यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- २५

या यशवंतरावांच्या वरील नाट्यकलाकृतीवरील भाष्यामुळे अमेरिकन रंगभूमीचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोच. शिवाय त्यांची अभिरुचीपूर्ण नाट्य समीक्षाही किती कल्पक आहे याचीही जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. मराठी नाटकांवर जेवढे त्यांचे प्रेम आहे. तेवढेच ते परकीय भाषेतील नाटकांवर प्रेम करतात. ताश्कंदला गेले असताना तेथे रात्री एक ऑपेरा पाहून आले. हे ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारलेले नाटक. या नाटकातील संगीत आणि नाटकात काम करणारी पात्रे यातील विशेष त्यांना तीव्रतेने जाणवले. त्याबद्दल ते लिहितात, " काल रात्री एक ऑपेरा पाहण्यासाठी गेलो होतो. उझबेकी भाषेतील ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारलेले हे नाट्य भव्य होते. संगीत उत्तम होते. परंतु Dilorom चे काम करणारी गायिका इतकी जाडजूड होती की तिला सुंदर कसे म्हणावे हेच समजत नव्हते. तास दोन तास होतो. नंतर निघून आले." यशवंतराव पाश्चात्य कलाकृतीचा अशा रीतीने मनसोक्त आनंद घेत असत. अरसिक माणसापासून चार हात दूर राहण्याचा सल्ला ते आपणास देतात. विविध कलांनी मानवी जीवन समृद्ध होते. मानवी मन संस्कृत बनते. मात्र एखादा माणूस साक्षर असूनही सुसंस्कृत नसतो किंवा रसिक नसतो. जीवनातील आनंद कशात आहे व तो कसा लुटावा हे अशा रूक्ष माणसास समजत नाही. कलेचे रहस्य त्याला उमगलेले नसते. म्हणून जीवनात तो कुठेच रममाण होत नाही. पाश्चायत्य देशामध्ये मात्र चित्र वेगळे आहे. नृत्याचे व इतर कलांचे शिक्षण घेण्यासाठी शेकडो लोक, स्त्रिया, पुरुष आठवड्यात एक दोन वेळा त्यांच्या सोईप्रमाणे एकत्र जमतात, कलेचा आस्वाद घेतात. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये १ ऑक्टोबर १९७२ मध्ये विदेश दौ-यावर गेले असता तेथील कला केंद्र पाहिले. तेथे नृत्याचे व इतर कलाशिक्षण घेण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात व आपले छंद जोपासतात. अशाच तेथील कलावंताबद्दल ते लिहितात, " या सर्व संसारी स्त्रिया ( होम वाईव्हज) आहेत. शरीराची बांधणी आकर्षक राहावी वेळ जावा नवीन शिकावे आपल्या पतीने मन सतत आकर्षित ठेवावे या हेतूने अनेक संसारी स्त्रिया हे नृत्य शिकतात. नृत्य पाहण्यासारखे होते. तालबद्ध पद्धतीने शरीराची ठसकेबाज हालचाल करणारे हे लोकनृत्य असावे." यावरून कलावंतांबद्दलची आत्मीयता तर स्पष्ट होतेच शिवाय पाश्चात्य देशातील संस्कृतीकडेही ते अंगुलीनिर्देश करतात. अव्वल दर्जाचे आंग्ल नाटककारांपासून ते आधुनिक नाटककारांपर्यंत तसेच कलावंत, लोकजीवनाशी समरस झालेले वासुदेव, गोंधळी इ. लोककलावंताचे नाना प्रकारचे संदर्भ त्यांच्या लेखनात व भाषणात आढळतात. त्यांनी नाटक व नाट्यकलावंतांवर उदंड प्रेम केले. कलावंतांची तरल संवेदनक्षमता ते ओळख असत. त्यामुळेच त्यांनी अनेक जुन्या नटांचा उल्लेख केला आहे. बालगंधर्व, केशवराव दाते यांसारखे कसलेले नट व बहारदार जुनी नाटके यांच्या आठवणी सुद्धा सुखद वाटतात.

यशवंतराव चव्हाणांनी मराठी रंगभूमीच्या थोर परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी मराठी नाट्यकलेचा गौरव झाला. दिल्लीतील बहुभाषिक रसिकांचे या कलेने मनोरजन केले. यातच हा नाट्यकलेचा सर्वोच्च सन्मान आहे असा ते गौरवोद्गार काढतात. तसेच कित्येक नामवंत नाट्यकलाकृतीची चे चिकित्सा करतात. सौभद्र, शाकुंतल, भाऊबंदकी, शारदा यासारख्या नाटकांचा ते उल्लेख करतात. एखादे नाटक रंगभूमीवर सदैव तितकेच प्रसन्न राहते. त्याचे यश कमी होत नाही. याची कारणमीमांसा करताना यशवंतारावांना नाटककारांचे रचनाचातुर्य महत्वाचे वाटते. त्यातील कथाबीज, पात्रनिर्मिती, रसपरिपोष व उत्तम पद्यरचना इ. गुणांमुळेच किर्लोस्करांचे सौभद्र आणि देवलांचे 'शारदा' रंगभूमीवर नेहमीच आकर्षिक करीत राहिले.

अण्णासाहेब किर्लोस्करांनी स्वत:च्या प्रतिभाबलावर आणि उदंड नाट्यकर्तृत्वावर एक नवीन रंगावट निर्माण केली. उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी नाटकांच्या प्रेरणेने मराठी संगीत नाटक नावाचे एक नवे नाट्य रसायन त्यांनी निर्माण केले. ते नाट्यरसायन मराठी नाटकाचे गौरवचिन्ह ठरले. मराठी नाटककार, प्रयोगकर्ते आणि प्रेक्षक यांच्या प्रकृतीची ती एक जन्मखूण म्हणायला हवी. या नाट्यप्रेरणांच्या प्रवृत्तींचा विस्तार आणि विकास नाटककार गो. ब. देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी ह्या प्रमुख नाट्यप्रतिभावंतांनी केला. १८८५ ते १९२० हा कालखंड म्हणजे मराठी नाट्यवाङ्मयाच्या दृष्टीने मोठा भाग्याचा आणि वैभवाचा, नाटयकलेची प्रतिष्ठा या काळात स्थिरपद झाली. या काळात संस्कृत नाट्यवाड्मयापेक्षा इंग्रजी नाट्यतंत्र अधिक परिणामकारक ठरले. शोकांतिका हा वाङ्मयप्रकार सर्वस्वी इंग्रजीतून मराठीत आला. त्याच्यावर शेक्सपिअरच्या नाटकाचा परिणाम झाला. त्यामुळे मराठी शोकांतिकेला सखोल व व्यापक स्वरुप प्राप्त झाले. मराठीतील शोकांतिकेचे निर्माते - खाडिलकर ! या काळात पूर्वार्धात सात्त्विक लोकरंजनाचे प्रयोजन होते तर उत्तरार्धात नाट्यकलेने लोकशिक्षण व लोकजागृतीकडे लक्ष वळवले. राजकीय विचार, सामाजिक समस्या पण नाटकात येऊ लागल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org