ऋणानुबंध (107)

पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा

श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा त्रिशताब्दी महोत्सव या देशात आणि परदेशांतही नुकताच साजरा झाला. या घटनेला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला, तेव्हा लिहिले होते: 'राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम ठेवण्याचे एक चांगले साधन आहे.' टिळकांच्या काळात या उत्सवाला राजकीय महत्त्व होते. त्या वेळी आपण स्वातंत्र्यासाठी लढत होतो. स्वतंत्र भारतात आता राष्ट्रपुरुषांचे स्मरण करावयाचे, ते कृतज्ञता बुद्धीने आणि राष्ट्रीय संस्कार करण्यासाठी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या राष्ट्रीय उत्सवात नवी पिढीही सहभागी झाली, हा एक महत्त्वाचा फायदा मी समजतो. प्रत्येक पिढीवर असे संस्कार व्हावे लागतात. राष्ट्रीयत्वाची ओळख करून द्यावी लागते. राष्ट्रीयत्वाची ओळख म्हणजे आपला वारसा काय आहे, याची ओळख. राष्ट्रीयत्वाचा वारसा म्हणजे राष्ट्रीय ध्येयवादाचा आणि राष्ट्रीय सद्गुणांचा वारसा. प्रत्येक पिढीचे प्रश्न नवीन असतात. प्रत्येक पिढी नव्या जाणिवा घेऊन येते, त्या पिढीला इतिहासाच्या या शिदोरीचा उपयोग होतो.

शिवाजी महाराज हे आपल्या राष्ट्रीय इतिहासातील अभिमानाचे, गौरवाचे स्थान आहे. भारतीय जीवनमूल्यांचे आणि भारताच्या राष्ट्रीय सद्गुणांचे ते सगुण रूप आहे. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचे सुंदर शब्दचित्र काढले आहे. त्या शब्दचित्रात शिवाजी महाराजांचे सद्गुण आणि त्यांचे कार्य नेमके वर्णन केले आहे. मला त्यातील दोन उक्ती महत्त्वाच्या वाटतात :
'निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू' ही एक व 'पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा' ही दुसरी.

या दोन उक्तींत शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची व व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देता येईल. शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा प्रयत्न हा एक पराक्रमी पुरुषाचा राज्य बळकाविण्याचा प्रयत्न नव्हता. त्याला राष्ट्रीय उद्दिष्ट होते, नैतिक प्रेरणा होती. 'बहुजनांना' आधार देण्याची इच्छा होती. उदंड आत्मविश्वास होता. 'हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा आहे' असे महाराजांना वाटत होते, ही त्यांच्या प्रतिज्ञेची पार्श्वभूमी होती. म्हणून 'निश्चयाचा महामेरू' प्रतिकूल परिस्थितीतही टिकला.

हे राज्य समकालीन राज्यांपेक्षा वेगळे व्हावे, गुणवान व्हावे, ही त्यांची दुसरी मनीषा होती. म्हणून ते स्वत: श्रीमंत योगी झाले; पुण्यवंत, नीतिवंत झाले. 'राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे' हा आदर्श त्यांच्यापुढे होता; आणि सर्वांत महत्त्वाचे शब्द म्हणजे 'जाणता राजा'. हा राजा ज्ञानी होता, उमजणारा होता, समयज्ञ होता. त्याला जनतेची जाण होती. शिवाजी महाराजांचे कार्य आणि व्यक्तित्व अनेक पिढ्यांना प्रेरक ठरले आहे - ठरणार आहे.

अशा महापुरुषाचा राज्याभिषेक ही एक साधी घटना असत नाही. कारण शिवाजी महाराजांचे राज्य हे नुसते राज्य नव्हते, ते 'स्व'राज्य होते. एका राजाचे राज्य नव्हते. सतराव्या-अठराव्या शतकांतील भारतीय इतिहासाला वळण देणारे, भक्कम पाय रोवून उभ्या राहिलेल्या एका साम्राज्याला आव्हान देणारे, हिंदुस्थानातील सत्तेच्या राजकारणातील जनशक्तीवर आधारलेल्या स्वायत्त सत्ताकेंद्राची स्थापना घोषित करणारे ते राज्य होते. शिवाजी महाराजांची संकल्पना मर्यादित नव्हती. युगप्रवर्तक राज्य निर्माण करण्याची ती संकल्पना होती. इतिहासाचा प्रवाह अनिष्ट राजकीय वळण घेत होता. त्याला आपल्या दिशेने खेचण्याचे सामर्थ्य त्या संकल्पनेत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org