यशवंतरावांच्या प्रस्तावनेतील सामर्थ्य आणि निराळेपणा हे गुण स्वयंसिद्ध आहेत. त्यांच्या या प्रस्तावनेने मराटी साहित्याला पत आणि प्रतिष्ठा निश्चित मिळाली आहे. कलाकृतीचे सौंदर्य विशद करून सांगणे, तसेच लेखक, कवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करणे असाही हेतू दिसतो. 'श्री नामदेव दर्शन' संपादक रेळेकर-इनामदार-मिरजकर या ग्रंथास लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये नामदेवांच्या कार्यकर्तृत्वाचा असा उल्लेख करतात, "ज्ञानेश्वर ही ज्ञानाची मूर्ती होती, तर त्याचे समकालीन नामदेव ही मुमुक्षूंच्या आर्ततेची, भक्तांच्या व्याकुळतेची मूर्ती होती. मराठी संतांच्या कार्याचा हा पाचशे वर्षांचा कालखंड राजकीय दृष्ट्या चैतन्यहीन वाटला तरी संतांच्या कार्यामुळे भक्तिमार्गाच्या व सास्वताच्या क्षेत्रात तो बहरलेला वाटतो. या काळाने कैवल्यवृक्षाचे अनेक बहर पाहिले, ज्ञानेश्वर-नामदेव ही याच कैवल्यवृक्षाची उमललेली फुले होती... नामदेवाच्या वाङ्मयात भक्तीवेड्या मनाचे उसासे, उद्रेक आहेत." अशा स्वरुपाचे त्यांच्या कार्याचे मूल्यमापन 'नामदेव दर्शन' च्या प्रस्तावनेत करतात आणि त्यांच्या तत्कालीन कार्याचा गुणगौरव करतात. त्या गुणांचा परिणाम सांगतात. त्यामुळे समीक्षकास आवश्यक असणारा तटस्थपणा या प्रस्तावनेत अनुभवास येतो.
यशवंतरावांनी वेळोवेळी प्रस्तावनेत मांडलेले साहित्यविषयक विचार हे पूर्णपणे सुसंगत असेच आहेत. तसेच या विचारातून तर्कशुद्ध अशी साहित्यमीमांसा त्यांनी निर्माण केली आहे. काही वेळा त्यांनी लेखक, कवी व संपादक यांचे कौतुक केले आहे. अनेकदा त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून समीक्षेच अनेक गुण दिसतात. त्यांच्या या प्रस्तावनेतून समीक्षेतून अनेकदा अभिजात रसिकतेचे दर्शन घडते.
यशवंतरावांनी चरित्रात्मक व गौरवग्रंथांना विशेष लक्षणीय अशा प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यात त्यांची चरित्रात्मक वाङ्मयाबाबतची भूमिका जशी व्यक्त होते त्याचप्रमाणे त्या चरित्रात्मक लेखनातील चांगले वाईट निवडण्याची त्यांची क्षमताही व्यक्त होते. 'ऋणानुबंध' या ललित पुस्तकाच्या साहित्यबाबतची भूमिका मांडताना, "साहित्यक्षेत्रात माझी मूळ आणि आवडती भूमिका ख-या अर्थाने स्पर्धातील व टिकून राहणारी भूमिका आहे. शब्दांच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य जसे शब्द करतात तसेच साम्राज्यशक्ती धुळीला मिळवण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दांत आहे. कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानव इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकांचे प्रमुख शस्त्र आहे." कोणाही साहित्यिकाला जीवनाचे नाट्य टिपण्यासाठी डोळे व कान तल्लख आणि तरबेज असण्याची गरज असते. यशवंतरावांच्या या दोन्ही इंद्रियांना कुशाग्रतेने जे देणे लाभले आहे. त्याला तोड नाही. त्यांनी केलेले साहित्यक्षेत्रातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
यशवंतरावांच्या या प्रेरक प्रस्तावनेतील ललित शिफारसी म्हणजे त्यांचे निर्भेळ साहित्यिक कलाकृतीचे केलेले मूल्यमापनच होय. त्यामुळे सदरच्या कलाकृतीला विश्वासार्हता आणि वजन लाभले. यशवंतरावांना कुस्ती, क्रीडा, नाट्य, संगीत इ. कलांची आवड होती. 'भारतीय मल्ल विद्या शास्त्र' सारख्या पुस्तकांची शिफारस करताना ते लिहितात. "महाराष्ट्राने मल्लविद्येची नुसतीच जोपासना केली नसून या विद्येच्या विकासास फार मोठा हातभार लावला आहे. यात शंका नाही. तरी पूण पूर्वापार चालत आलेल्या या विद्येकडे जास्तीतजास्त तरुणांची मते आकर्षित करण्याची गरज आज भासू लागली आहे. अशा वेळी या मल्लविद्येची शास्त्रोक्त माहिती देणारे ग्रंथ उपयोगीच सिद्ध होतील." असा विश्वास व्यक्त करतात. यशवंतरावांनी त्यांच्या राजवटीच्या काळात मल्लविद्येला प्रोत्साहन दिले होते. शिफारसी दिलेल्या लेखकात जुन्या, जाणत्या आणि नवोदित अशा लेखकांचा अंतर्भाव आहे. त्यात भाई माधवराव बागल, नरहर कुरुंदकर, डॉ. पंजाबराव जाधव, अ.का.प्रियोळकर, शांता शेळके, गो.नी. दांडेकर, मोहनराव लोखंडे, कृ.गो. सूर्यवंशी, बाबूराव जोशी, रामभाऊ जोशी, बाळासाहेब पाटील, मीना जोशी. ना. धों. महानोर, भीकूशेट ज्ञानदेव पाटील, भा. ह. पाटील, कुमार धनवडे, धो. म. मोहिते, सविता भावे, यांसारख्या कितीतरी लेखकांची नावे दिसतात.