,

'काका, तुमचा तो अधिकार आहे.'
'अच्छा, आशीर्वाद. पुन्हा भेटू.' असे म्हणाले व घाईघाईने विमानाकडे चालत गेले. मी त्यांची पाठमोरी पण वेगाने चालणारी आकृती पाहत किंचित काळ उभा राहिलो. त्या वेळी शंकाही आली नाही, की ही त्यांची माझी शेवटचीच भेट आहे.

काही आठवड्यांनंतर ताश्कंदहून स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजींचा पार्थिव देह घेऊन आम्ही परत आलो. देशात दु:खाची एकच लाट उसळली होती. त्याच दिवसांत पुण्याहून बातमी आली :

'काका आम्हाला कायमचे सोडून गेले.'

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org