ऋणानुबंध (112)

एखाद्या व्यक्तीच्या गरजेतून एखादा उपक्रम शाहू महाराजांनी सुरू केला असेल, पण त्यालाही चिरस्थायी संस्थारूप देण्याची दक्षता त्यांनी घेतली. या संदर्भात मराठा व इतर बोर्डिंगांची कल्पना उल्लेखनीय ठरेल. श्री. पी. सी. पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात मराठा बोर्डिंगची कल्पना कशी साकार झाली, याची हकीगत निवेदन केली आहे. पी. सी. पाटील हे कोल्हापूर संस्थानामधील मराठा समाजातील पहिले व वरच्या क्रमांकाने मॅट्रिकमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. महाराजांना हे कळताच त्यांनी पी. सी. पाटलांना बोलावणे धाडले आणि खाणावळ कोठे होती, याची चौकशी केली. आपण व आपला मित्र एका ब्राह्मणाच्या खाणावळीत जेवत होतो. पण आम्ही दोघे मराठा म्हणून वेगळी पंगत असे आणि ताट-वाटी नंतर धुवावी लागे, म्हणून खोलीवरच जेवण करीत होतो, असे पी. सीं. नी सांगितले, लगेच महाराजांनी मराठाच नव्हे, तर निरनिराळ्या समाजांतील विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगांची व्यवस्था केली. व्यक्तीच्या गरजेतून संस्थेचा जन्म झाला आणि कोल्हापूर संस्थानच्या या विद्यार्थी बोर्डिंगांनी फार मोठी कामगिरी बजाविली. बोर्डिंगाचा लाभ घेतलेले असंख्य विद्यार्थी आहेत.

शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्याचा लाभ सर्व जातींच्या लोकांना मिळावा, हा महाराजांचा कटाक्ष होता. म्हणून त्यांनी अनेक सोयी व सवलती उपलब्ध करून दिल्या. परंतु केवळ शाळा, महाविद्यालये, बोर्डिंग, शिष्यवृत्त्या एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत. त्यांनी आपल्या महाविद्यालयात उत्तमोत्तम शिक्षकवर्ग प्रयत्नपूर्वक आणला. डॉ. बाळकृष्ण यांच्यासारख्या तज्ज्ञांची नेमणूक केली, हेही त्यांच्या गुणग्राहकतेचे उदाहरण म्हणून सांगता येईल. याबाबतीत त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही; त्यांनी कै. रानडे व कै. गोपाळ कृष्ण गोखले यांचा आदर्श ठेवला होता. १९१८च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत ब्राह्मणेतर समाजापुढे भाषण करताना महाराज म्हणाले,

'ज्यांच्या मृत्यूमुळे जनतेला अतिशय तळमळ लागून राहिली, असे माझे मित्र न्यायमूर्ती रानडे व गोपाळराव गोखले यांनी मागासलेल्या लोकांची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले होते. मागासलेल्या लोकांमध्ये शिक्षणप्रसार करण्यासाठी महत्प्रयास केले पाहिजेत, ही गोष्ट प्रथम मी त्यांच्यापासून शिकलो.'

तथापि, ब्राह्मण समाजाची विद्या ही फक्त मराठा समाजात आली, की आपले कार्य झाले, असे शाहू महाराजांना वाटत नव्हते. त्यांनी अस्पृश्य म्हणून समजल्या जाणा-या समाजाला विद्येचा लाभ मिळावा, त्याची सामाजिक प्रतिष्ठा वाढावी आणि अस्पृश्यतेचा कलंक घालवावा, यासाठी जे विविध प्रयत्न केले, ते विशेषच मोलाचे होते. महाराजांनी महारवतने नष्ट केली; रामोशी वगैरी जातींच्या लोकांना रोज पाटलाकडे वर्दी द्यावयास लागे, ती पद्धत रद्द केली. आपला चाबुकस्वार मोटारचा ड्रायव्हर, माहूत हे महार असतील, अशी व्यवस्था त्यांनी केली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org