यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ५५

डॉ. सर्वश्री सर्वपल्ली राधाकृष्णन्, श्रीनिवास शास्त्री, भुलाबाई देसाई, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ, ना. सी. फडके यांसारख्या काही चांगल्या व्याख्यात्यांची व्याख्याने त्यांनी ऐकली होती. या व्याख्यात्यांनी घालून दिलेल्या पायवाटेचा यशवंतरावानी राजरस्ता केला. ते लिहितात, "एकंदरीत प्रत्येक भाषणाची थोडीफार तयारी, चिंतन करणे आवश्यक असते. अनेक विषयांवरील अनेक व्यक्तींची संभाषणे, विचार यांच्या वाचनाचीही आवश्यकता असते. वक्तृत्वाखाली वक्तृत्व मी कधीही केलेले नाही. त्यामुळे कधी माझी भाषणे चांगली होतात, तर कधी सामान्य होतात, पण ती कधी पडत नाहीत.

मी मूळचा राजकीय वक्ता आहे व त्याला अनुसरून ज्या विषयात रस आहे, त्यासंबंधी मी बोलत असतो. परराष्ट्र संबंध, आर्थिक व सामाजिक परिवर्तन हे माझे अति आवडीचे विषय आहेत. पण मला खरा आनंद होतो, मी जेव्हा साहित्यविषयक प्रश्नांसंबंधी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा त्या क्षेत्रातील मी अधिकारी माणूस नाही. परंतु बहुश्रुत आहे असा माझा दावा आहे. त्यामुळे त्या विषयांवर बोलण्याचा मला नेहमी आनंद वाटतो." यशवंतरावांची साहित्याबद्दलची ही स्वागतशील वृत्ती अनेक साहित्यिक मेळाव्यांच्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणात प्रभावीपणे प्रकट झाली आहे. अशा काही भाषणांतून आपल्या साहित्यविषयक अभिरुचीचा यशवंतराव जसा आढावा घेतात त्याप्रमाणे त्या अभिरुचीत वेळोवेली बदल घडवून आणणा-या साहित्यातील घडामोडींचेही ते विचारपूर्वक चिंतन व्यक्त करतात. इतर कोणात्याही विषयापेक्षा साहित्यक्षेत्रावर आपले अधिक प्रेम आहे. हे त्यांच्या वरील उता-यावरुन लक्षात येते. यशवंतरावांचे भाषण रंगत असे ते त्यातल्या अंगभूत सामर्थ्यांमुळे हे जितके खरे तितकेच त्यांच्या भाषेचे सामर्थ्य हाही त्याला उपकारक विषय होता. भाषाप्रभू यशवंतराव हे शब्दाच्या अचूक फेकीने श्रोत्यांच्या मनाचा वेध घेताना आपल्याला दिसतात. याचबरोबर आवश्यकतेनुसार वाकणारी भाषा हे यशवंतरावांच्या भाषणावरील एक अमोघ अस्त्र आहे आणि याचा पुरेपुर उपयोग यशवंतरावांनी करून घेतलेला दिसतो.

साहित्य व संस्कृतिविषयक भाषणे

यशवंतरावांनी वेगवेगळ्या ठिकाणी साहित्यविषयक व संस्कृतिसंबंधी योजनापूर्वक व मन:पूर्वक भाषणे केलेली आहेत. त्यामध्ये सुभाषितप्राय असे काही विचार ही मांडले आहेत. या दृष्टीने त्यांची प्रस्तुत भाषणे महत्त्वपूर्ण आहेत. 'विदर्भ साहित्य संमेलन ( दि. ६.१२.१९६४ ) उद्घाटन प्रसंगीने भाषण, 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' ( दि. ६. १२. १९७५ ) , कराड येथे भरलेल्या ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी स्वागताध्यक्षीय भाषण, 'साहित्य आणि संस्कृती' ( दि. २२.१२.१९६०), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे नागपूर येथील उद्घाटनपर भाषण, 'साहित्यिकांची जबाबदारी' ( दि. १३. १२. १९६० ), सावरगाव डुकरे येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटनपर भाषण, 'लोकभाषा हीच ज्ञानभाषा' ( दि. ७.९.१९६७ ), कोपरगाव येथे के. जे. सावेच्या आर्टस् व कॉमर्स कॉलेजच्या पायाभरणीच्या वेळी केलेले भाषण, 'राष्ट्रभाषेचा प्रश्न' ( दि. २८.५.१९६६ ), औरंगाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती, वार्षिक अधिवेशनाच्या वेळी केलेले भाषण, 'आजच्या साहित्याकडून अपेक्षा' (दि. २५.१२.१९६५ ), हैदराबाद येथे मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी केलेले भाषण, मराठी रंगभूमीची अखंड परंपरा' ( दि. ३१.१.१९६५ ), नांदेड येथे संपन्न झालेल्या ४७ व्या मराठी नाट्यपरिषदेच्या वेळी मांडलेले विचार 'राष्ट्रभाषा हिंदी' ( दि. १९. ३. १९६१) मुंबई प्रांतिक राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या २२ व्या पदवीदान समारंभाच्या वेळी दिलेले भाषण यांसारख्या कितीतरी भाषणांमधून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जनत करण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी या भाषणामधून वाङ्मयीन विचार त्यांनी मांडले आहेत. ही भाषणे माहितीचे अफाट भांडार आहे, तसा तो चितनशीलतेचा सुंदर प्रत्ययही आहे. साहित्याबद्दल व साहित्यिकांबद्दल जसे त्यांचे उत्कट प्रेम दिसते तशी श्रोत्यांबद्दलची जिवंत कळकळही जाणवते. त्यांच्या उपरोक्त विषयांवरील भाषणांचा कितीही आस्वाद घेतला तरी कान तृप्त होत नाहीत अशीच त्यांची भाषणे आहेत.


यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org