यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३५

यशवंतरावांचा आत्मचरित्र वाङ्मयाबाबत विशिष्ट असा दृष्टिकोन होता. आत्मचरित्र वाचताना यशवंतराव ती व्यक्ती व तिची घडण, सहानुभूतीने समजून घेण्याच्या भूमिकेने वाचत असत. आत्मचरित्रे वाचताना वाचकांनी नैतिक न्यायाधीशाची भूमिका न घेणे बरे असेही मत ते मांडतात. आत्मचरित्रविषयक त्यांची भूमिका मांडताना ते लिहितात, "अलिकडच्या आत्मचरित्रांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे आपले बालपण व तरुणपण यांबाबत ती अतिशय पारदर्शक प्रामाणिक असतात. पण अलीकडच्या चालू काळाबाबत मात्र ती अतिशय सावध असतात. अर्थात याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. कारण ही सावधानता समजण्यासारखी आहे. शिवाय एखाद्या माणसाच्या अगदी खाजगी जीवनात डोकवायची उत्सुकता मला वाटत नाही. तो माणूस खाजगी जीवनात कसा होता, याच्याशी वाचक म्हणून माझा काही संबंध आहे असे मला वाटत नाही. तो ज्या वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आला त्याबद्दल त्याने तपशीलवार लिहावे एवढीच माझी अपेक्षा असते व ती पूर्ण झाली की मला समाधान वाटते." यशवंतराव अलीकडच्या आत्मचरित्राची वैशिष्टये विशद करताना लेखकाच्या क्षेत्रानुसार आत्मचरित्रात पडणारा फरकही नोंदवतात. साहित्याचा आस्वाद घेणारे रसिक, मूल्यमापन करणारे समीक्षक आणि निर्मिती करणारे साहित्यिक हे व्यवहारातील महत्त्वाचे वर्ग आणि समाजातील महत्वाचे घटक आहेत. तसेच साहित्यही कधी एक ठशाचे नसते. बदलते जीवन, बदलता संदर्भ, बदलत्या राजकीय, सामाजिक घडामोडी याही साहित्यात असतात. जसा काळ तसे साहित्य. त्यामुळे काळाच्या परिणामापासून साहित्य अलिप्त राहू शकत नाही. लेखक आत्मचरित्रामधून आपली व्यकितगत अनुभूती स्वाभाविकपणे प्रकट करत असतो. तसेच लेखक ज्या समाजजीवनात जगत असतो त्या समाजाची परंपरा, संस्कृती व जीवनपद्धतीने चित्रण आत्मचरित्रात येत असते. म्हणूनच अलीकडची आत्मचरित्रे अतिशय पारदर्शक व प्रामाणिक असतात.  तसेच चालू काळाबाबत मात्र ती अतिशय सावध असतात. ही यशवंतरावांची या वाङ्मयाबाबतची भूमिका योग्यच आहे. विशेषत: दलित आत्मचरित्र वाचल्यानंतर यशवंतरावांच्या वरील विधानांची सत्यता जाणवते.

यशवंतरावांची आत्मचरित्रपर भाष्ये जर डोळ्यांखालून घातली तर त्यांच्या या कलाकृतीबाबतची मते स्पष्ट जाणवतात. चिंतनपर साहित्याची निर्मिती करण्यात जीवनातील पुष्कळ वेळ व्यतीत करणा-या ध्येयाच्या पूर्ततेसाठी साहित्य निर्मिती करणा-या यशवंतरावांच्या आत्मनिवेदनात आत्मचरित्र वाङ्मयविषयक घडामोडींना आवर्जून स्थान मिळणे स्वाभाविक वाटते. साहित्यिक म्हणून त्यांनी 'चरित्रे-आत्मचरित्रे', 'आवडनिवड', या लेखांमध्ये या वाङ्मयाबद्दल जो विचार मांडला आहे त्या निवेदनाचा सूर बराच मोकळा आहे. समंजस व गंभीर वस्तुनिष्ठतेचा प्रत्ययही त्यांच्या या लेखांमधून येतो. ते म्हणतात, "आत्मचरित्रामधून सत्य लपविले जाणे, आत्मगौरव व आत्मसमर्थन होणे याला आपले सामाजिक जीवनातील दुहेरीपण ब-याच प्रमाणात जबाबदार असावे. म्हणजे आपले आदर्श, आपली तत्त्वे आणि व्यवहार यांत फरक असतो, विरोध असतो. या आजच्या सामाजिक वास्तवतेचा हवे तर दांभिकतेचा म्हणा- आविष्कार आत्मचरित्र लेखनातही अपरिहार्यपणे होतो. म्हणून आत्मचरित्राचे मोठेपण मी ती संपूर्ण सत्य सांगतात की नाही या कसोटीवर ठरवत नाही आणि खरे म्हणजे संपूर्ण सत्य हे शेवटी आकाशपुष्पासारखेच नाही काय?" सत्य लपविणे आत्मगौरव व आत्मसमर्थन आत्मचरित्रातून येत याचा ठपका यशवंतराव लेखकावर न ठेवता समाजजीवनातील त्रुटींमध्ये ठेवतात. आत्मचरित्रामध्ये उत्कट चित्रणप्रसंगातून आणि आत्मनिवेदनातून जर काही जीवनचिंतन आले तर ते बोधापेक्षाही वरच्या पातळीवरचे ठरेल. ख-या आत्मचरित्रामागे आत्मप्रकटीकरणाची भूमिका असते. ते आत्मसमर्थन नसते. म्हणून आत्मचरित्रामध्ये आत्मप्रदर्शन मुळीच असू नये. आत्मप्रकटीकरण जितके प्रांजळ, उत्कट, तटस्थ तितकी आत्मचरित्राची उंची वाढत जाईल.

व्यक्ती, वाङ्मय आणि इतिहास यांचा लेखकाने कलात्मक संयोग घडवून आणलेला असतो. त्यामुळे विद्यार्थी दशेपासून यशवंतरावांनी अशा स्वरुपाची आत्मचरित्रे अभ्यासली होती. "त्या दृष्टीने काकासाहेब गाडगीळ, आचार्य अत्रे, ना. सी. फडके  इत्यादींची मराठी आत्मचरित्रे, त्याचप्रमाणे व्हेव्हेलच्या आठवणी, मौलाना आझादांचे 'इंडिया विन्स फ्रीडम', राजेंद्रबाबूंचे आत्मजीवन इ. पुस्तके मी वाचली आहेत." यात बर्टांड रसेलचे आत्मचरित्र त्यांना खूपच आवडलेले दिसते. कारण एखाद्या माणूस प्रामाणिक आत्मचरित्र लेखनाची कोणती मर्यादा गाठू शकतो हे रसेलच्या पुस्तकात दिसते. त्या त्यांच्या आत्मचरित्राचे शेवटचे परिच्छेद म्हणजे तर गद्यात लिहिलेली एक सुंदर कविता आहे, असा उल्लेख यशवंतराव करतात. त्याचप्रमाणे गांधीजींचे आत्मचरित्रही सत्यकथन व अहिंसेचा शोध या सूत्रांनी वेढलेले असे. ते एक अविस्मरणीय आत्मचरित्र आहे असे मत ते नोंदवतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org