प्रकरण ९ - समारोप
यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यविषयक भूमिकेचा आणि त्यांच्या प्रस्तावनेमधून आलेल्या समीक्षात्मक विचारांचा परामर्श घेतला आहे. तसेच त्यांच्या विविध भाषणांमधून व लेखांमधून त्यांनी साहित्यविषयक मांडलेली भूमिका येथे विशद केली आहे. यशवंतरावांची साहित्यविषयक मते समाजशास्त्रीय विचारांनी परिणत झालेली दिसतात. समाजमनावर नीती विचारांचा असलेला पगडा लक्षात घेता, नैतिकतेला बाधा आणणारा विचार कितीही कलासंपन्न असला तरी तो समाजात रूजत नाही. भावत नाही. विवेकवादी विचार यशवंतरावांच्या साहित्यविषयक भूमिकेत दिसतो. यशवंतरावांनी आपल्या साहित्यविषयक विचारांत व समीक्षालेखनात लेखकांच्या व्यक्तिमत्त्वाची केलेली चिकित्साही महत्त्वाची असून त्यांच्या एकूण साहित्य विचाराशी ती सुसंगत अशीच आहे. यशवंतरावांना वाङ्मयीन अभिरूचीला वळण लावण्यासाठी टीकेचा अंकुश महत्त्वाचा वाटतो. समीक्षेत दोषासह गुणांचेही मूल्यमापन निर्भीडपणे करावे. तुलनेला महत्त्व देऊन ती तुलना योग्य असावी. याची दक्षता घेण्यास सांगतात. कोणताही श्रेष्ठ लेखक अथवा साहित्यवृत्तीचे मानदंड ठरवून दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, जनवादी साहित्य किंवा तत्सम साहित्याशी तुलना करीत सुटणे त्यांना योग्य वाटत नाही. कोणत्याही कलाकृतीचे आत्मिक सौंदर्य समीक्षकाने शोधावे साहित्याची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असली पाहिजे. त्या साहित्यात मानवी मूल्यांची किंवा गुणांची वाढ करम हे उद्दिष्ट असले पाहिजे. जे साहित्य सर्वसामान्यांचे हित साधते तेच खरे साहित्य. निव्वळ शब्दलालित्य म्हणजे साहित्य नव्हे. ललित साहित्याने समाजकारण केले पाहिजे. म्हणजेच ललित साहित्य सामाजिक वास्तवाशी भिडले पाहिजे असे त्यांचे मत होते. जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य साहित्याने केले पाहिजे. साहित्य केवळ विरंगुळ्यासाठी नसते. साहित्यात माणूस हा केंद्रबिंदू आहे असे त्यांचे प्रतिपादन होते. मानवी मन आणि भावना यांचे उदात्तीकरण करून एकूण जीवन गतिमान करते तेच खरे साहित्य होय. अशी त्यांची साहित्यविषयक भूमिका होती.
त्यांनी साहित्याचा जीवनवादी विचार आपल्या विवेचनातून मांडला. साहित्याची संस्कारक्षमता व शब्दाचे सामर्थ्य यावर त्यांचा विश्वास होता. साहित्यिक प्रक्षुब्ध झाला पाहिजे असे ते नेहमी म्हणत. साहित्यावर व संस्कृतीवर श्रद्धा असल्याने समाज जिवंत राहतो, तो सांस्कृतिक साहित्यिक मूल्यांमुळे असे ते म्हणतात. साहित्य आणि समाजजीवन यांच्यात त्यांनी कधीच फारकत केली नाही म्हणून यशवंतरावांच्या साहित्याविचारात समाजचिंतनाला अग्रस्थान आहे. त्यांनी काव्य, नाट्य, ललित, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, कादंबरी इत्यादी संबंधी मोलाचे विचार प्रकट केले आहेत. कविता हा साहित्याचा आत्मविष्कार प्रकार असून 'नवनिर्मिती' असल्याने तिच्या सौंदर्याला आणि बंदिस्तपणाला ते महत्त्व देताना दिसतात. जीवनातल्या अनंत वेदनांना शब्दरुप देणा-या आणि अनेकांच्या भावनांना शब्दरूप देऊन आनंद निर्मिती करणा-या या प्रकाराबाबत स्वत:ची भूमिका ते नम्रपणे व्यक्त करतात. काव्यविषयक विचारात भावना आणि कल्पना यास अधिक महत्त्व देतात. काव्यविषयक दृष्टिकोनात त्यांच्या मनाची मूस विचारी आणि चिंतनशील अशीच आहे.
नाट्यविषयक विचारांत लोकरंजन आणि लोकाराधन या नात्याने नाट्याचे स्थान महत्त्वाचे आहे असे ते मानतात. नाटकातून आलेली कृत्रिमता आणि रंजकता त्यांना मान्य नाही. म्हणून नाटकातील आशयसंपन्नता, कथानकाची गती आणि प्रेक्षकांवरील परिणाम या विषयी दक्ष राहण्यास नाटककारास सांगतात. थोडक्यात रंगभूमी अधिकाधिक लोकाभिमुख असायला हवी. काळाबरोबर निर्माण होणारे नवे नवे प्रश्न नाट्यरुपाने मराठी नाट्यवाङ्मयात मांडावे. 'नाना रसांचा' आस्वाद नाटकातून घेता यावा. एकूणच जीवनवादी विचाराला धरूनच त्यांचे नाटकाविषयीचे विचार आले आहेत. चरित्र, आत्मचरित्र या वाङ्मयाबाबत यशवंतरावांना विशेष रुची होती. या वाङमयप्रकाराबाबत विचार मांडताना आस्वाद आणि आकलन त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनातून अधिक सुलभ असल्याचा प्रत्यय येतो. तसेच एकाद्या कालखंडाचा साक्षी म्हणूनही या वाङ्मयाचा उपयोग व्हावा अशी त्यांनी अपेक्षा प्रतिपादली आहे. कथेच्या वैचारिक परिणामापेक्षा तिचा भावनात्मक परिणामच त्यांना विशेष महत्त्वाचा वाटतो. लघुनिबंध आणि लघुकथा या वाङ्मयाबाबत त्यांनी अधिक प्रगल्भ विचार मांडला आहे. यशवंतराव चव्हाण हे कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कवी म्हणून त्यांच्या स्वतंत्र वाङ्मयीन कलाकृती नसल्या तरी त्यांनी या वाङ्मयाचा साहित्यविचार केला आहे. त्याचबरोबर स्फुट ललित लेखन व अध्यक्षीय भाषणातून त्यांनी अशा स्वरुपाच्या लेखनाबाबत स्वतंत्र विचार केला आहे.