यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ८८

देशाला प्रतिष्ठा लाभेल असेच सर्वांनी वागले पाहिजे या संदर्भात ते म्हणतात, "हिमालयाची उत्तुंगता, सागराची खोली व विशालता, भारताच्या नद्यांतून अखंड वाहात असलेली एकच उदात्त उदारतेची परंपरा, मंदिरात तेवणारे नंदादीप व मशिदीमशिदीतून भल्या पहाटे ऐकू येणारी बांग हे भारताचे व्यक्तिमत्त्व आहे. मला वाटते त्याचा विसर या देशाला पडू नये. तो विसर पडला नाही तर हा देश खरोखरच महान होईल हा माझा विश्वास आहे." असा विचार त्यांनी 'लोकसत्तेने' घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी मांडला. देश, देशातील लोक, त्यांचे जीवन, त्यांच्या समस्या याचा विचार त्यांनी सदैव आपल्या भाषणांतून मांडला. त्यांच्या भाषणांतील काही अवतरणे, नीतीसूत्रे, विचारधन हे आजच्या नेत्यांना निश्चितच मार्गदर्शक आहेत. ते म्हणतात, "तलवारीने लढाई जिंकावी असा काळ आज राहिलेला नाही. आजचा काळ, आजचा जमाना, आपल्या विचारांची तलवार साफ आहे की नाही, आपल्या मनातल्या भावना साफ आहेत की नाहीत, आपल्या प्रतिज्ञा साफ आहेत की नाहीत हे पाहण्याचा आहे. आजची लढाई ही विचारांची लढाई आहे. एका अर्थाने ती तत्त्वांची लढाई आहे." यशवंतरावांच्या अशा अनेक अवतरणातून अत्यंत मजबूत,शब्दांचा सच्चा, विनम्र स्वभावाचा, दिलाचा पक्का असाच नेता प्रतीत होत राहतो. महाराष्ट्र क्लब मैदान पुणे येथे 'व्यर्थ न हो बलिदान' या विषयावर जाहीर सभेत भाषण देताना सैन्या-विषयीचा आदरभाव ते असा व्यक्त करतात. "झाडावर फुललेले सुंदर फुल जस आपण देवाला वाहतो. त्याचप्रमाणे अत्यंत हुशार, अत्यंत कर्तृत्वान, अत्यंत समर्थ नेतृत्वाचे सर्व गुण अंगी असलेली अशी आमच्यातील वेचक वेचक तरुण मुले आमच्या जीवनाचा, आमच्या संसाराचा हा सुंदर भव्य फुलोरा, आम्हाला रणचंडीला अर्पण करावा लागतो. त्यांची आठवण आम्हाला कशी विसरता येईल?" सैन्यात वायुदलात, नैसेनेत, मरण पत्करलेल्या प्राणाहुती दिलेल्या वीर जवानांना ते अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त करतात. घराघरातून अशी नवीन पुष्पे पुन्हा फुलावीत, ती फूलून विकसित व्हावीत व त्यांचा सुगंध सर्वत्र पसरावा अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.

भाषणांची शैली.

यशवंतरावांच्या भाषणांची शैली ही मोहिनी घालणारी होती. आपल्या मराठी भाषणांच्या वैभवशाली भाषासौंदर्याने राजकारणात एक स्वतंत्रयुग निर्माण करण्याचा मान यशवंतरावांना मिळाला. म्हणून गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात यशवंतरावांच्या इतके अनुकरण दुस-या कोणत्याही राजकीय नेत्याचे झाले नाही. असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण नंतरच्या काळात निर्माण झालेल्या बहुतेक सर्व राजकीय पुढा-यांवर कमी अधिक प्रमाणात यशवंतरावांच्या भाषेचा, शैलीचा आणि वक्तृत्वाचा ठसा उमटलेला आढळतो. त्यांचे विचार, त्यांची भाषा, त्यांचे मिष्कील बोलणे, त्यांचा उपरोध, त्यांचा विनोद हे सगळेच वेगळे होते. नाविन्यपूर्ण होते.  यशवंतरावांच्या प्रतिभेची ठेवण आणि झेपच काही वेगळी होती. जो सुभाषिते निर्माण करतो तो अमर लेखक. याप्रमाणे ज्यांच्या भाषणात सुभाषिते देण्याचे सामर्थ्य अधिक प्रमाणात त्या भाषणाला भाषिक सौंदर्य अधिक प्राप्त होते. यशवंतरावांच्या भाषणांत शेकडो सुभाषितांची निर्मिती झाली आहे. यशवंतरावांनी आपल्या मानवी जीवनाच्या कडू-गोड भावनांचा नि अनुभवांचा अर्क काढून तो आपल्या सुभाषितात ओतला आहे. त्याचा अनेक ठिकाणी प्रत्यय येत राहतो. असा हा त्यांच्या भाषेचा आणि विचारांचा कलात्मक अन् तालबद्ध रुबाब त्यांच्या भाषणात आढळतो. मोजक्या वाक्यातच अर्थाचे ब्रह्मांड उभे करण्याचे सामर्थ्य यशवंतरावांच्या बुद्धीत होते. उदा. "शांततेचा विचार करणारा आपला देश आणि तोंडाने शांततेचा मंत्र म्हणत म्हणत खिशातील खंजिराला हात घालणारा चीन." "व्यक्तीचे मोठेपण नाही. राज्याचे मोठेपण महत्त्वाचे आहे; पण ही गोष्ट आपण कधीही विसरु नका." "सासरी जावेसे वाटते पण माहेर तर सुटत नाही." "तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या मनामध्ये निर्धाराचे दुर्ग उभे केले पाहिजेत. प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरूष, प्रत्येक मूल या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारा एक किल्ला बनला पाहिजे." "निव्वळ पैशाने लढाई जिंकता आली असती तर शस्त्रांचे कारखाने काढण्याऐवजी आपण टांकसाळीच काढल्या असत्या. कारण ते पुष्कळ सोपे आहे." "आमची नीती, फुलासारखे वागतील त्यांच्याशी फुलासारखे वागाववाचे आणि वज्रासारखे वागतील त्यांच्याशी वज्रासारके वागावयाचे." "सारख्या उसनवारीने संसार चालला तर तो फार दिवस टिकत नाही." "दुस-यांच्या चुकांचा उपयोग आपली सुधारणा करण्यासाठी करावयाचा असतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org