यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३०

मराठी नाट्यवाङ्मयाचा परामर्श घेताना आणि प्रसंगी नव्या नाटकाविषयी बोलताना यशवंतरावांनी मराठी रंगभूमीवरील नव्या बदलाचे स्वागत केले आहे. नाट्यरचनेचे नवे तंत्र नवविचारांच्या दर्शनासाठी नव्या नाटककारांची मराठी रंगभूमीला असणारी आवश्यकता यशवंतरावांनी संधी मिळेल तेथे प्रतिपादन केली आहे. पु. ल. देशपांडे, अत्रे, वरेरकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, बाळा कोल्हटकर यांच्या नाटकांतही वैशिष्टयेही त्यांना दिसली आहेत. काळाबरोबर निर्माण होणारे नवे प्रश्न -नाट्यरुपाने मांडण्याचा प्रयत्न या नाट्यकाराने केला आहे. परंतु मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न आणि वास्तवाचे प्रखर दर्शन हा नव्या पाश्चात्य नाटकाचा विशेष मराठी नाटकात दिसत नाही याची खंत यशवंतरावांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे परंपरेचा वारसा सांगत असताना यशवंतरावांना बदललेल्या जीवनमूल्यांची आणि वाङ्मयीन मूल्यांचीही जाणीव आहे. त्यामुळे नव्या नाटकांबद्दलचे त्यांचे विचार प्रगमनशील आहेत. नव्या अनुभूतीने नवा नाटककार संपन्न असेल तर जीवनाचे सामर्थ्याशआली दर्शन तो घडवू शकेल. यासाठी जुन्या नाटकांचा वारसा त्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वासही यशवंतराव व्यक्त करतात. मराठी रंगभूमीची मरगळ दूर करण्यासाठी नवे तंत्र, नवे विषय, नव्या काळाची जाणीव ठेवून प्रयोग करणे यशवंतरावांना जरुरीचे वाटते. नव्या नाटकांतून बदलत्या जीवनाचे सखोल व उत्कट दर्शन व्हायला हवे केवळ जुन्याची थट्टा आणि नाविन्याची हौस एवढेच नवतेचे स्वरुप असू नये, ही अपेक्षाही यशवंतरावांनी व्यक्त केली आहे.

नाटके चांगली हवी असतील तर नटांना योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या पोटाची, त्यांच्या भावनांची योग्य कदर केली गेली पाहिजे. त्यासाठी यशवंतरावांनी काही विचार व्यक्त केले आहेत. राज्यसरकार आणि केंद्रसरकार यांनी मराठी रंगभूमीला आर्थिक पाठबळ द्यावे-त्यांना उत्तेजन द्यावे. उत्कृष्ट नाटककारांना प्रतिवर्षी पारितोषिक देण्यात यावे असेही ते सूचित करतात. रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीचा उत्कर्ष कसा करावा याचे सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत. प्रत्येक जिल्ह्यात नाटकाचे प्रयोग सरकारी सहकार्याने व्हावेत, म्हणजेच संबंधित संस्थांनाही फायदा होईल आणि जिल्ह्यातील लोकांनाही प्रयोग पाहण्याची संधी मिळेल. मराठी नाट्यपरिषदेने नाट्यसंमेलनाऐवजी कलाकारांच्या कलागुणांना अधिक वाव द्यावा, अधिक निधी उभा करून अशा कलाकारांना सुवर्णपदके व लेखी पुरस्कार द्यावेत. प्रेक्षकांनी या कार्यास हातभार लावला पाहिजे. तसेच नाट्यपरिषदेमुळे मराठी रंगभूमीवर उत्साह आला व त्याबरोबर नाट्यवाङ्मयात नवनिर्मिती होऊ लागली. प्रयोग दृष्ट्या नवे बदल होऊ लागले. मराठी रंगभूमीला नवीन परिमाणे देण्यासाठी या नाट्यपरिषदेचे कार्य मोलाचे आहे. या परिषदेला यश येवो अशीही अपेक्षा ते करतात. एकूणच या रंगभूमीच्या संदर्भात नवी दृष्टी, नवा विचार पचवून नवे नाटककार जन्माला येणे ही काळाची गरज आहे, असे यशवंतरावांना वाटते. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात बाबूराव पेंढारकर किंवा दुर्गा खोटे यांच्यासारख्या बोलपटातील कलावंतांनी रंगभूमीवर पदार्पण करून मराठी रंगभूमी जिवंत करण्याचे केलेले प्रयत्न यशवंतरावांना महत्त्वाचे वाटतात. नटवर्य बालगंधर्व यांचासुद्धा यासंदर्भात उल्लेख करून त्यांना मासिक तीनशे रुपये मानधन देण्यात येत आहे असा संदर्भ यशवंतराव देतात. नाट्यकलावंत, रंगभूमी व नाट्यविचार यासंबंधींचे त्यांचे विवेचन पाहिले म्हणजे यशवंतरावांची नाट्यविषयक भूमिका व दृष्टिकोन सहज लक्षात येतो.

नाट्य या वाङ्मयप्रकाराचा विचार करताना यशवंतराव तो एक कलाप्रकार मानतात. त्यातील श्राव्य आणि दृश्य कलेचे महत्त्व ते विसरत नाहीत. नाटकाचा जनमानसावर होणारा परिणाम ते अधिक लक्षात घेतात. या कलाप्रकाराचा समाजाशी असणारा अनुबंधही यशवंतरावांनी लक्षात घेतला आहे. लोकरंजन आणि लोकराधन या नात्याने नाट्याचे स्थान ते महत्त्वाचे मानतात. नाटकातून आदर्श मूल्यांची जपणूक झाली पाहिजे. त्यासाठी रंगभूमी अधिकाधिक लोकाभिमुख असायला हवी. तसेच मराठी नाटकांतून सामाजिक प्रश्नांची मांडणी व्हावी, जीवनदर्शन चित्रित करावे असा त्यांचा दृष्टिकोन होता. जीवनविषयक चिंतनाला चालना देण्याचे सामर्थ्य नाट्यकृतीत असणे गरजचे आहे. म्हणून काळाबरोबर उत्पन्न होणारे नवे नवे प्रश्न नाट्यरुपाने मराठी वाङ्मयात मांडले गेले पाहिजेत. त्यांत कंटाळवाणा एकसुरीपणा नसावा. वैविध्य असावे. नाटक केवळ करमणुकप्रधान असू नेय. पण नाटकातून नाना रसांचा आस्वाद घेता यावा असे त्यांचे विचार होते. यावरून त्यांची नाट्यअभिरुची किती सजग होती, याचे प्रत्यंतर येते.

यशवंतराव चव्हाणांनी आपल्या साहित्यामध्ये मराठी रंगभूमीच्या थोर परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. याचबरोबर भावनात्मक आवाहन करणा-या भडक नाटकाबद्दलचे त्यांचे मत प्रतिकूल आहे. या स्वरुपाच्या नाटकात आलेली कृत्रिमता आणि रंजकतेकडे झुकलेली अभिरुची यशवंतरावांना मान्य नाही. नाटकातील आशयसंपन्नता, कथानकाची गती आणि प्रेक्षकांवरील परिणाम या विषयी यशवंतराव अधिक दक्ष आहेत. मराठी रंगभूमीची दूरावस्थाही त्यांनी लक्षात घेतलेली आहे. नाटकाचा एक वाङ्मयप्रकार म्हणून जसा ते विचार करतात तसा त्यांचया प्रयोगमूल्यांचा विचार त्यांच्या विवेचनात येतो. त्यांनी मराठी नाटकाचा आढावा घेतला. त्याबरोबर मराठी रंगभूमीवरील नव्या बदलाचे त्यांनी स्वागत केले आहे. नाट्यरचनेचे नवे तंत्र, नव्या नाटककारांची मराठी रंगभूमीला असणारी आवश्यकता यशवंतरावांनी संधी मिळेल तिथे प्रतिपादन केली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org