यशवंतरावांनी ज्याप्रमाणे १९२० पूर्वीच्या नाटकांचा व नाटककारांचा आढावा घेतला त्याप्रमाणे १९२० नंतरच्या मराठी नाटकांचाही आढावा घेतला. या काळात निर्माण झालेल्या नवनाट्यांच्या अंतरंगाची आणि बहिर्रंगाची चिकित्सा ते करतात. १९३३ मध्ये नाट्यमन्वंतर लिमिटेड ही संस्था स्थापन झाली. १९३० च्या सुमारास चित्रपटाच्या आगमनामुळे मराठी रंगभूमीला अवकळा प्राप्त झाली होती. बहुतेक सर्व जुन्या नाटक कंपन्या मोडकळीस आल्या. असा परिस्थितीत नाट्यसृष्टीला नवचैतन्य देण्याचा प्रयत्न 'नाट्यमन्वंतर' या नावाखाली काही तरुणांनी केला. त्यात श्री. वि. वर्तक, अनंत काणेकर आणि के. नारायण काळे हे प्रमुख होते. 'आंधळ्यांची शाळा' हे नाट्यमन्वंतराचे नाटक नवीन पद्धतीने नाटक म्हणून बरेच गाजले. याच सुमारास आचार्य अत्रे हे नाटककार म्हणून लोकांपुढे आले. त्यांची गंभीर आणि विनोदी अशी दोन्ही प्रकारची नाटके गाजत राहिली. आणि प्रतिकूल परिस्थितीत मराठी रंगभूमी टिकून राहिली. अत्रे यांच्या नाट्यकृतीबाबत यशवंतराव लिहितात, "आचार्य अत्रे यांनी गंभीर व प्रहसनवजा अशी दोन्ही प्रकारची नाटके लिहून एक प्रकारे मराठी रंगभूमीवर स्वत:ची वैशिष्टये प्रस्थापित केली. नाटक मंडळींचा संस्थानी कारभार, चित्रपटांचे बहुरंगी आकर्षण, समाजाची आर्थिक स्थिती. यामुळे मराठी रंगभूमीला अवकळा आली. तेव्हा तिला हातभार लावून जगविणा-या साहित्यिकांत श्री. अत्रे यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. विडंबन आणि अतिशयोक्ती यावर आधारलेल्या प्रसन्न विनोदचे आवाहन हा त्यांच्या भात्यातील रामबाण ! 'घराबाहेर' व 'उद्याचा संसार' ही सामाजिक समस्येला हात घालणारी त्यांची गंभीर नाटकेही खास उल्लेखनीय आहेत." यशवंतरावांनी अत्रे यांच्या नाट्यसामर्थ्याचे गुणगान केलेच शिवाय त्यांनी नाट्यलेखन केले ते मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात. हे ध्यानात घेतले की अत्र्यांच्या नाट्यनिर्मितीचे वैभव खास करून वेगले समजावून सांगण्याची गरजच उरत नाही, असा निर्देश ते करतात.
१९३३ पासून पुढे १९४५ पर्यंत रंगभूमी गाजविणारे अत्र्यांप्रमाणे अनंत काणेकर आणि मो. ग. रांगणेकर यांचाही यशवंतराव उल्लेख करतात. रांगणेकरांचे 'कुलवधू' हे नाटक फारच लोकप्रिय झाले असाही ते उल्लेख करतात. रंगभूमीच्या पडत्या काळात झब्सेनचे नवे नाट्यतंत्र मराठीत आणून श्री. भोळे, के वर्तक, आणि श्री. रांगणेकर यांनी रंगभूमीची फार मोठी सेवा केली आहे." असाही गौरवपूर्ण उल्लेख ते करतात. मरगळलेल्या रंगभूमीला संजीवनी देण्याचा प्रयत्न काही नाटककारांनी केला. मराठी नाट्यसृष्टी विविध प्रकारच्या नाटकांनी पुन्हा एकदा गजबजून गेली. १९३० पर्यंत मराठी रंगभूमी संगीतामुळे गाजत होती, तो प्रभाव हळूहळू कमी झाला आणि संगीत नाटक टिकून राहिले. ते भावगीताच्या स्वरुपात होते. स्त्रियांची भूमिका स्त्रियांनीच करण्याची पद्धत रुढ झाल्यामुळे आणि रंगभूमीवरील नेपथ्य बदलामुळे मराठी नाट्यसृष्टी अधिकाधिक वास्तवाकडे झुकू लागली. तीन अंकी संपूर्ण नाटकाऐवजी एक अंकी नाटक या काळात अस्तित्वात आले. ही बदलत्या काळाची गरज होय. आता बालगंधर्वांसारखा साडी नेसलेला नट पुन्हा रंगभूमीवर दिसणार नाही, असा जुन्या व नव्या नाटकातील बदलही ते सूचित करतात. रंगभूमी अधिकाधिक लोकाभिमुख झाली तरच ती टिकणार आहे. असेही ते सूचित करतात, "जुन्याचा अभिमान जरुर असावा. कारण नवे हे त्यातूनच आलेले असते. पण जुने तेवढे चांगले नवे तेवढे वाईट असेही समजण्याचे कारण नाही." पूर्वीची नाटके व आजचे नाटक यातील संघर्षात न जाता त्यांनी आजची नाटकेही समाजवास्तवाचा सूक्ष्म वेध घेऊ पाहात आहेत हे त्यांचे भाष्य फार मोलाचे आहे. तसेच नाट्यगीतांची भावगीते होऊन त्यातला 'गायनरस' नष्ट होऊ द्यायचा नसल्यास रंगभूमीच्या सूत्रधारांनी घ्यावयाची काळजी ते सूचित करतात. म्हणून मराठी रंगभूमी टिकवण्यासाठी नटांना नाटकाचे योग्य आकलन होण्याची गरज आहे असे ते प्रतिपादन करतात." साहित्यिकांचा व नटांचा सहवास घडला तर गटांची नाटकाविषयीची समज वाढते. त्यामुळे अभिनयाचा दर्जा वाढतो. मराठी साहित्यिकांनी व नव्या नाटककारांनी ही परंपरा पुन्हा चालू करण्यासारखी आहे. आज मराठी रंगभूमीचा पिसारा शोभिवंत दिसतो आहे. त्याचा कस वाढवायचा असेल तर असे नाट्यजीवनाशी समरस झालेले नाटककार हवे आहेत." नाटककारांनी अधिक प्रभावी लेखन करण्याचा सल्ला यशवंतराव देतात. तसा प्रयत्नही १९३० नंतरच्या काही नाटककारांनी केल्याचा उल्लेख ते करतात." १९३० नंतरही वरेरकर, अत्रे, रांगणेकर, पु.ल.देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या नाटककारांची गाजलेली नाटके हेच दर्शवितात की मराठी रंगभूमीची परंपरा मोठी आहे, ती अशी डगमगणार नाही." असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात. या नाटककारांनी तेव्हाच्या काळाची गरज ओळखून नाट्यलेखन केले. त्या दृष्टीने नाट्यबदलाचा योग्य असा लवचिकपणाही त्यांनी दाखविलेला होता. पण केवळ मागणीचे स्वरुप लक्षात घेऊन पुरवठ्याचे रुप बेतणारे निर्जीव नाट्यलेखन या मंडळींनी केले नाही.