यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ६०

इतिहासाने इंग्रजी भाषेशी जो घनिष्ठ संबंध आला त्यामुळे इंग्रजी भाषा आपल्याला परकी राहिली नसून तिने आपले फार मोठे हितच साधले आहे. कारण ज्ञानाची अपार भांडारे इंग्रजीने आपल्याला खुली केली आहेत व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यवहार सुलभ केला आहे." म्हणून अलीकडच्या काळात भाषेला मर्यादित स्वरुपात बंदिस्त न ठेवता या सर्व भाषांचा अभ्यास झाला पाहिजे. विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन इंग्रजी सारख्या भाषेतून झाले आहे. हे आपणास नाकारता येत नाही. म्हणून केवळ इंग्रजी भाषिकच इंग्रजी शिकतात असा समज न होता सर्व जगातील लोकांना विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करावयाची असेल तर त्यांना इंग्रजी भाषेच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. यशवंतराव सांगतात, "आता वैज्ञानिक, औद्योगिक आणि तांत्रिक विषयांवरील ग्रंथरचना त्यांना आमच्या शिक्षणात आणि साहित्यात एक उपयोगी अंग म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असे जरी असले तरी ज्याला आम्ही अक्षरवाङ्मय म्हणतो, त्याची प्रत ह्या सर्वांपेक्षा भिन्न असते. असे साहित्य मानवाच्या मूलभूत सद्भावनांना आवाहन करते आणि मानवाला जीवनसंघर्षासाठी समर्थ बनवते. अशा साहित्यामुळे समाज नित्य प्रगतीला अभिमुख राहतो." असा निर्वाळा ते देतात. म्हणून मराठी भाषांबरोबर अन्य भाषेचाही अभ्यास व्हावा. कारण प्रत्येक भाषेला एक कुलशील असते. त्याची ओळख आपल्याला असणे गरजेचे आहे. ही जाण असेल तर त्या त्या भागातील नवे वाङ्मयीन प्रवाह कोणते? नव्या सामाजिक व वैचारिक चळवळी केव्हा सुरु झाल्या? कोणत्या साहित्यिकांचा आणि कलावंतांचा प्रभाव जनमानसात आहे? याची जाणीव किंवा माहिती होईल व यातून राष्ट्रीय मानसिकता निर्माण होऊन त्या प्रदेशाबाबत जवळीकता निर्माण होण्यास मदत होईल. थोडासा निर्धार, स्वाभिमान, काळजीपूर्वक केलेली आखणी यांच्या आधारे मानवाचे भाषाभान समर्थ होईल व राष्ट्रीय ऐक्याचे बोल तो बोलत राहील असे त्यांना वाटते.

लोकभाषा हीच ज्ञानभाषा व्हावी

यशवंतराव चव्हाण यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की "माणसाने भाषा निर्माण केली आता भाषेला माणसे निर्माण करावी लागणार आहेत." एकूणच भाषेची संपन्नता वाढावी अशी सूचना ते येथे व्यक्त करतात. कुठलीही भाषा ही ताठर झाली तर व्याकरणांच्या नियमांनी बंदिस्तपणा येण्याची शक्यता असते. मग तिचे डबके होते. प्रवाह थांबतो. तेव्हा भाषा सर्वसामान्य माणसाना समजावी, आकलन व्हावी, म्हणून तो सोपी करण्याकडे कल असावा.संस्कृतप्रचुर बोजड शब्द टाळावेत. बोलीभाषा भाषेचे साचलेपण फोडीत असते. मुक्त करीत असते. बोलीभाषेतील शब्द आले तर ती भाषा सामान्य लोकांना आपली वाटते. म्हणून प्रादेशिक भाषा देवनागरी लिहिण्यास वाढत्या प्रमाणात उत्तेजन मिळावे. असे झाले, "तर भाषिक प्रश्नांचा पूर्ण कायापालट होऊन जाईल. आपल्याला अलग ठेवणा-या अनेक भिंती त्यामुळे जमीनदोस्त होऊन तुटकपणाचे बांध वाहून जातील आणि भाषाभाषांमध्ये देवाणघेवाण सुरु होऊन सर्व भाषा समृद्ध बनतील." असा विचार त्यांनी औरंगाबाद येथे अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या वार्षिक अधिवेशनाच्या वेळी मांडला. एवढेच नव्हे तर त्या त्या राज्यात असणा-या लोकांची जी भाषा असेल तिचा तेथील शासनाचे, शिक्षणाचे व दैनंदिन व्यवहाराचे माध्यम म्हणून वापर झाला पाहिजे. अन्यथा लोकशाही शासन हे केवळ नावापुरतेच राहील व लोकशाहीचा आत्माच हरवून बसेल असा संकेतही ते देतात.

'मराठीचे सर्वसंग्राहक स्वरुप' या विषयावर विदर्भसाहित्य संमेलनाच्या  उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण हे त्यांची साहित्यविषयक भूमिका स्पष्ट करणारे आहे. साहित्य आणि प्रादेशिकता, मराठीवर इतर भाषेचा झालेला प्रभाव, भाषेचा विकास, भाषेच्या स्वरुपाचा मराठी साहित्यावरील प्रभाव, मराठी साहित्याला उन्नत स्थितीप्रत नेणारे साहित्य, संतांच्या वाणीचा प्रभाव, साहित्य हा समाजाचा आरसा आहे अशा कितीतरी विषयावर त्यांनी चिंतन विचार मांडले, हे चिंतन त्यांनी सहृदयतेने केले आहे. या विषयीचा त्यांचा व्यासंग, मौलिक विचारांची त्यांची झोप, आणि भाषाशैलीचे सामर्थ्य या विविध गुणांनी त्यांचे वक्तृत्व बहरलेले असे. त्यामुळे यशवंतरावांची भाषणे वाचली की अधिकच विलोभनीय वाटतात. यशवंतरावांची मराठी भाषा अगदी निर्मळ व बिनचूक आहे. तिच्यात जुनेपणाही दिसतो व आधुनिक विचारही विपुल दिसतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org