यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ५०

यशवंतरावांनी आपल्या 'भूमिका' या भाषण संग्रहात विस्तृत प्रस्तावना लिहून आपल्या लेखनामागची पार्श्वभूमी विशद करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. "या पुस्तकाचे शीर्षक 'भूमिका' हे ठरविले आहे. याचे कारण ज्या अनेक विषयावर जी वैचारिक क्षेत्रे निर्देशित केली आहेत, त्याविषयी माझी आणि माझ्या पक्षाची काही निश्चित भूमिका होती. त्यात सुसंगतता व एकसूत्रता आहे असे मला वाटते. ही भूमिका काहीशी स्पष्ट व्हायला या भाषणांचा उपयोग होईल असे मला वाटते. मराठी वाचकांच्या हाती 'भूमिका' हे पुस्तक देताना माझी एवढीच अपेक्षा आहे, की या सुसंगत भूमिकेची नोंद त्यांच्याजवळ राहील." अशी अपेक्षा ते वाचकांकडून बाळगतात.

यशवंतरावांच्या प्रस्तावनांना जीवनवादाची एक व्यापक पार्श्वभूमी आहे. तिची विवरण करण्याच्या हेतूनेच त्यांनी प्रस्तावना लिहिल्याचे दिसते. काही प्रस्तावनांमध्ये संबंधित कलाकृतीचे एकदम योग्य विस्तृत स्पष्टीकरण केले आहे. तर काही ठिकाणी एखादा परिच्छेदातून शुभेच्छापर लेखन केले आहे. काही कलाकृतींतून त्या प्रस्तावना खूप काही सांगून जातात. त्यामुळे त्यांची उपयुक्तता अधिक जाणवते. तसेच यशवंतरावांच्या प्रस्तावना वाचकांना सहृदयपणे अधिक काही समजावून देतात. त्याचबरोबर त्यांच्या या प्रस्तावनेतून त्या कलाकृतीच्या बाबत दर्शन घडते. यशवंतरावांनी ज्या काल-परिस्थिती अनुषंगाने लेखन झाले त्याचा संदर्भ, प्रेरणा व कार्य दिशा शोधता शोधता त्यांच्या अंतर्गत वैशिष्टयांसह आपल्या लेखनाचा गाभा उलगडून दाखवावा अशी त्यांच्या प्रस्तावना लेखनाची पद्धत दिसते. साहजिकच तत्कालीन परिस्थिती, समस्या, नैतिक आचरण, साहित्यिक मूल्य, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समस्यांसारख्या विषयांची चर्चा ही प्रस्तावनेतून झालेली आढळते.

यशवंतराव सदैव कार्यमग्न असताना व वारंवार दौ-यावर असतानाही त्यांनी वेळातवेळ काढून अत्यंत आत्मीयतेने अनेक लेखक, कवींच्या पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन केले. ते नि:संशय अभ्यासनीय आहे. प्रस्तावना विषय बनलेले लेखक व त्यांचे साहित्य, यांचे मराठी वाङ्मयातील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न त्यातून सिद्ध झाला आहे. यशवंतरावांच्या प्रस्तावनांतील साहित्य विचाराकडे मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकाला वाङ्मयेतिहासकाराला दुर्लक्ष करता येणार नाही.

यशवंतरावांच्या प्रस्तावना लेखनाचा अभ्यास करताना या लेखनातील समतोल, चिंतनशीलता, विद्वत्ता, व्यासंग आणि प्रतिभाशक्ती यांची ओळख होते. तसेच त्यांचे साहित्यावरील उदंड प्रेम, गुणग्राहकवृत्ती लेखकाला आनंद व प्रोत्साहन देण्याचे त्यांच्या ठायी असणारे सामर्थ्य आणि बरेवाईट रोखठोकपणे सांगणारी स्वच्छ शैली यांचे मर्मस्पर्शी दर्शन घडते. ज्या परिस्थितीत हे लेखन झाले, ते पाहता त्यांनी आपल्या प्रस्तावनांतून नवोदित लेखकाला प्रोत्साहित केले व जुन्या जाणत्या लेखकांच्या लेखनाचा आस्वाद कसा घ्यावा याचा वस्तुपाठच दाखवला आहे. समजून घेणे व समजून देणे अशी दुहेरी समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे हे लेखन उभय लेखकांना व वाचकांना उपकारक ठरले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org