आत्मचरित्र विषयक विचार
आत्मचरित्र हा अत्यंत वास्तववादी असा वाङ्मयप्रकार आहे. तो कादंबरीइतकाच लोकप्रिय आणि महत्त्वाचा आहे. आतापर्यंत चरित्र या वाङ्मयप्रकाराचे भावंड म्हणजे आत्मचरित्र अशी समजूत होती. पण दोन्ही वाङ्मयप्रकाराकडे आजही पाहिले जाते. मराठी चरित्रापेक्षा आत्मचरित्राचा प्रांत लहान असला तरी अधिक मनोवेधक आहे. चरित्राच्या तुलनेत आत्मचरित्रांची संख्या कमी आहे. कारण स्वत: विषयी लिहिण्यास माणसास संकोच वाटतो. समीक्षक सांगतात त्याप्रमाणे सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा सरस वाङ्मयनिर्मितीचे जिवंत झरे सापडू शकतात. ही लोकशाहीची सुसंगत अशी वृत्ती मूळ धरु लागल्यानंतर आत्मचरित्रात्मक लेखनाचा हळूहळू उदय झाला. लेखकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाची स्वत:च्याच शब्दात सांगितलेली कहाणी म्हणजे आत्मचरित्र असे स्थूलपणे म्हणता येईल. स्वत:च स्वत:चे चरित्र लिहावयाचे म्हणजे एक प्रकारे आत्मनिवेदन, आत्मप्रकटीकरण, आत्मकथन करण्यासारखे आहे. त्यामुळे हा वाङ्मयप्रकार आत्मनिष्ठ आहे. अनुभवांची तीव्रता इतर कोणत्याही वाङ्मयप्रकारापेक्षा आत्मचरित्रात अधिक असते. माणूस स्वत:स जितके ओळखतो तितके त्यास अन्य कुणीही ओळखू शकत नाही. विशेषत: त्याचे व्यक्तिगत जीवन आणि अंतरंग हे त्याच्या स्वत:कडूनच अधिक यशस्वीपणे व प्रभावीपणे प्रगट होणे शक्य आहे. आत्मचरित्रातील लेखन हा केवल तर्काचा भाग राहात नसून ती एका व्यक्तीची विश्वसनीय माहिती असते. ती एक वास्तव जीवनकथा असते. काल्पनिकतेची कसलीही ठिगळजोड करण्याचा अधिकार आत्मचरित्रकाराला नसतो. किंबहुना जे सांगेन ते सत्यच सांगेन अशी त्याची प्रतिज्ञा असावी लागते. त्यामुळे वास्तवाच्या चाकोरीपासून आत्मचरित्रकाराला रत्तीभरही बाहेर जाऊन चालत नाही. 'आत्मचरित्र हा एक जिवंत हाडामासाच्या व्यक्तीने स्वत:चाच दिलेला अंतर्बाह्य स्वरुपाचा वृतान्त असतो. तो समग्र सर्वांगानी अभ्यासून पारखून दिलेला असतो म्हणून वाचकाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असतो."
यशवंतरावांनी आत्मचरित्र या वाङ्मयप्रकाराबाबत स्फुटलेखन केले आहे. निरनिराळ्या नियतकालिकातून, वृत्तपत्रातून व सभासंमेलनातून त्यांनी या वाङ्मयाविषयी आपली भूमिका मांडली आहे. आत्मचरित्रपर लेखनामध्ये वाचकांच्या मनात जागृत होणा-या कुतूहलाची जात ही इतर वाङ्मयप्रकारापेक्षा वेगळी असते. ब-याच वेळा ती अधिक तीव्र असू शकते. आत्मचरित्रामध्ये चित्रित केलेले जीवन दर्शन हे मुख्यत: असंभाव्य, अपरिचित किंवा दूरचे वाटत नाही. ते जीवन आपणास ठाऊक असणा-या किंवा बौद्धिक दृष्ट्या व भावनात्मक दृष्ट्या संभाव्य वाटणा-या एकूण जीवनाचे लक्षणीय व अपरिहार्य घटक बनलेले असते. संस्मरणे, आठवणी, दैनंदिनी, कैफियती, कबुलीजबाब, चरित्र-आत्मचरित्रपर लेखन या किंवा यांसारख्या चरित्रवाङ्मयाशी निकटचे नाते असलेल्या छोट्या मोठ्या लेखनप्रकारातून दिसते.
यामधून व्यक्तिमनाचे, मानवी जीवनप्रवाहाचे अपेक्षित-अनपेक्षित स्फुल्लिंग उमटलेले आढळतात. हे प्रकार जर समर्थपणे हाताळले गेले तर मानवी इच्छा-आकांक्षाचा, मनोधैर्याचा, दौर्बल्याचा, संघर्षाचा, शरणागतीचा एक अर्थपूर्ण आलेख कदाचित सापडू शकेल. जीवनाला सामोरे जाण्याची शक्ती या लेखनप्रकारात आहे. आपल्या कहाणीच्या निवेदनाने मानवी जीवनाचे कानेकोपरे प्रकाशझोतांनी उजळून टाकण्याची अपूर्व क्षमता श्रेष्ठ आत्मचरित्रामध्ये असते.