ऋणानुबंध (121)

लोकशिक्षक काकासाहेब

श्री. काकासाहेब गाडगीळांना आपल्यामधून जाऊन बरीच वर्षे झाली. त्यांच्यासंबंधीची माझी स्मृती आदरपूर्वक चाळवण्यासाठी म्हणून मी हे लिहीत आहे. यानिमित्ताने त्यांच्या संगतीत काही काळ घालविल्याचा आनंद पुन्हा मिळणार आहे. काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते : उत्कृष्ट वक्तृत्व, सुबोध लोकशिक्षणात्मक लेखन, ग्रंथकर्ते, राज्यकर्ते अशा विविध स्वरूपांत त्यांचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रातील जनतेपुढे आहे आणि सर्व क्षेत्रांत त्यांनी ज्या सहजतेने आणि कुशलतेने कार्य केले आहे, ते पाहिले, म्हणजे त्यांच्या यशस्वी जीवनाचा अर्थ समजू लागतो.
 
माझ्या त्यांच्यासंबंधीच्या आठवणी स्वाभाविकच राजकीय क्षेत्रातील आहेत आणि त्या आठवणींचा काळही मोठा पल्लेदार आहे आणि तो म्हणजे १९३० पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत. माझ्या त्यांच्यासंबंधीच्या आठवणी माझ्या विद्यार्थिदशेपासून ऐन कर्तेपणाच्या दिवसापर्यंतच्या आहेत आणि त्या आठवणी अगदी ताज्या टवटवीत आहेत. त्यांना मी प्रथम पाहिले, ती आठवण सांगतो. १९३० च्या देशभक्तीने भारलेल्या दिवसांत आमच्या कराडला नामवंत पुढारी प्रचारासाठी येऊन जात असत. अशाच एका संध्याकाळी काकासाहेबांना मी कराडच्या सभेत बोलताना प्रथम पाहिले आणि ऐकले. कृष्णा घाटावर सभेसाठी तुडुंब गर्दी झाली होती. त्या दिवसांत ध्वनिक्षेपणाची व्यवस्था नसल्यामुळे आवाज उंचावून बोलावे लागत असे. काकासाहेब बोलावयास उठले आणि सभेला जमलेल्या समुदायाच्या शेवटच्या टोकावर नजर पोहोचेना, तेव्हा ते समोरच्या टेबलावर चढले व टेबलावर उभे राहून त्यांनी भाषण केल्याचे मला स्मरते. भाषणात देशभक्तीचे आवाहन होते, नर्म विनोद होता, खट्याळ उपरोध पण होता. ब्रिटिश राज्यावर मर्मभेदी टीका होती. एक तासभर त्यांच्या वक्तृत्वाच्या ओघात आम्ही वाहून गेलो होतो असे म्हटले, तरी चालेल आणि मनात कुठे तरी खोलवर या शैलीपूर्ण वक्तृत्वाची व व्यक्तीची कायमची नोंद झाली.

योगायोग असा, की काकासाहेबांच्या या भाषणासाठी त्यांना परत कराडलाच कोर्टात आरोपी म्हणून यावे लागले. स्वाभाविकच व्याख्यानामुळे भरलेला खटला ऐकण्यासाठी आम्ही सर्व तरुण मुलांनी कोर्टात खच्चून गर्दी केली होती. कोर्टाचे काम तसे फार वेळ चालले नाही. कारण प्राथमिक जुजबी स्वरूपाचा सरकारी पुरावा झाल्यानंतर काकासाहेबांना जेव्हा स्वत:चे निवेदन करण्याची वेळ आली, तेव्हा ते उठून उभे राहिले. त्यांच्या लकबीप्रमाणे त्यांनी डोळ्यावरचा चष्मा काढला व तो पुसत पुसत मॅजिस्ट्रेटला दोन वाक्यांत सांगितले, की 'हे भाषण मी जरूर केले आहे आणि पुन्हा प्रसंग पडल्यास हेच भाषण करीन.' त्या वेळी खटल्याची कामे यंत्राप्रमाणे चालत. काकासाहेबांच्या या निवेदनानंतर मॅजिस्ट्रेटनी त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. कोर्टात वकिलीची कामे संपल्यानंतर ते ज्या घाईगर्दीने वकील म्हणून बाहेर पडत असतील; तितक्याच घाईगर्दीने निकाल ऐकल्यानंतर तुरुंगाच्या खोल्यांकडे - जशी काही ठरलेली अपॉइंटमेन्ट पार पाडायची आहे, अशा घाईने ते निघून गेले. हे सर्व माझ्या मनाने अगदी टिपून घेतले. नाही म्हटले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काहीसे आकर्षण तेव्हाच्या तरुण पिढीला होते. माझ्यावरही त्याचा परिणाम होता. ही माझी काकांच्याबद्दलची पहिली आठवण आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org